पदवी परीक्षांना गोंधळानेच सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:22 AM2018-10-16T00:22:49+5:302018-10-16T00:23:28+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून (दि.१५) सुरुवात झाली. परीक्षेचे नियोजन, समन्वयाचा अभाव पहिल्याच दिवशी पाहण्यास मिळाला. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशीही परीक्षा केंद्रांमध्ये केलेल्या बदलांमुळे औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.

Degree exams start with confusion | पदवी परीक्षांना गोंधळानेच सुरुवात

पदवी परीक्षांना गोंधळानेच सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठ : बदलेल्या केंद्रांमध्ये समन्वयाचा अभाव; कुलगुरू, प्रकुलगुरू परीक्षा केंद्रांच्या भेटीला

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून (दि.१५) सुरुवात झाली. परीक्षेचे नियोजन, समन्वयाचा अभाव पहिल्याच दिवशी पाहण्यास मिळाला. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशीही परीक्षा केंद्रांमध्ये केलेल्या बदलांमुळे औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. सुविधा नसलेल्या ठिकाणी केंद्र दिल्यामुळे परीक्षा सुरू होण्यासही उशीर झाला. कुलगुरू, प्रकुलगुरू यांनी पहिल्यांदाच परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये २२५ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.सह इतर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेला तब्बल ३ लाख ७ हजार विद्यार्थी बसले आहेत. शनिवारी, रविवारीसुद्धा विविध ठिकाणची परीक्षा केंद्रे बदलण्यात आली. शुक्रवारी जाहीर केल्यानुसार २१९ परीक्षा केंदे्र होती. परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यात भर घालून ती २२५ वर पोहोचल्याचे परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले. शहरातील एमआयटी महाविद्यालयातील काही विद्यार्थी एमजीएम वृत्तपत्र, वसंतराव नाईक महाविद्यालयात, तर पडेगावच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थी इतरत्र परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आले. जालन्यातही तीन परीक्षा केंद्रांवर मोठा गोंधळ झाल्याची माहिती संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी दिली. एमजीएम वृत्तपत्र महाविद्यालयात सुरुवातीला ९० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दिले होते. सकाळी ९ वाजता ऐनवेळी २०० विद्यार्थी वाढविले. याची महाविद्यालय प्रशासनाला खबरही नव्हती. या वाढविलेल्या विद्यार्थ्यांकडे पूर्वीच्या परीक्षा केंद्रातील हॉल तिकीट होते. या गोंधळामुळे तब्बल एक तासाने परीक्षेला सुरुवात झाली. ही परीक्षा विनानंबरचीच घेण्यात आली. सिद्धार्थ महाविद्यालयातील काही विद्यार्थी इतरत्र पाठविले. विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी पूर्वीच्याच केंद्रावर हजेरी लावली. मात्र त्याठिकाणी त्यांचे नंबरच नव्हते. यात काही विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाल्याचे कळते. मात्र त्यास विद्यापीठ प्रशासनाने दुजोरा दिला नाही.
हॉल तिकीट डाऊनलोड झालेच नाहीत
वाळूज येथील हायटेक महाविद्यालयातील बीसीए, बीबीए अभ्यासक्रमांच्या काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट परीक्षेच्या दिवशीही डाऊनलोड झाले नव्हते. यात पालकांनी गोंधळ घातल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र सर्व परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळत कोणालाही परीक्षेपासून वंचित ठेवले नसल्याची माहिती प्राचार्य डॉ. बाबासाहेब भालेराव यांनी दिली. विद्यापीठ प्रशासनाने याविषयी बोलताना संबंधित महाविद्यालयाने अतिरिक्त प्रवेश दिल्याचा आरोप केला. मात्र प्राचार्य डॉ. भालेराव यांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादीच जाहीर करून एकही विद्यार्थी अतिरिक्त नसल्याचे स्पष्ट केले.
कुलगुरूंच्या उपस्थितीत परीक्षा नियमांचा भंग
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शहरातील स.भु., मौलाना आझाद, विवेकानंद, देवगिरी महाविद्यालयांतील केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांचा अनधिकृतपणे वावर होता. परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई असतानाही शितोळे यांनी फोटोसेशन केले. परीक्षा केंद्रांना भेट दिल्याची छायाचित्रे शितोळे यांनी प्रसिद्धीसाठी पाठविली आहेत. शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी चौका, सावंगी आणि फुलंब्री येथील महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन १२ विद्यार्थ्यांना कॉप्या करताना पकडले.

Web Title: Degree exams start with confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.