बजाजनगरात माथेफिरुंनी पुन्हा दोन दुचाकी जाळल्या

By Admin | Published: December 30, 2014 01:00 AM2014-12-30T01:00:43+5:302014-12-30T01:19:44+5:30

वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळणाऱ्या माथेफिरूटोळींचा धुमाकूळ सुरूच असून, अवघ्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर या टोळीने आज पुन्हा दोन दुचाकी जाळून टाकल्या.

In the Bajajnagar, the two-wheelers were burnt by two-wheelers | बजाजनगरात माथेफिरुंनी पुन्हा दोन दुचाकी जाळल्या

बजाजनगरात माथेफिरुंनी पुन्हा दोन दुचाकी जाळल्या

googlenewsNext


वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळणाऱ्या माथेफिरूटोळींचा धुमाकूळ सुरूच असून, अवघ्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर या टोळीने आज पुन्हा दोन दुचाकी जाळून टाकल्या. या भागात बारा दिवसांत दहा दुचाकी भस्मसात झाल्या असून घटना रोखण्यात पोलिसांना येत असलेल्या अपयशाबाबत नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
बजाजनगर या कामगार वसाहतीत गेल्या तीन वर्षांपासून दुचाकी, चारचाकी वाहने जाळण्याचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी बजाजनगरात चार दुचाकी जाळण्याची घटना ताजी असताना आज पहाटे पुन्हा दोन दुचाकी पेटवून दिल्यामुळे दुचाकीस्वार कामगारांची झोप उडाली आहे. या माथेफिरूटोळीने गेल्या तीन वर्षांत दुचाकी जाळण्याची शंभरी गाठली असून, दोन डझनांच्या वर चारचाकी वाहनांना आगी लावल्या आहेत. वाहने जाळणाऱ्या या माथेफिरूटोळींचा शोध लावण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस जंगजंग पछाडत असतानाही या टोळीचा छडा लागत नाही, त्यामुळे संपूर्ण वाळूज महानगर परिसरात पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक इंदलसिंह बहुरे व पोलीस उपनिरीक्षक संजय अहिरे यांची नागरिकांकडून छी थू होऊ लागली आहे. सोमवारी (२९ डिसेंबरला) पहाटे २.४५ वाजेच्या सुमारास या माथेफिरू टोळीने बजाजनगरातील चिंचबन कॉलनी येथील नितेश विक्रम शर्मा या विद्यार्थ्याची दुचाकी (क्र. एम.एच.-२०, सी.क्यू.-१५९८ ) व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विनोदकुमार नायर यांची नवी विनापासिंग दुचाकी पेटवून दिली आणि ते पळून गेले.
या दुचाकी जळत असल्यामुळे मोठा स्फोटासारखा आवाज झाला. या आवाजामुळे कॉलनीतील विक्रम शर्मा, विनोदकुमार नायर, प्रशांत चौधरी, सिद्धू तिवारी, रवी नायर, एस. आर. डोंगरे आदी नागरिकांनी घराबाहेर येऊन या दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच नेहमीप्रमाणे एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या गस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी जाळणाऱ्या माथेफिरूला पकडण्यासाठी शोधमोहीम राबविली.
बजाजनगरात वास्तव्यास असणारे गरवारे कंपनीचे विनोदकुमार नायर यांनी २५ डिसेंबरलाच नवी दुचाकी खरेदी केली होती. अवघ्या चार दिवसांतच माथेफिरूने या दुचाकीला आग लावल्यामुळे दुचाकी खरेदीच्या आनंदावर विरजण पडल्याची प्रतिक्रिया नायर कुटुंबियांनी व्यक्त केली. घटनास्थळाजवळ पोलिसांना मिनरल वॉटरची खाली बॉटल मिळाली असून, या बॉटलला पेट्रोलचा वास येत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
या दोन दुचाकीला आग लागल्याची माहिती मिळाल्यामुळे आज पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, पोलीस निरीक्षक इंदलसिंह बहुरे, फौजदार संजय अहिरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन आगीची माहिती जाणून घेतली. या परिसरात अंधार असल्यामुळेच अज्ञात इसमाने दुचाकीला आग लावल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी वाहनमालकांनी कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे व दिवे लावण्याचा अजब सल्ला पोलिसांनी नागरिकांना दिला.१
बजाजनगर परिसरात बारा दिवसांत दहा दुचाकी भस्मसात झाल्या असून, दोन स्कूटी व प्रत्येकी एक दुचाकी व लोडिंग रिक्षा वाचवण्यात नागरिकांना यश आले आहे. १७ डिसेंबरला बजाजनगरातील स्वेदशिल्प हौसिंग सोसायटीतील प्रदीप शिवप्रसाद तिवारी यांची पल्सर दुचाकी (क्रमांक एम.एच.-२०, सी.जे.९२०७) पेटवून दिली होती, तर गोकुळ परदेशी यांची लोडिंग रिक्षा क्रमांक एम.एच.-२०, सी.टी.-२१० ही आगीपासून बचावली होती. २
या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी १९ डिसेंबरला राहुल रमेश पाटील यांची (एम. एच.-२०, सी. डब्ल्यू-३२३९), गणेश माणिकराव डोरके, (एम.एच.-२०, बी. एम. ९१६७), सुहास भास्कर पाटील (एम. एच.-२०, सी.डी.-३२८५ ) व पंढरपुरातील फत्तू शहा या फळ विक्रेत्याची एक दुचाकी जळाली, अशा चार दुचाकी पेटवून देण्यात आल्या होत्या. ३
२७ डिसेंबरला वडगावकडे जाणाऱ्या छत्रपतीनगरातील संजय अंबादास वाघ यांची पल्सर दुचाकी क्रमांक (एम.एच.-२०, डी.एल.-२३११), कैलास किसन पवार (दुचाकी क्रमांक एम.एच.-२०, डी.बी.-५८६०) व सिमेन्स सोसायटीतील ज्ञानेश्वर बाबाजी विघ्ने (दुचाकी क्रमांक एम.एच.-२०, डी.एम.-४०८०) तसेच सय्यद मुन्शी (दुचाकी क्रमांक एम.एच.-२०, ए.एल.-६३) या चार दुचाकीला आग लावण्यात आली होती. अवघ्या बारा दिवसांत दहा दुचाकी भस्मसात झाल्यामुळे दुचाकींचे संरक्षण कसे करावे, असा प्रश्न दुचाकीस्वार कामगारांना पडला आहे.

Web Title: In the Bajajnagar, the two-wheelers were burnt by two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.