हातात तिरंगा घेऊन आष्टीच्या तरुणाचे बीडमध्ये शोलेस्टाईल आंदोलन

By संजय तिपाले | Published: February 6, 2023 03:01 PM2023-02-06T15:01:05+5:302023-02-06T15:01:45+5:30

गावातील प्रश्नांसाठी तरुण टॉवरवर, साडेचार तासांपासून आंदोलन सुरू

Ashti youth's Sholestyle protest in Beed; Climb the tower for basic questions in the village | हातात तिरंगा घेऊन आष्टीच्या तरुणाचे बीडमध्ये शोलेस्टाईल आंदोलन

हातात तिरंगा घेऊन आष्टीच्या तरुणाचे बीडमध्ये शोलेस्टाईल आंदोलन

Next

बीड: गावात रस्त्याचे काम आठ वर्षांपासून रखडले आहे, आरोग्य सुविधा नाहीत, त्यामुळे आष्टी तालुक्यातील वाहिरा गावच्या एका तरुणाने शहरातील बालेपीर भागातील चाऊस गल्लीत मोबाइल टॉवरवर चढून ६ फेब्रुवारी रोजी शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले आहे. साडेचार तासांपासून आंदोलनकर्त्या तरुणाची यंत्रणेकडून विनवणी सुरू आहे.

अशोक शिवाजी माने (३४,रा. वाहिरा ता. आष्टी) असे आंदोलनकर्त्या तरुणाचे नाव आहे. वाहिरा ते झांजे वस्ती, तरटे वस्ती ते धानोरा या रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दोन विद्यार्थी अपघातात जखमी झाले.आरोग्य केंद्रात डॉक्टर नसतात. आरोग्य सुविधांचा अभाव आहे, असा अशोक माने यांचा आरोप केला आहे. गावातील मूलभूत १० प्रश्नांची सोडवणूक करावी, यासाठी ३० जानेवारी २०२३ रोजी अशोक माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले होते. मागण्यांची पूर्तता न झाल्यास ६ फेब्रुवारी रोजी शोलेस्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मागण्या मान्य न केल्याने ६ रोजी अशोक माने हे बीडमधील नगर रोडवरील बालेपीर येथील चाऊस गल्लीतील मोबाइल टॉवरवर चढले. 
दरम्यान, सकाळी ११ वाजेपासून हे आंदोलन सुरू आहे. दुपारी सव्वादोन वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते यांनी आंदोलनस्थळी येऊन आरोग्य केंद्रात डॉक्टर देण्याचे लेखी आश्वासन दिले, पण ते त्यांनी अमान्य केले असून रस्ता प्रश्न सोडविण्यासाठी उपाय करण्याची मागणी केली. ते मागण्यांवर ठाम असल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले.

यंत्रणेची धावपळ
अशोक माने यांनी शोलेस्टाईल आंदोलन सुरू केल्यानंतर शिवाजीनगर ठाण्याच्या विशेष शाखेचे अंमलदार संतोष रणदिवे, अभिजित सानप, शेख शहेंशाह तेथे पोहोचले. माने यांना खाली उतरण्याची विनंती केली, पण त्यांनी ती अमान्य केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अग्निशामक दलाचा बंब, रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली होती. तथापि, भरवसाहतीत हे आंदोलन सुरू असताना एकाहीवरिष्ठ पोलिस अधिकारी पोहोचले नव्हते.

हातात तिरंगा अन देशभक्तीपर गीतांसह आंदोलन
मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करुनही प्रश्न मार्गी न लागल्याने अशोक माने यांनी हे आंदोलन करून लक्ष वेधले आहे. देशभक्तीपर गीते लावून त्यांनी टॉवरवर हातात तिरंगा घेऊन आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

Web Title: Ashti youth's Sholestyle protest in Beed; Climb the tower for basic questions in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.