परतवाडा (अमरावती), दि.14 - जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी येथे कोसळणा-या महाकाय धबधब्याला प्रचंड पूर येऊन महाकाय दरड कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मात्र, येथे असला कोणताही प्रकार घडला नसून गुरूवारी हजारो भाविकांनी श्रीक्षेत्र मुक्तागिरीला भेट दिली. त्यामुळे दरड कोसळल्याची केवळ अफवा असून पर्यटकांसह जैनबांधवांनी अशा बदनामीकारक व्हायरल व्हिडीओवर विश्वास ठेवू नये, असे प्रबंधकांनी स्पष्ट केले आहे. जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी हे परतवाडा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यांतर्गत येणारे  मुक्तागिरी (मेंढागिरी) चारही बाजूने उंच पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. वर्षभर येथे जैन बांधवांसह इतर पर्यटक लाखोंच्या संख्येने येतात. नागनदीचे पाणी, उंचावरून कोसळणारे धबधबे आणि येथील एकूण ५२ मंदिरे हे येथील वैशिष्ट्य आहे. 

खोडसाळपणाचा प्रकार 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये येथील प्रसिद्ध धबधब्याला पूर आल्याचे व त्यातून लाल रंगाचे मातकट पाणी वाहत असल्याचे आणि त्यामुळे दरड कोसळल्याचे दाखविण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असलेला हा व्हिडीओ खोडसाळपणाचा प्रकार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आठ वर्षांपूर्वी कोसळला होता दगड !
समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर असलेल्या मुक्तागिरीला उंच-उंच पहाडांनी वेढले आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी एक मोठा दगड पहाडावरून कोसळला होता. खाली कोसळताच त्याचे दोन तुकडे झाले व दोन दिशेने गेले. त्यातून अप्रिय घटना टळली, अशी माहिती मुक्तागिरी संस्थानचे प्रबंधक नेमीचंद जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मुक्तागिरी येथे दरड कोसळल्याची घटना घडलेली नाही. मंदिराचे नुकसानही झाले नाही. बदनामीकारक बनावट व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. येथे सर्व सुरळीत आहे. दोन हजारांवर जैनबांधव आणि पर्यटकांनी बुधवारपासून मुक्तागिरीला भेट दिली आहे. 
- नेमीचंद जैन,
प्रबंधक, मुक्तागिरी

दोन ते तीन हजार लोक येथे बुधवारपासून आहेत. विविध राज्यांसह शहरातून आलो आहोत. येथे सर्व व्यवस्थित आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- प्रमोद जैन (वसूर)
बेळगाव, कर्नाटक