'माझे अन् मुख्यमंत्र्यांचेही ५० हजार घ्या!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:37 PM2019-01-15T22:37:20+5:302019-01-15T22:38:51+5:30

मालमत्ता वाढविण्यासाठी उपजिल्हाधिकारी पूनर्वसन अजय लहाने हे नागरिकांना ५० हजारांची मागणी करीत आहेत. ज्यांनी दिलेत, त्यांच्या मालमत्ता वाढविण्यात आल्याचा घणाघाती आरोप आ.यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी केला. याविषयीचे पुरावेच त्यांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या पुढ्यात ठेवले. माझे अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ५०-५० हजार रुपये घ्या अन् आमच्याही नावाने मालमत्ता करा, असा उपरोधिक प्रस्ताव आ.यशोमतींनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवला.

'Take 50,000 of mine and chief ministers'! | 'माझे अन् मुख्यमंत्र्यांचेही ५० हजार घ्या!'

'माझे अन् मुख्यमंत्र्यांचेही ५० हजार घ्या!'

Next
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : आमच्याही नावाने मालमत्ता करा, पुनर्वसितांच्या मुद्द्यावर रुद्रावतार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मालमत्ता वाढविण्यासाठी उपजिल्हाधिकारी पूनर्वसन अजय लहाने हे नागरिकांना ५० हजारांची मागणी करीत आहेत. ज्यांनी दिलेत, त्यांच्या मालमत्ता वाढविण्यात आल्याचा घणाघाती आरोप आ.यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी केला. याविषयीचे पुरावेच त्यांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या पुढ्यात ठेवले. माझे अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ५०-५० हजार रुपये घ्या अन् आमच्याही नावाने मालमत्ता करा, असा उपरोधिक प्रस्ताव आ.यशोमतींनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवला.
निम्न चारघड प्रकल्पासाठी मोर्शी तालुक्यातील मौजा खोपडा येथील भूसंपादन प्रकरण, कुंड (सर्जापूर) येथील पुनर्वसन व तिवसा तालुक्यातील दुर्गवाडा, धारवाडा येथील भूसंपादन प्रकरणामध्ये उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अजय लहाने यांच्या नियमबाह्य कारभाराचा पाढाच उपस्थित नागरिकांनी जिल्हाधिकाºयांसमक्ष वाचला. नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आ. यशोमती ठाकूर यांनी रौद्ररूप धारण केले. एकाच गावातील काही नागरिकांना एक न्याय व काहींना दुसरा न्याय का, या भ्रष्ट अधिकाºयांनी प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगली आहे. हा अधिकारी व त्याचे दलाल नागरिकांना खुलेआम पैसे मागतात. यामधून काही नागरिकांच्या मालमत्ता वाढविण्यात आल्यात. यामध्येदेखील यांची हिस्सेदारी असल्याचा घणाघाती आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी केला.
काय आहे प्रकरण?
खोपडा येथील गावठाणातील जमिनीसाठी नवीन भूसंपादन कायद्याचे कलम ११ नुसार नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. भूसंपादन मोबदला निश्चितीसाठी नोटीस बजावल्याची तारीख ग्राह्य धरण्यात येते. त्यानंतर बांधकाम किंवा दुरुस्ती ग्राह्य धरण्यात येत नाही. याबाबत मोबदलादेखील शासनाद्वारा देय नाही. त्यानंतर कलम १९ नुसार नोटीस प्रकाशित झाली. त्यामध्ये विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती सुचविल्या. ग्रा.पं. रेकॉर्डमध्ये खोडतोड करण्यात आली. गाव नमुना ८ (अ) मध्ये रिकाम्या जागेऐवजी बांधकाम दाखविले. मालकी हक्काबाबतही खोडतोड केली आहे. हा आमच्यावर अन्याय असल्याचा आरोप नागरिकांनी या बैठकीत केला.
मालमत्ता वाढल्या कशा?
खोपडा या गावात सन २००६ मध्ये गावनमुना नोंदीमध्ये ४९८ घरांच्या मालमत्ता होत्या. आता गावाच्या ५२० मालमत्ता झालेल्या आहेत. या मालमत्तांमध्ये वाढ झालीच कशी, असा सवाल आ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला.
मकर संक्रातीलाच लहानेंवर ‘संक्रात’
‘नियमानुसार कामा’ची आवई उठविणारे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अजय लहाने आणि मोर्शीचे एसडीओ मनोहर कडू यांच्याकडून गावकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांची मागणी केली जात असल्याचा मुद्दा ग्रमीणांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रमकपणे उपस्थित केला. त्यांची वागणूक उर्मट असल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात असे वाभाडे निघाल्याने मकर संक्रातीलाच लहानेंवर ‘संक्रात’ आल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात रंगली होती.
खटाटोप कशासाठी?
खोपडा पुनर्वसनातील जुने व नव्या बांधकामाच्या मूल्यांकनामध्ये तफावत आहे. या मूल्यांकनाचा वाढीव मोबदला देण्यासाठीच लहाने व कंपूचा खटाटोप असल्याचा आरोप नागरिकांनी जिल्हाधिकारी देशमुख यांच्यासमोर केला. भूसंपादनाचे कलम १९ मधील अधिसूचनेमध्ये नियमबाह्य दुरुस्ती करण्याविरुद्ध चौकशी व कारवाईची मागणी उपस्थित नागरिकांनी केली.
जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख देणार का चौकशीचे आदेश?
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अजय लहानेंकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याबाबतची लेखी तक्रार असल्यास चौकशीचे आदेश देण्यात येतील, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. वाढीव मोबदल्यासाठी पैसे मागितले जात असल्याची तक्रार खोपडा येथील नागरिकांनी बैठकीपश्चात दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
भूखंडवाटप मान्य नाही : ग्रामस्थ
कुठलीही पूर्वसूचना न देता मोर्शी एसडीओ व उपजिल्हाधिकारी पुनर्वसन हे एका दिवसाच्या अवधीत, प्लॉट नंबर न देता भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्याठिकाणी कुठली सुविधा आहे, याची खातरजमा करण्याची तसदीदेखील या मस्तवाल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे हे प्लॉटवाटप आम्हाला मान्य नाही, असे खोपडा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना ठणकावून सांगितले. याबाबत चौकशी करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
अधिकारी बदलल्यास नियम बदलतात काय?
तिवसा तालुक्यातील दुर्गवाडा-धारवाडा येथील पुनर्वसनात आपसी प्लॉट बदलाची मागणी तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मान्य केली होती. अजय लहाने या विषयात चक्क हाकलून लावतात. अधिकारी बदलला, तर कायदे-नियम बदलतात काय, अशी विचारणा ग्रामस्थांनी केली.

‘चौकीदार चोर है’ हे तर सिद्ध झाले आहेच. त्यांचे अधिकारीदेखील चोर आहेत, हे वाढीव मालमत्तेच्या मोबदल्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करीत असल्याने सिद्ध झाले आहे. अजय लहाने हा फार उद्धट अधिकारी आहे. नागरिकांना ते फार त्रास देत. तुच्छ लेखतात. गेट आऊट म्हणतात. जिल्हाधिकाºयांसमक्ष या बाबी आज नागरिकांनी मांडल्या. कारवाई व्हावी. यापुढे असे वागल्यास लहानेंना ठोकून काढू.
- यशोमती ठाकूर, आमदार तथा राष्ट्रीय सचिव अ.भा.काँग्रेस

खोपडा येथील भूसंपादनात घोळ असल्याची तक्रार केल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी चौकशी सुरू केली. मात्र, या प्रामाणिक अधिकाºयाची बदली केली गेली. या प्रकरणाच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा हा प्रकार आहे.
- विलासराव कोठाडे, ग्रामस्थ, खोपडा

Web Title: 'Take 50,000 of mine and chief ministers'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.