मनपाचे वाहन खासगी व्यक्तीच्या दिमतीला

By admin | Published: March 23, 2017 12:14 AM2017-03-23T00:14:39+5:302017-03-23T00:14:39+5:30

महापालिकेचे महागडे वातानुकुलित वाहन खासगी व्यक्तीच्या दिमतीला असल्याचे वास्तव उघड झाले आहे.

Municipal vehicles are owned by a private person | मनपाचे वाहन खासगी व्यक्तीच्या दिमतीला

मनपाचे वाहन खासगी व्यक्तीच्या दिमतीला

Next

जनतेच्या पैशांची उधळपट्टी : सदारांना आर्थिक लाभ, कारवाई केव्हा?
अमरावती : महापालिकेचे महागडे वातानुकुलित वाहन खासगी व्यक्तीच्या दिमतीला असल्याचे वास्तव उघड झाले आहे. जनतेच्या पैशांची अशी राजरोस उधळपट्टी सुरू असताना किमान सत्ताधाऱ्यांनी यावर कारवाईचे निर्देश द्यावेत, असा सूर उमटू लागला आहे. जीवन सदार या खासगी व्यक्तीसाठी ही खास तरतूद करण्यात आली आहे.
राजापेठ ओव्हरब्रीजच्या विवक्षित कामासाठी जीवन सदार या सेवानिवृत्त अभियंत्याची कंत्राटी नियुक्ती करण्यात आली. तसेच सहा महिन्यांसाठी त्यांच्याकडे अतिरिक्त शहर अभियंतापदाचा चार्जही देण्यात आला. त्यांची ही कंत्राटी नियुक्ती २८ फेब्रुवारीला संपुष्टात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सदार यांना २८ फेब्रुवारीनंतर एक दिवसाचा खंड देऊन मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, अद्याप त्याफाईलवर आयुक्तांची स्वाक्षरी झालेली नाही. त्यापार्श्वभूमीवर सदार हे कंत्राटी पद्धतीचे का होईना अधिकृतरित्या महापालिकेच्या सेवेत नाहीत. याशिवाय त्यांना कुठलेही प्रशासकीय तथा आर्थिक अधिकारही नाहीत. त्यांना अधिकृतरित्या कागदावर आॅर्डर किंवा मुदतवाढ मिळाली नाही, असे असताना सदार हे प्रशासनासाठी एक खासगी व्यक्ती ठरतात.
याच खासगी व्यक्तीच्या दिमतीला त्यांची मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतर तसेच ते अधिकृतरित्या कुठल्याही विवक्षित कामावर नसताना त्यांना महागडे वातानुकुलित वाहन दिले गेले आहे. १ मार्चपासून ते एमएच २७ ए.ए.- ००६८ या वातानुकुलित वाहनाचा बिनदिक्कतपणे वापर करू लागले आहेत. महापालिकेने आर्थिक परिस्थिती नादारीची असताना व पेट्रोल-डिझेलच्या बचतीबाबत आयुक्तांनी काटकसरीची भूमिका घेतल्याने मोटारवाहन विभाग जीवन सदार या खासगी व्यक्तीच्या दिमतीला महागडे वाहन कसे ठेऊ शकते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कराच्या माध्यमातून येणाऱ्या जनतेच्या पैशाची याखासगी व्यक्तीच्या सुविधेवर लूट केली जात आहे. अन्य अधिकारी-पदाधिकाऱ्यांना परिपत्रक काढून विनंती केली जाते तर दुसरीकडे सदार या खासगी व्यक्तीच्या दिमतीला मागील २० दिवसांपासून अनधिकृतपणे वाहन दिले जाते, यावरून महापालिकेच्या कारभाराची स्थिती लक्षात यावी. (प्रतिनिधी)

मोटार वाहन विभागाचे कानावर हात
सदार यांना दिलेल्या वातानुकुलित वाहनासंदर्भात मोटार वाहन विभागाने कानावर हात ठेवले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ते वाहन त्यांना पुरविले गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, ते वरिष्ठ अधिकारी कोण, याबाबत अद्याप काही स्पष्ट करण्यात आले नाही.

Web Title: Municipal vehicles are owned by a private person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.