सत्ताधीशांची बेअब्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:58 PM2018-05-28T23:58:35+5:302018-05-28T23:58:50+5:30

तत्कालीन स्थायी समिती सभापती तुषार भारतीय पुरस्कृत एकल कंत्राटाचा निर्णय विद्यमान सभापतींनी फिरविल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. भाजपच्या ज्या सत्ताधीशांनी वर्षभरापूर्वी एकल कंत्राटासाठी जंगजंग पछाडले, त्याच सत्ताधीशांना आता प्रभागनिहाय पद्धतीचा पुरस्कार करण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे.

Lords of rulers | सत्ताधीशांची बेअब्रू

सत्ताधीशांची बेअब्रू

Next
ठळक मुद्देकलोतींनी फिरविला निर्णय : एकल कंत्राटाने भाजपमधील अंतर्गत वाद उघड

प्रदीप भाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तत्कालीन स्थायी समिती सभापती तुषार भारतीय पुरस्कृत एकल कंत्राटाचा निर्णय विद्यमान सभापतींनी फिरविल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. भाजपच्या ज्या सत्ताधीशांनी वर्षभरापूर्वी एकल कंत्राटासाठी जंगजंग पछाडले, त्याच सत्ताधीशांना आता प्रभागनिहाय पद्धतीचा पुरस्कार करण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे.
स्थायी समिती सभापती विवेक कलोती यांनी २५ मे रोजीच्या स्थायीच्या बैठकीत दैनंदिन स्वच्छतेचे १५० कोटींचे कंत्राट रद्द केले. आता जूनच्या आमसभेत त्यावर अंतिम निर्णय होईल तेव्हा माजी स्थायी सभापती तुषार भारतीय आणि एकल कंत्राटाचे अन्य पुरस्कर्ते नेमकी कुठली भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता, एकल कंत्राट रद्द केल्याचा दावा कलोती करीत असले तरी त्यात फारसा दम नाही. ज्यावेळी तुषार भारतीय यांनी एकल कंत्राटाचा प्रयोग राबविण्यासाठी स्थायीत प्रस्ताव आणला, त्याच वेळी कलोतींचा या प्रयोगाला विरोध होता. भाजपमधील अनेकांना ते पटलेले नव्हते. स्वच्छता कंत्राटदारांची मोनोपॉली मोडून काढण्यासाठी भारतीय यांनी या नव्या कंत्राट पद्धतीचा जोरदार पाठपुरावा केला. एवढेच काय तर भाजपच्या सर्व सदस्यांचे समर्थन मिळवून आमसभेत एकल कंत्राटाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करून घेतला. त्यासाठी निविदाप्रक्रिया करण्यात आली. मात्र, ही प्रक्रिया वर्षभर निर्णयात अडकून ठेवण्यात आली आणि कंत्राट रद्द करून पुन्हा प्रभागनिहाय कंत्राटदार नेमण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आला.
कलोतींच्या निर्णयाने भारतीय नव्हे, तर भाजपची भूमिका चुकीची ठरविली गेली. शहर भाजपमध्ये आ. सुनील देशमुख आणि तुषार भारतीय यांना मानणारे दोन स्वतंत्र गट आहेत. त्यात आता विवेक कलोती यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटाचा उदय झाला आहे. विशेष म्हणजे, १६ सदस्यीय स्थायी समितीतील भाजप सदस्यांनी भारतीय यांच्या भूमिकेचा जोरदार पुरस्कार केला होता. त्यातील आशिष अतकरे, चंद्रकांत बोमरे हे क्रियाशील सदस्य स्थायीत विराजमान आहेत. भारतीय ‘माजी’ होताच त्यांनीही कालपरवाच्या स्थायीत कलोतींच्या निर्णयाला विरोध दर्शविला नाही. यावरून भाजपमधील कोणता सदस्य कुणाकडे झुकतोय, हे स्पष्ट झाले आहे. एकल कंत्राटाचा निर्णय एकट्या भारतीय यांचा नव्हता; तो भाजपचा सांघिक निर्णय होता. त्यासाठी किमान भाजप सदस्यांनी एकजूट दाखवावी, असे फर्मान आल्याने बाळासाहेब भुयार, धीरज हिवसे यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला. आता भाजपचा तो सांघिक निर्णय कलोतींनी बदलल्याने पक्षातील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे.
प्रशासनाची कोंडी
एकल कंत्राट रद्द करून जुनीच पद्धत अवलंबवायची होती, तर सत्ताधीशांनी त्याबाबतचा निर्णय वर्षभर का प्रलंबित ठेवला? स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांवरून प्रशासनावर आगपाखड होत असताना आणि कंत्राटदार उपकारासारखे काम करीत असताना, सत्ताधीशांनी वेगळा असा कोणता निर्णय घेतला, असा प्रश्न प्रशासनातून उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: Lords of rulers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.