आमसभेत हमरी-तुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:15 PM2018-10-06T23:15:56+5:302018-10-06T23:16:15+5:30

विषयसूचीवरून जिल्हा परिषदेच्या आमसभेत शनिवारी पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विरोधी पक्षाचे गटनेता प्रवीण तायडे व काँग्रेसच्या तळेगाव दशासर सर्कलच्या सदस्य अनिता मेश्राम एकमेकांवर धावून गेले.

We are in the General Assembly | आमसभेत हमरी-तुमरी

आमसभेत हमरी-तुमरी

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : विषयसूचीवरून पेटला वाद, गोंधळात गुंडाळली सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विषयसूचीवरून जिल्हा परिषदेच्या आमसभेत शनिवारी पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विरोधी पक्षाचे गटनेता प्रवीण तायडे व काँग्रेसच्या तळेगाव दशासर सर्कलच्या सदस्य अनिता मेश्राम एकमेकांवर धावून गेले. भाजपचे संजय घुलक्षे यांनी पीठासीन सभापती व सीईओंच्या आसनाजवळ पोहोचून विषयपत्रिका आपटली. या गदारोळातच अध्यक्षांनी पटलावरील सर्व विषय मंजूर करून सभा आटोपल्याचे घोषित केले. सत्ताधारी व विरोधकांनी एकच गर्दी केल्याने सभागृहाला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले होते.
सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
जिल्हा परिषदेची १० सप्टेंबरची स्थगित आमसभा शनिवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झाली. अध्यक्ष नितीन गोडाणे यांनी सभेला सुरुवात केली. प्रारंभी प्रशासकीय विषयांना मंजुरी देण्यात आली. धारणी व चिखलदरा तालुक्यातील जि.प. अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी हजर राहत नाहीत. आठवडाभरात एक-दोन दिवस हजेरी लावून इतर दिवशी स्वाक्षरी करतात आणि पदाधिकाऱ्यांना हप्ते देतात, असा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला. त्यावर आरोग्य व वित्त सभापती बळवंत वानखडे यांनी आक्षेप घेतला.
मेळघाटातील सदस्य दयाराम काळे, चिखलदरा पंचायत समितीच्या सभापती सविता काळे, महिला व बाल कल्याण सभापती वनिता पाल व इतर काही सदस्यांनी तायडे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र, तायडे हे आपल्या वक्तव्यावर ठाम होते. त्यानंतर काँग्रेसच्या अनिता मेश्राम यांनी विषयसूचीतील विषय घेण्याची मागणी करताच, प्रवीण तायडे पुढे आले. त्यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आणि ते समोरासमोर उभे ठाकले. यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. बसपाच्या सुहासिनी ढेपे यांनी अनिता मेश्राम यांना समजावित वाद सोडविला. त्यानंतरही तायडे व मेश्राम यांच्यात बाचाबाची सुरू होती. सुहासिनी ढेपे, वासंती मंगरोळे व अन्य सदस्यांनी पुन्हा दोन्ही सदस्यांना समजूत काढल्याने वाद निवळला. हा प्रकार थांबत नाही तोच भाजपचे संजय घुलक्षे यांनी नियोजनाच्या यादीत राजुरवाडी सर्कलमधील कामे नसल्याने अध्यक्षांसमोर येऊन विषयपत्रिका आपटली. गोंधळ वाढत गेल्याने अध्यक्षांनी सभेतील विषय मंजूर केल्याचे घोषित करून सभागृहातून काढता पाय घेतला.
सभेला समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, सदस्य महेंद्रसिंग गैलवार, बाळासाहेब हिंगणीकर, प्रियंका दगडकर, सुहासिनी ढेपे, सुरेश निमकर, प्रकाश साबळे, शरद मोहोड, सुनील डिके, वासंती मंगरोळे, विठ्ठल चव्हाण, पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, सविता काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सानप, दिलीप मानकर, माया वानखडे, प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, प्रदीप ढेरे, राजेंद्र सावळकर, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र येवले यांच्यासह सर्व सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.
ज्येष्ठ सदस्य सभेला अनुपस्थित
जिल्हा परिषदेच्या सभेला काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख व विरोधी भाजपचे पक्षनेते रवींद्र मुंदे बाहेरगावी असल्याने सभागृहात हजर नव्हते. सभागृहात घडलेल्या प्रकाराचा काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करतो, असे बबलू देशमुख यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम सभापती जयंत देशमुख हे सभा आटोपल्यानंतर पोहोचले. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्य प्रताप अभ्यंकर गैरहजर होते.

जिल्हा परिषदेतील प्रकार निंदाजनक आहे. सदस्य प्रवीण तायडे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भविष्यात सभागृहात असा प्रकार घडणार नाही, याकरिता यापुढे आमसभेला पोलीस संरक्षण घेऊ.
- नितीन गोंडाणे
अध्यक्ष, जिल्हा परिषद

जिल्हा परिषद सभागृहात भाजप गटनेता व काँग्रेस सदस्यामधील वाद राजकीय आहे. सभागृहाचे कामकाज हे शांततेने व्हावे, अन्यथा विकास व अन्य प्रश्नावर मंथन होऊ शकणार नाही. समन्वय, चर्चेतून विकासकामे अपेक्षित आहेत.
- मनीषा खत्री
मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रवीण तायडे यांनी विषयसूचीच्या मुद्द्यावर असभ्य भाषेचा प्रयोग केला. हा सभागृहातील संपूर्ण महिला सदस्यांचा अपमान आहे. तायडे यांचा सदस्यत्व रद्द करावे.
- अनिता मेश्राम
जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस

मेळघाटातील कामचुकार कर्मचारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना हप्ते पुरवितात. माझा आरोप सांघिक स्वरूपाचा आहे. त्यांनी अरे, का रे ने सुरुवात केल्याने सभागृहात वाद उपस्थित झाला. कुठल्याही चौकशीला मी तयार आहे.
- प्रवीण तायडे
भाजप गटनेता, जिल्हा परिषद

Web Title: We are in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.