तहानलेल्या गावांसाठी अखेर सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:33 PM2019-05-13T23:33:23+5:302019-05-13T23:33:54+5:30

तहानलेल्या गावांच्या पाण्यासाठी राजकारण करणाऱ्या भाजप आमदाराच्या खेळीने संतापलेल्या आमदार यशोमती ठाकुरांच्या रुद्रावताराला सामोरे जाताना प्रशासन चांगलेच घामाघूम झाले. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलणाऱ्या जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी जाब विचारल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. अखेर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला नि सोमवारी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

Water left for thirsty villages | तहानलेल्या गावांसाठी अखेर सोडले पाणी

तहानलेल्या गावांसाठी अखेर सोडले पाणी

Next
ठळक मुद्देयशोमती ठाकुरांचा रुद्रावतार : पालकमंत्र्याच्या सभेत काँग्रेस आमदारांची धडक, तगडा सुरक्षा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तहानलेल्या गावांच्या पाण्यासाठी राजकारण करणाऱ्या भाजप आमदाराच्या खेळीने संतापलेल्या आमदार यशोमती ठाकुरांच्या रुद्रावताराला सामोरे जाताना प्रशासन चांगलेच घामाघूम झाले. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलणाऱ्या जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी जाब विचारल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. अखेर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला नि सोमवारी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
तिवसा मतदारसंघातील टंचाईग्रस्त गावांसाठी रविवारी ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून विसर्ग करण्यात येणार होता. यासाठी सिंचन विभागाने अलर्ट दिल्यानंतर रात्री परस्पर हा निर्णय फिरविल्याने आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आदींनी सोमवारी कलेक्टेÑटमध्ये ठिय्या दिला. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, रणजित कांबळे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे हेदेखील यशोमतींच्या समर्थनार्थ दाखल झाले.
दरम्यान, सिंचन भवनात याच विषयावर पालकमंत्र्यांची बैठक सुरू असल्याने सर्वांनी येथे धडक दिली. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्र्यासमक्ष जलसंपदाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांना रविवारी ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणी वर्धा नदीत सोडण्याचा जिल्हाधिकाºयांचा आदेश का डावलला, याचा जाब विचारला. लांडेकरांकडे त्यावर उत्तर नव्हते. आमदार यशोमती खूपच आक्रमक झाल्या. आमदार वडेट्टीवार व रणजित कांबळे यांनीदेखील याच मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. चांगलीच खडाजंगी झाली. इंग्रजीतूनही झाली. आमदार अनिल बोंडे यांचे नातेवाईक असल्यामुळे बोंडे यांच्या सांगण्यावरून लांडेकरांनी हे कारस्थान रचले, त्यांना निलंबित करा, अशी मागणी आमदार यशोमतींनी केली.
काय आहे मुद्दा?
भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन तिवस्यासह काही गावांसाठी ऊर्र्ध्व प्रकल्पातील पाणी आरक्षित करण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी २० आॅक्टोबर २०१८ रोजी याविषयीचा आदेश पारित केला. तिवसा नगरपंचायतीने २१ जानेवारी २०१९ रोजी सुरक्षा ठेवीचा ऊर्ध्व वर्धाचे कार्यकारी अभियंत्याकडे रीतसर भरणा केला. १०० रुपयांच्या मुद्रांकावर करारनामादेखील करण्यात आला. यानुसार ०.२० दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले. सध्या वर्धा नदी कोरडी झाल्याने उर्ध्व वर्धा प्रकल्पातील आरक्षित पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला. त्यानुसार रविवारी रात्री वर्धा नदीपात्रात पाणी सोडण्यासंबंधीची अधिसूचना काढण्यात आली. तालुका प्रशासनाला, संबंधित विभागाला याविषयीचा अलर्ट देण्यात आला. तहानलेली गावे आतुरतेने वाट पाहत असताना मुख्य अभियंत्यांनी पाणीच न सोडल्याने आजचा बाका प्रसंग उभा ठाकला. आमदार अनिल बोंडे यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हा निर्णय फिरविल्याचा आरोप आमदार यशोमती यांनी रविवारी रात्री फेसबूक लाइव्हद्वारे केला होता.
-अन् पालकमंत्र्यांना राहावे लागले गप्प
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा तालुक्यातील गावांसाठी आरक्षित पाणी वर्धा नदीत सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्याचा आदेश होता. मात्र, पालकमंत्री स्तरावरून आदेश दिलेला नसल्यामुळे रविवारी निर्णय थांबविण्यात आल्याचे ना.प्रवीण पोटे यांनी बैठकीत सांगताच काँग्रेसचे आमदार अवाक् झाले. आचारसंहितेत पालकमंत्र्यांना पाणी सोडण्यासाठीच्या निर्णयात हस्तक्षेप करता येत नाही, असा मुद्दा वर्धा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रणजित कांबळे यांनी मांडला. काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते तथा तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेदेखील पोटे यांच्या उत्तराने आश्चर्यचकित झाले. सर्वांनीच आक्रमक पवित्रा घेतला. यशोमती आणि कांबळे यांनी इंग्रजीतून वाग्बाण डागले. काँग्रेसचे नेते संतापल्यावर पालकमंत्री पोटे यांनी चूप राहणेच उचित समजले. बैठकीअंती पालकमंत्र्यांनी शासनाने पाणी सोडल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली.
विधिमंडळात प्रश्न लावून धरू
आचारसंहितेत सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना असतो. अप्पर वर्धा प्रकल्पातून वर्धा नदीत पाणी सोडण्याच्या त्यांच्या आदेशाचे पालन केले गेले नाही. शिस्तभंग केला. राजकारणाला शरण जात गैरअधिकाराने पाणी रोखले व पदाचा गैरवापर केला. हा प्रश्न आपण विधिमंडळात लावून धरणार आहोत. वेळ पडल्यास या मुद्द्यावर सभागृह बंद पाडणार असल्याचे यावेळी आक्रमक होत माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.
बैठकीत खडाजंगी, वातावरण तापले
सिंचन भवनामध्ये बैठक सुरू असताना भाजपच्या निवेदिता दिघडे े(चौधरी) पोहचल्या. रवींद्र लांडेकर यांना आ. ठाकूर धारेवर धरत असताना दिघडे यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर या दोन्ही महिला नेत्यांमध्ये खडाजंगी झाली.
लांडेकर हे आमदार बोंडेंचे नातेवाईक
मुख्य अभियंता लांडेकर हे भाजपचे आमदार अनिल बोंडेंचे नातेवाईक आहेत. ते पाण्याचे राजकारण करीत असून, त्यांच्या आदेशानेच लांडेकर यांनी पाणी रोखण्याचे महापाप केले, असा आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी केला. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी रोखणाऱ्या लांडेकरांचे निलंबन करावे, ही मागणी लावून धरणार असल्याचे त्या म्हणाल्या.
पुन्हा रोखला पुरवठा
मोर्शी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास अप्पर वर्धा धरणाचे पहिल्या व तेराव्या क्रमांकाचे दरवाजे पाच सेंटिमीटर इतके उघडण्यात आले. दोन्ही दरवाजे ७.३० वाजता बंद करून सातव्या क्रमांकाचा दरवाजा दोन सेंटिमीटर उघडण्यात आला. तो रात्री ८.१० च्या सुमारास बंद करण्यात आला. अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडू नये, यासाठी तालुका भाजपचे अनेक पदाधिकारी धरणस्थळी पोहोचले. त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून धरणाची दारे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीत प्रवाहित केलेले पाणी सुमारे २० किलोमीटर अंतरावरील वाघोलीपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळाली.
अनिल बोंडेंचेही आरोप
आंदोलन सुरू असताना अनिल बोंडे यांनी पत्रपरिषद घेऊन यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप केले. स्वत:चा नाकर्तेपणा लपविण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत गावांत पाणी का पोहोचले नाही, असा सवाल त्यांनी केला.
अप्पर वर्धा धरणातून एक थेंबही देणार नाही
मोर्शी: अप्पर वर्धा धरणातून तिवसा- मोझरीला एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही, असा पवित्रा नगरपालिकेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनी येथे घेतला. सोमवारी त्यांनी भाजपक्षाच्या पदाधिकाºयांसह उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. अप्पर वर्धा जलाशयावर अमरावती शहर, मोर्शी, आर्वी, आष्टी, लोणी, जरूड, वरूड या गावांतील जनतेची तहान भागते. धरणात आजमितीस १६.६५ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Water left for thirsty villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.