मोर्शी तालुक्यातील आले उत्पादक हवालदिल

By Admin | Published: April 20, 2017 12:21 AM2017-04-20T00:21:53+5:302017-04-20T00:21:53+5:30

पारंपारिक पिकातून उत्पन्न मिळत नाही. यामुळे मागील दशकापासून हळद, अद्रक यापिकांचे उत्पादन घेण्यास तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरूवात केली.

Producer Havaldil came from Morshi taluka | मोर्शी तालुक्यातील आले उत्पादक हवालदिल

मोर्शी तालुक्यातील आले उत्पादक हवालदिल

googlenewsNext

दरात कमालीची घसरण : प्रक्रिया उद्योगांबद्दल शेतकरी अनभिज्ञ
मोर्शी : पारंपारिक पिकातून उत्पन्न मिळत नाही. यामुळे मागील दशकापासून हळद, अद्रक यापिकांचे उत्पादन घेण्यास तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरूवात केली. मात्र, आता अद्रकाचे भाव मातीमोल झाल्यामुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
पारंपारिक पिकांना भाव मिळत नसल्याने पिके बदलून व सिंचन साधने आणि कृषीतंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रयोग केले जात आहेत. यामुळे मोर्शी तालुक्यात कपाशी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, मिरची आदी पारंपारिक पिकांचे क्षेत्र घटले आहे तर हळद, अद्रक पिकांची लागवड एक दशकापासून सुरू झाली आहे. आल्याला सुरुवातीच्या काळात भाव मिळाला. त्यामुळे दिवसेंदिवस आल्याची लागवड वाढत गेली. परंतु, उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी बाजारपेठ व प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे आज आल्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
एका एकरात ४० क्विंटल उत्पन्न घेऊनही अल्पदरात विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच उरत नाही. शेतकरी केवळ उत्पादनावरच लक्ष देत आहेत. ते प्रक्रिया उद्योगाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. अद्रकापासून कोणकोणते पदार्थ बनू शकतात, याची माहितीही त्यांना नसल्याचे दिसून येते. आल्यापासून सुंठ, सुंठ पावडर, इतक्यावरच त्याची प्रक्रिया उद्योगाची बाराखडी संपत आहे. याबाबत कृषी विद्यापीठातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच यंत्रसामुग्री उपलब्ध होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)

अद्रकापासून सुंठ, सुंठ पावडर याशिवाय आल्यामध्ये अनेक औषधीगुण आहेत. यावर अभ्यास करून शेतकरी निरनिराळे पदार्थ तयार करू शकतात. याबाबत शेतकऱ्यांना कृषी संशोधन केंद्र, दुर्गापूर, अमरावती यांचेशी संपर्क साधून अधिक माहिती मिळविता येईल व नवी सुरूवात करता येईल.
-प्रकाश ठाकरे
पाणलोटतज्ज्ञ तथा शेतकरी, वाघोली.

उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा कोणत्याच पिकाला मिळत नाही. सुरुवातीला आल्याला चांगला भाव मिळाला. परंतु, आल्याचे आजचे भाव ८ ते ९ रुपये किलो इतके आहेत. ८ रुपये पेरणी ते काढणीपर्यंतचा प्रति किलो खर्च येतो. आज तेवढाही भाव अद्रकाला नाही, यामुळे आम्ही निराश झालो आहोत.
- ज्ञानेश्वर तिडके
अद्रक उत्पादक, मोर्शी

Web Title: Producer Havaldil came from Morshi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.