अचलपूर तालुक्याचा भूजलस्तर विदर्भात सर्वात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:06 PM2019-04-29T23:06:17+5:302019-04-29T23:06:45+5:30

बोअरवेलद्वारे भूगर्भातील पाण्याचा झालेला अमर्याद उपसा व त्या तुलनेत जलपुनर्भरण होत नसल्याने सध्या अचलपूर तालुक्यातील भूजलस्तरात कमालीची घट आली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या १२.३६ मी. पातळीच्या तुलनेत सध्याची सरासरी पातळी १८.३० मी.पर्यंत कमी झाली आहे.

The lowest water level in Achalpur taluka is lowest in Vidarbha region | अचलपूर तालुक्याचा भूजलस्तर विदर्भात सर्वात कमी

अचलपूर तालुक्याचा भूजलस्तर विदर्भात सर्वात कमी

Next
ठळक मुद्दे‘जीएसडीए’चे निरीक्षण : पाच वर्षांच्या तुलनेत उणे ५.९४ मीटरने पातळीत घट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बोअरवेलद्वारे भूगर्भातील पाण्याचा झालेला अमर्याद उपसा व त्या तुलनेत जलपुनर्भरण होत नसल्याने सध्या अचलपूर तालुक्यातील भूजलस्तरात कमालीची घट आली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या १२.३६ मी. पातळीच्या तुलनेत सध्याची सरासरी पातळी १८.३० मी.पर्यंत कमी झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहीर अहवालात हे धक्कादायक निरीक्षण नोंदविलेले आहे.
जिल्ह्याच्या ऊत्तरेकडील धारणी, चिखलदरा व मध्यापासून दक्षिणेकडील अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, मोर्शी, तिवसा व वरूडचा भाग डेक्कन बेसाल्ट या खडकाचे प्रस्तराने व्याप्त आहे. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, दर्यापूर व भातकुली तालुक्यांमध्ये पूर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे. यातील दर्यापूर भातकुली, अंजनगाव सूर्जी व चांदूर बाजार तालुक्याचा काही भाग खारपाणपट्यात समाविष्ट आहे.
जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाने व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापलेला आहे. याची १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. मात्र, सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या किमान २५ ते २८ टक्के पाऊस कमी होत आहे. त्यामुळे अपेक्षित भूजल पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे लघुपाणलोट क्षेत्रातील (रन आॅफ झोन) निरीक्षण विहिरींतील पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळेच आता या परिसरातील गावांना पाणीटंचाईची झळ पोहचत आहे. मोर्शी व वरूड भाग अतिविकसित पाणलोट क्षेत्र विहिरी व विंधन विहिरीद्वारे अमर्याद पाण्याचा उपसा झाल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. आता अचलपूर व चांदूरबाजार तालुक्याच्या काही भागात हीच स्थिती ओढावली असल्याने भूजल पातळीत कमालीची घट झालेली आहे. सध्याही रबी हंगाम व बहुवार्षिक पिकांसाठी पाण्याचा अमर्याद उपसा होत असल्याने भूजलस्तर दिवसागणिक कमी होत असल्याचे हे निरीक्षण आगामी काळासाठी धक्कादायक ठरणारे आहे.

पावसाचा खंड अन् अमर्याद उपसा
जिल्ह्यात साधारणपणे आॅगस्ट व सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालखंड भूजल पुनर्भरणाचा असतो. मात्र, या कालावधीत पावसाचा प्रदीर्घ खंड राहिल्याने खरिपासाठी भूजलाचा अमर्याद उपसा झाला. परिणामी भूजल पातळीत झपाट्याने घट झाली. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ही स्थिती ओढावली. यंदा भूगर्भाचे पुनर्भरण न झाल्यास या तालुक्याची स्थिती गंभीर होणार आहे. जलयुक्त शिवारची कामेदेखील पारदर्शकपणे होणे या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे.
बोअरने केली भूगर्भाची चाळण
भूजलस्तरात कमी होत असल्याने या तालुक्यातील विहिरींना आता पाणीच नाही. त्यामुळे विंधन विहिरींवर अधिक जोर आहे. त्याद्वारे पुन्हा पाण्याचा अमर्याद उपसा होत आहे. साधारणपणे ४० फुटांपर्यंत वाळूचा थर असतो. त्याखाली ४० फुटांपर्यंत चोपन व काळ्या मातीचा थर व पुन्हा ११० ते १२० फुटांपर्यंत वाळूचा थर, अशी साधारण येथील रचना आहे. मात्र, बोअरद्वारे पाणी उपस्याच्या तुलनेत पुनर्भरण होत नसल्याने या तालुक्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे वास्तव पुढे येऊ लागले आहे.
अचलपूर, चांदूरबाजार तालुक्याची भूजलस्तर स्थिती
१ अचलपूर ताालुक्यात सात निरीक्षण विहिरींची पाच वर्षांतील मार्च महिन्याची सरासरी पातळी १२.३६ मीटर आहे. त्यातुलनेत यंदा याच महिन्यात १८.३० मीटर झालेली आहे. म्हणजेच उणे ५.९४ मी. एवढी तूट सध्या आहे.
२ चांदूर बाजार तालुक्यात सात निरीक्षण विहिरींची पाच वर्षांतील मार्च महिन्याची सरासरी स्थिर पातळी ११.७३ मीटर आहे. त्यातुलनेत यंदा याच महिन्यात १५.४० मीटर झालेली आहे. म्हणजेच उणे ३.६७ मी. एवढी तूट सध्या आहे.

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाल्याने पुनर्भरण होण्याच्या काळात उपसा झाला व सध्याही बोअरद्वारे अमर्याद उपसा होत आहे. त्यामुळे भूजल पातळीत घट झाली. मात्र, जलयुक्तच्या कामांमुळे गतवर्षीच्या तलनेत स्थिरता आहे.
- विजय कराड,
वरिष्ठ भूवैज्ञानिक, जीएसडीए

Web Title: The lowest water level in Achalpur taluka is lowest in Vidarbha region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.