गैरहजर भावेश आवारात पडला कसा?

By admin | Published: August 31, 2016 12:08 AM2016-08-31T00:08:27+5:302016-08-31T00:08:27+5:30

शहरापासून शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील गोविंद गुरुकुल आश्रमशाळेत भावेश माकोडे हा इयत्ता तिसरीत शिकतो.

How did the absence of abscesses fall in the premises? | गैरहजर भावेश आवारात पडला कसा?

गैरहजर भावेश आवारात पडला कसा?

Next

गोविंद गुरुकुल आश्रम शाळाप्रकरण : समाजकल्याण अधिकारी झोपेत
सुमित हरकुट चांदूरबाजार
शहरापासून शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील गोविंद गुरुकुल आश्रमशाळेत भावेश माकोडे हा इयत्ता तिसरीत शिकतो. २४ आॅगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजतादरम्यान तो वसतिगृहात वरच्या मजल्यावरून खाली कोसळला. मात्र ही दुर्घटना घडली त्याच दिवशी वसतिगृहाच्या हजेरी पुस्तिकेत भावेश गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. तो गैरहजर असताना वसतिगृहाच्या आवारात ही दुर्घटना घडली कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
भावेश हा विद्यार्थी खाटीक समाजाचा रिद्धपूर याच गावातील रहिवासी असून त्याला वसतिगृहातील निवासी विद्यार्थी दाखविण्यात आले आहे. वसतिगृहाच्या हजेरी पुस्तकानुसार त्याचा अनुक्रमांक वर्ग तिसरीमधील ५० वर त्याच्या नावाची नोंदही आहे. नियमानुसार स्थानिक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देता येत नाही. विशेष बाब अशी की, वसतिगृहाच्या हजेरी पटावर मागील संपूर्ण दिवस वसतिगृहात उपस्थित असणाऱ्या भावेशला घटनेच्या दिवशी शाळेत हजर असतानाही वसतिगृहामध्ये गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. २४ आॅगस्टला उपस्थितीच्या रकाण्यात त्याच्या नावापुढे कोणतीच नोंद घेण्यात आली नाही. असे का करण्यात आले, याचे उत्तर शाळा प्रशासन देऊ शकले नाही.
या घटनेनंतर संबंधित वसतिगृहाचा हजेरी पटाचे २६ आॅगस्टच्या सायंकाळी अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, २५ व २६ आॅगस्ट या दोन दिवसांच्या वसतिगृहातील उपस्थित विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या नव्हत्या. या नोंदी का घेण्यात आल्या नाहीत हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. या वसतिगृहात एकूण १२० विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण महिनाभर १२० विद्यार्थी उपस्थित असल्याचे दाखविण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी ३० विद्यार्थी अनुपस्थित दाखविण्यात आले. परंतु सलग तीनदिवस वसतिगृहाची पाहणी केली असता प्रत्यक्ष ५० ते ५५ विद्यार्थी वसतिगृहात उपस्थित असल्याचे आढळून आले आहेत.
याविषयी संबंधितांकडून माहिती घेतली असता विद्यार्थी राखी पौर्णिमेनिमित्त गावाला गेली असल्याचे सांगण्यात आले. सलग आठ दिवस विद्यार्थी गैरहजर असतानासुद्धा हजेरीपटावर १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखविण्यात आली आहे. मग घटनेच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी गैरहजर कसे? ही किमया शाळेच्या कर्तबगार मुख्याध्यापकांनी केली असावी, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविली जात आहे.

समाजकल्याण अधिकारी केव्हा देणार भेट ?
या आश्रमशाळेत इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही समाजकल्याण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची घटना माहिती असूनही वसतिगृहाला साधी भेटही दिली नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर २६ आॅगस्ट रोजी येणारे समाजकल्याण अधिकारी आजवर वसतिगृहापर्यंत पोहोचू शकले नाहीत, यामागील खरे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांची पडताळणी आवश्यक
गोविंद गुरुकुल आश्रमशाळेतील १२० निवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जातीनिहाय प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावरून चौकशी होणे गरजेचे आहे. या वसतिगृहाला व्हीजेएनटीची मान्यता प्राप्त असताना या विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्यात आला आहे काय, याची प्रामाणिक चौकशी झाल्यास या आश्रमशाळेतील प्रवेश व देण्यात येणाऱ्या सुविधा उघडकीस येईल, हे मात्र निश्चित.

Web Title: How did the absence of abscesses fall in the premises?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.