मराठवाडा : आज सकाळपासूनच भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद संपूर्ण मराठवाडाभर उमटताना दिसत आहेत. औरंगाबामध्ये भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर व वाळूज परिसरात जमावाकडून दगडफेकीनंतर पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करत हवेत गोळीबार केला. यानंतर शहरभर जमावबंदी लागू करण्यात आली. 


यासोबतच मराठवाड्यात विविध ठिकाणी बंद पाळून घटनेचा निषेध करण्यात आला. 


परभणी :
 

भीमाकोरेगाव येथील घटने प्रकरणी मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते़ या पार्श्वभूमीवर सोनपेठ, पालम, गंगाखेड, पाथरी, मानवत या शहरांमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला़ सोनपेठमध्ये १०० ते २०० युवकांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले़ गंगाखेड येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला़ त्यानंतर मुख्य मार्गावरून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ सकाळी १० च्या सुमारास मालेगाव पाटीवर एका बसची काच फोडल्याने १०़१५ वाजेपासून बस वाहतूक बंद करण्यात आली आहे़ 
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली 

- गंगाखेड 
डॉ आंबेडकर नगर येथे आंबेडकरवादी बांधवांनी एकत्र येत मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. 
तसेच सकाळी दहा वाजता मालेवाडी पाटीजवळ गंगाखेड लोहा बसची काच फोडल्याची घटना घडल्याने लोहा कडे जाणारी बस परत गंगाखेड आगारात आणण्यात आली. सव्वा दहा वाजेपासून बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या बसेस गंगाखेड बस स्थानकात थांबवुन घेतल्या जात आहे.

- सोनपेठ येथे बसवर दगडफेक
सोनपेठ येथुन नरवाडी मार्गे गंगाखेडकडे येणारी बस क्रमांक एम एच 06 एस 8789 ही बस 12 वाजेच्या सुमारास शहरातील परळी नाका परिसरात आल्यानंतर बसवर दगडफेक केली यात बसच्या समोरील, उजव्या बाजुची काचा फुटल्याने बस मधील एक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

हिंगोली :
 

वसमत बसस्थानकाशेजारी उभ्या असणा-या दोन जिप  जाळण्यात आल्या. भीमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ आज वसमत बंद चे आवाहन करण्यात आले आहे

जालना :
 

जालना-सिंदखेड राजा मार्गावरील नंदापूर फाट्यावर ग्रामस्थांनी रास्तारोको केला. शहरातील गांधी चमन परिसरात जमावाकडून निदर्शने करण्यात आली. शहरातील नूतन वसाहत भागात पोलिसांच्या वाहनावर दगडफेक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक घटना स्थळी दाखल होताच तणाव निवळला

उस्मानाबाद :
 

भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ कळंबमध्ये रँली काढून बंद पाळण्यात आला. बस वाहतूक जमावाकडून बंद करण्यात आली.

नळदुर्ग जवळ उमरगा येथून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसवर दगडफेक

नांदेड:
 

शहरात रास्ता रोको करण्यात आला, सिडको परिसरात कडकडीत बंद होता.

बहुतांश शाळा सोडून दिल्या. शहरात तणावपूर्ण शांतता.

- बिलोली येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. 

बीड : 
 

भिमा कोरेगाव येथील घटनेचे बीड जिल्ह्यात पडसाद. माजलगाव शहर, वडवणी बाजारपेठ बंद. बीडमध्ये जिल्हधिकारी कचेरीवर रॅली; दोन वाहनावर दगडफेक. बीड शहर बाजारपेठ बंद. जिल्ह्यात ठिकठिकाणी चौकाचौकात कडेकोट बंदोबस्त. तसेच शहरात केएसके कॉलेज, माने काँप्लेक्समधील दुकानावर दगडफेक झाली . 

औरंगाबाद :
 

आमखास मैदान येथे सकाळी एक बस फोडीच्या घटनेनंतर सकाळी ७ वाजेपासून मध्यवर्ती बसस्थानकात वाहतूक थांबविण्यात आली. पोलिसांच्या मदतीने बस सेवा सुरळीत केली जात आहे,परंतु बसस्थानकात बसच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

 

- गंगापूर येथे आंबेडकर चौकात बसची काच फोडली. शहरात तणावपूर्ण वातावरण.

लातूर :

 भीमा कोरेगाव घटनेचे लातूर शहरात पडसाद; शहरात दोन बसेसवर दगडफेक. बाजार समितीत हमाल, मापाडी, गाडीवानाचे काम बंद आंदोलन.