‘सिनेट’ निवडणूक मतदानात अव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:47 PM2017-10-15T22:47:51+5:302017-10-15T22:48:26+5:30

येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी रविवारी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया अव्यस्थेत पार पडली.

'Senate' election clutter | ‘सिनेट’ निवडणूक मतदानात अव्यवस्था

‘सिनेट’ निवडणूक मतदानात अव्यवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देउमेदवारांसह मतदारांचा आरोप : आठ हजार मतदारांचे दोन हॉलमध्ये मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी रविवारी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया अव्यस्थेत पार पडली. उमेदवारांसह मतदारांचा दबाव वाढल्याने विद्यापीठ प्रशासनाने त्वरेने एकऐवजी दोन हॉलमध्ये मतदान घेतले. परंतु मतदानासाठी लांबच लांब रांगा हे सायंकाळपर्यंत चित्र कायम होते.
स्थानिक श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात पदवीधर, प्राचार्य, अध्यापक, महाविद्यालयीन व्यवस्थापन व विद्यापीठ अध्यापक प्रतिनिधी निवडीसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. मात्र, सुमारे आठ हजार मतदारसंख्या असताना विद्यापीठ प्रशासनाने मतदानासाठी एकच हॉलची व्यवस्था केली होती. त्यामुळे मतदानासाठी अर्धा किमीपर्यंत रांग लागलेली असल्याचे दिसून आले. दोन ते तीन तास रांगेत उभे राहूनही मतदारांना मतदान करता येत नसल्याने संतप्त होत पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय बनारसे यांनी मतदान प्रक्रियेसाठीच्या अव्यवस्थेविरुद्ध आक्षेप घेतला. दरम्यान मतदानासाठी एकच हॉलची व्यवस्था असल्याने नुटा, शिक्षण मंच आणि प्राचार्य फोरमच्याही उमेदवारांनी मतदारांना होत असलेल्या त्रासाबाबत अवगत केले. अखेर विद्यापीठ प्रशासनाने दुपारी १२ वाजेनंतर मतदानासाठी एकाऐवजी दुसºया हॉलमध्येही व्यवस्था केली. मात्र, एका मतदारांना १० मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहायचे असल्याने मतदान प्रक्रियेला विलंब लागला. तसेच मतदाराला प्रत्येक मतपत्रिकेवर स्वाक्षरी देण्याची सक्ती असल्याने हे सुद्धा विलंबाचे कारण ठरले, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, सिनेट निवडणूक मतदानासाठी लांब रांगा ही स्थिती सायंकाळपर्यंत कायम होती. अमरावती विभागातंर्गत पाचही जिल्ह्यांसाठी सिनेट निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. यात पदविधर प्रतिनिधीसाठी १०, प्राचार्य ९, अध्यापक प्रतिनिधी १०, व्यवस्थापन प्रतिनिधी ६, तर विद्यापीठ अध्यापक प्रतिनिधी ३ असे एकूण ३८ सदस्य निवडीसाठी मतदान घेण्यात आले.
चार वाजता दिल्यात मतदानाच्या पासेस
सिनेट निवडणुकीसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा अवधी ठरविण्यात आला होता. मात्र, दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या आत प्रवेश करणाºया मतदारांना निवडणूक विभागाने मतदानासाठी नव्याने पासेस जारी केल्यात. त्यानंतर संबंधित मतदारांचे मतदान सायंकाळी ५ वाजता पूर्णत्वास आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय देशमुख यांनी दिली.
मतमोजणी मंगळवारी
सिनेट निवडणूक मतमोजणी मंगळवार १७ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होईल. विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील मतपेट्या रविवारी उशिरा रात्रीपर्यत आणल्या जातील. त्यानंतर मंगळवारी मतमोजणीस प्रारंभ होऊन उशिरा रात्रीनंतर सिनेट निवडणुकीचे निकाल हाती येतील, असा अंदाज निवडणूक विभागाने वर्तविला आहे.

मतपत्रिकेवर मतदारांची पहिल्यांदाच स्वाक्षरी घेण्यात आली. एकाचवेळी सर्वांना मतदान करणे शक्य नव्हते. काही मतदारांना ४६ मतपत्रिकेवर स्वाक्षरी करावी लागली. मतदारांच्या अधिकारात प्रशासन हस्तक्षेप करू शकत नाही.
- अजय देशमुख, निवडणूक निर्णय अधिकारी

लोकशाहीत मतदानापासून वंचित ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक तर केला नाही याबाबत चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी.विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत पहिल्यांदाच असा प्रकार घडला.
- सत्तेश्वर मोरे, सहसचिव, नुटा

Web Title: 'Senate' election clutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.