महानगरात ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:34 PM2017-12-31T23:34:43+5:302017-12-31T23:36:16+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी महिन्यात होणाºया स्वच्छ सर्वेक्षणासाठी अमरावती सज्ज झाले आहे.

Jagar of 'Clean Survey' in the metropolis | महानगरात ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चा जागर

महानगरात ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चा जागर

Next
ठळक मुद्देमनपा प्रशासन कामाला : जनजागृतीवर भर, स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत
अमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी महिन्यात होणाºया स्वच्छ सर्वेक्षणासाठी अमरावती सज्ज झाले आहे. देशभरातील ४०४१ शहरांमध्ये होणाऱ्या या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या शंभरात येण्याचा संकल्प महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यानी केला असून त्यासाठी सोशल मिडीयाचा वापरही प्रभावीेपणे केला जात आहे.या अभियानात अमरावतीकरांचा सहभाग वाढावा, यासाठी पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी कर्मचारी स्वच्छतेसाठी जनजागृती करीत आहेत.
जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये ४ हजार गुणांचे स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले असून गतवर्षी या परीक्षेत शहर २३१ क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र प्रशासन व पदाधिकारी हातात हात घालून स्वच्छ सर्वेक्षणात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ब्रँन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून अभिनेता भारत गणेशपुरे यांनी तरुणाईला साद घालत शहरातील महाविद्यालये पालथी घातली. इंदूरने स्वच्छतेत पहिला क्रमांक पटकाविला तो निव्वळ लोकसहभागातून. तोच लोकसहभाग अमरावतीकरांना द्यावा, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नरत आहे. शहरातील सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, क्रेडाई, क्लब, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आदींच्या बैठकी, कार्यशाळा घेऊन त्यांना स्वच्छ सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती देण्यात आली. कचरा विलगीकरण, इतवारा व सुकळी येथे कचºयावर प्रक्रिया करण्याचे छोटेखानी प्रकल्प साकारण्यात आले. महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग प्रभावीपणे प्रचार व प्रसार करताना दिसत आहे. अल्प मनुष्यबळ व मर्यादित साधनसामुग्रीवर मात करत स्वच्छतेसाठी विद्यार्थी या महत्त्वपूर्ण घटकाचे सहकार्य घेण्यात येत आहे. स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावरील तक्रारींचा निपटारा करणे, अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असणे यावर ४०० गुण आहेत. शहरात आतापर्यत १३ हजारांहून अधिक सवच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले असून उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाने यश प्राप्त केले आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची माहिती प्रत्येक नागरिकाला व्हावी, यासाठी मॉल, मंगल कार्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यालये, पोहोचून स्वास्थ्य निरीक्षक जनजागृती करीत आहेत.
सोशल मीडिया प्रभावी
स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे नेमके काय, याबाबत लोकांना माहिती व्हावी, यासाठी महापालिका फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप या माध्यमांचा वापर करीत आहे. महापालिका आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, सभागृहनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, बसप, शिवसेना, एमआयएमचे गटनेता, वैेद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, एसबीएमच्या समन्वयक श्वेता बोके , स्वच्छता अधिकारी अजय जाधव, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, स्वास्थ्य निरीक्षक स्वच्छ सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अमरावतीकरांनी ‘आपले अभियान ’म्हणून महापालिकेला सहकार्य करावे, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासन व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Jagar of 'Clean Survey' in the metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.