Plastic flax deformity fire | प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला आग
प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला आग

ठळक मुद्दे२६ तासांनंतर नियंत्रण : नवसारी स्थित सुफीयान नगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवसारी स्थित सुफीयान नगर क्रमांक २ मधील प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा माल भस्मसात झाला. विशेष म्हणजे, ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला २६ तासांपर्यंत परिश्रम घ्यावे लागले.
मोहम्मद अल्ताफ मन्सुरी (रा. मसानगंज, इतवारा बाजार) यांचे हे गोदाम आहे. येथे गोळा झालेले प्लास्टिकचे भंगार गोदामात ठेवण्यात आले होते. बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भंगार गोदामात शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागली. धुराचे लोळ बाहेर दिसताच तात्काळ अग्निशमनला माहिती देण्यात आली. प्लास्टीकचा खच असल्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना परिश्रम घ्यावे लागले. गुरुवारी सकाळी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमनला यश मिळाले.

एक लाख लिटर पाणी
आगीचे भीषण स्वरूप पाहता, अग्निशमनचे मुख्य केंद्र, उपकेंद्र, एमआयडीसी व बडनेरा उपकेंद्राहून बंब बोलाविण्यात आले होते. १० हजार लिटरच्या दोन तसेच चार व पाच हजार लिटरच्या अन्य वाहनांतील पाण्याचा वर्षाव आगीवर करण्यात आला. एक लाख लिटरच्या पाण्याने आग नियंत्रणात आली.


Web Title: Plastic flax deformity fire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.