सायना नेहवाल चीन ओपनमधून आऊट, जपानच्या अकाने यामागुची हिने केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 12:12 IST2017-11-16T12:06:43+5:302017-11-16T12:12:20+5:30

भारताच्या सायना नेहवालचे चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Saina Nehwal out of China Open, Akane Yamaguchi of Japan defeated | सायना नेहवाल चीन ओपनमधून आऊट, जपानच्या अकाने यामागुची हिने केला पराभव

सायना नेहवाल चीन ओपनमधून आऊट, जपानच्या अकाने यामागुची हिने केला पराभव

फुजोऊ - भारताच्या सायना नेहवालचे चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या बेईवान झँग हिला पराभूत करणाऱ्या सायनाला दुसऱ्या लढतीत जपानच्या पाचव्या मानांकीत  अकाने यामागुची हिचे आव्हान परतवून लावणे शक्य झाले नाही. या लढतीत सायनाला 18-21, 11-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. 
या लढतीत सायनाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्याच गेममध्ये सायनाचे आव्हान मोडीत काढताना यामागुची हिने गेम 21-18 अशा फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने संपूर्ण वर्चस्व राखत सायनाला 11-21 अशी मात दिली आणि तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. पहिल्या फेरीत सायनाने अमेरिकेच्या बेइवान झैंग हिला केवळ ३० मिनिटांमध्ये २१-१२, २१-१३ असे नमवून शानदार आगेकूच केली होती. 
त्याआधी काल लागलेल्या एका धक्कादायक निकालामध्ये पाचवेळचा जागतिक आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लीन डॅनचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक पराभव झाला होता.   तब्बल ७ मॅच पॉइंट वाचवल्यानंतर लीनला पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला हे विशेष. इंडोनेशियाचा जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असलेल्या जोनाथन ख्रिस्टी याने लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता.  
जोनाथनने दोन गेमपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात खळबळ माजवताना बलाढ्य लीनचे २१-१९, २१-१६ असे आव्हान संपुष्टात आणले. दरम्यान, या पराभवानंतर लवकर हा दिग्गज खेळाडू आपल्या निवृत्तीची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाचवेळा चायना ओपनचे जेतेपद उंचावलेल्या अनुभवी लीनकडून या सामन्यात अनेक चुका झाल्या. याचा पुरेपूर फायदा घेताना जोनाथनने ४२ मिनिटांमध्येच लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. मलेशियाच्या ली चोंग वेई याने मात्र सहज विजयी सलामी देत तैवानच्या सुह जेनहाओ याचा २१-५, २१-७ असा फडशा पाडला. 
 

Web Title: Saina Nehwal out of China Open, Akane Yamaguchi of Japan defeated