सातारा बायपासवरील सीसीटीव्ही बंद; देखभालीकडे होत आहे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 13:59 IST2018-05-07T13:59:00+5:302018-05-07T13:59:52+5:30
सातारा बीड बायपासवर लोकवर्गणीतून बसविलेल्या सीसीटीव्हीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ‘तिसरा डोळा’ बंद पडले आहेत.

सातारा बायपासवरील सीसीटीव्ही बंद; देखभालीकडे होत आहे दुर्लक्ष
औरंगाबाद : सातारा बीड बायपासवर लोकवर्गणीतून बसविलेल्या सीसीटीव्हीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ‘तिसरा डोळा’ बंद पडले आहेत. नुकतेच शहरात विशेष गुणवत्तेचे नवीन कॅमेरे बसविले; परंतु आयुक्तालयाचीच हद्द असताना बायपास मात्र वंचित ठेवला आहे.
सातारा-देवळाई हा परिसर शहरात समाविष्ट झाला असला तरी त्या परिसराला सतत सापत्न वागणूक दिली जात आहे. महानगरपालिका प्रथम सेवासुविधा शहरातील इतर वॉर्डांत पुरविते त्यानंतर सातारा-देवळाई वॉर्डाचा विचार केला जातो. मनपाकडे कर अदा करणाऱ्यांत परिसराचा आग्रक्रम आहे तरीदेखील प्रत्येक बाबतीत दुर्लक्षपणाचाच कळस ठरलेला आहे. येथे रस्ते, पाणी, दिवे, सफाई इतर सेवासुविधांसाठी संघर्ष केल्याशिवाय काहीही हाती मिळत नाही.
शहरातील वाहतूक बायपास रस्त्यावर वळविल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. महानुभाव आश्रम पैठणरोड ते देवळाई चौक या दरम्यान बसविण्यात आलेले १६ सीसीटीव्ही देखभालीअभावी बंद पडले आहेत. काही सीसीटीव्हीच्या तारा अपघाताने तुटल्या त्याची जोडणीच करण्यात आलेली नाही, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे काही काळ देखभालच करण्यात आली. बंद पडलेल्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यावर भर दिलेला नाही.
जनता दरबारात लोकसहभाग
तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सातारा येथे घेतलेल्या जनता दरबारात नवीन सीसीटीव्हीचा मुद्दा समोर आला होता. वाहतूक शाखेने रस्ते सुरक्षेवर घेतलेल्या व्यापारी असोसिएशनच्या बैठकीतही वाहनावर नियंत्रण, वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी लोकसहभागातून नवीन सीसीटीव्ही पुन्हा कार्यान्वित करण्याचे एकमुखी ठरले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले.
नवीन बसविण्याची गरज
२०१३ मध्ये सातारा परिसरात सीसीटीव्ही बसविल्याने गुन्हेगारी, वाहनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते; परंतु कालांतराने, अपघाताने नुकसान, तसेच देखरेखीकडे लक्ष न दिल्याने तिसरा डोळा शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. याविषयी स्थानिक पोलीस निरीक्षक भारत काकडे यांच्याशी संपर्क साधला असता नव्याने सीसीटीव्ही बसविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.