उतरत्या वयात कसे व्हायचे ‘स्मार्ट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:47 PM2019-07-15T23:47:18+5:302019-07-15T23:48:02+5:30

आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची.

How to become a descending age 'smart'? | उतरत्या वयात कसे व्हायचे ‘स्मार्ट’?

उतरत्या वयात कसे व्हायचे ‘स्मार्ट’?

Next
ठळक मुद्देटेबल एक अन् लाभार्थी शंभर : शासनाच्या बडग्यामुळे असुविधा वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची. एकच टेबल असल्यामुळे रांगेत तिष्ठत बसण्यापासून सुटका नाही आणि काही चुकलेच, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर व्हावे लागते. ६५ वर्षांवरील नागरिकांची ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलत पास अर्थात स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी अमरावतीच्या मध्यवर्ती आगारात होत असलेली आबाळ दुर्दैवी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी सोमवारी रांगेत लागलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केली.
‘लोकमत’ची चमू सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता आगाराच्या पास वितरण विभागात दाखल झाली, त्यावेळी अमरावतीसह टाकरखेडा संभू, साऊर, रामा, आसरा, भातकुली, देवरा देवरी, पोहरा, जळका शहापूर, माहुली आदी भागातून आलेले सुमारे शंभरावर ज्येष्ठ नागरिक रांगेत लागले होते. एक-एक क्रमांक सरकायला किमान २० मिनिटे ते अर्धा तास लागत असल्याचे पाहून त्यांचे धैर्य सुटले होते. काही जण सकाळी ७ च्या एसटीने आले होते, तर काही जणांनी त्यासाठी अमरावतीत मुक्काम केला होता. दुपारी पाऊण वाजेपर्यंत म्हणजे पाच तासांनंतरही अवघ्या ३० व्यक्तींची कागदपत्रे घेण्यात आले होते. दरम्यान, रमेश अंबुलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलचा एसएमएस डेटा डिलीट करण्याच्या सूचना दिल्या. हे काय नवीन, असे वृद्धांना होऊन गेले. अखेरीस पास काढण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांना मदत केली.
अशी आहे प्रक्रिया
५ मार्च २०१९ पासून स्मार्ट कार्डसाठी कागदपत्रे घेण्यास सुरूवात झाली. शासनाने सांगितलेली आधार कार्ड, इलेक्शन कार्ड व मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. याआधारे संगणकात नोंदणी झाल्यानंतर ओटीपी क्रमांक मिळतो. त्या क्रमांकाची नोंद झाली, की प्रक्रिया पूर्ण. त्यानंतर पोस्टाने घरपोच स्मार्ट कार्ड मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुदतवाढीचा कुणालाच नाही पत्ता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ५ जुलै रोजी तातडीचे पत्र काढून ३१ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात मुदतवाढ दिली आहे. तथापि, याबाबत भिंतीवरील पत्रकाशिवाय कुठेच जनजागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची दररोज गर्दी होत आहे. याबाबत विविध माध्यमांद्वारे प्रसाराची गरज आहे.
नवीन मोबाईलच आणला
आसरा येथील राजाराम डोंगरे हे रविवारी स्मार्ट कार्डसंबंधी दस्तावेज देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याकडील मोबाइल कुणाचा, अशी विचारणा झाली, तसेच रांगेत असलेल्याच्या मालकीचा मोबाइल असायला हवा, असे सांगण्यात आले. परिणामी नवाकोरा मोबाइल विकत घेऊन ते सोमवारी रांगेत दाखल झाले.
एकच टेबल
ज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्डसंबंधी कागदपत्रांसाठी रोज मोठी रांग लागत असून, कागदपत्रे स्वीकारण्यासाठी एकच टेबल दिल्याची तक्रार टाकरखेडा मोरे येथील ओंकार मोरे यांनी केली. आसार येथील प्रमोद देशमुख यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. तथापि, शासनाकडून तसे निर्देश असून, टेबल वाढविण्यास आम्ही असमर्थ असल्याचे वाहतूक नियंत्रक जयंत मुळे म्हणाले.
दोन स्नॅपनंतर फिरायला लागला पंखा
मध्यवर्ती बस स्थानकात पास वितरण खिडकीकडून अनेक वर्षांपासून फलक लागलेले असल्याने बाहेरची हवी फार कमी आत येते. उकाड्यामुळे अंग चिकट झालेल्या वयोवृद्धांनी पंखा लावण्यासाठी आधीच विनवणी केली होती. मात्र, ‘लोकमत’च्या कॅमेºयाचे स्नॅप पडण्यापूर्वी त्यांच्या विनंतीला मान मिळाला नाही. दोन स्नॅपनंतर मात्र पंखा फिरायला लागला.
आजी-आजोबा त्रस्त
बीबीजान (टाकरखेडा संभू), निर्मला चेंडकापुरे, रमाबाई चव्हाण, शे. हसन शे. महबूब (अमरावती), शंकरराव नांदणे, सरूबाई नांदणे (देवरा), यशोदा दहाट, सुमन टवरे, (जळका शहापूर), इंदूबाई सोनटक्के (यावली), श्रीराम गायकवाड, पुनाबाई गायकवाड (साऊर), पंचफुला सोनोने (पोहरा)येथून आलेले बहुतांश ज्येष्ठ नागरिक रांगेत त्रस्त झाले होते.

प्रिंटर बंद पडल्याने प्रक्रिया खोळंबली. एरवी पाच-सात मिनिटांत एक अर्ज घेतला जातो. मात्र, काही जण मोबाइलऐवजी चिठ्ठी घेऊन येतात. त्यांचा नंबर कुठून घ्यावा? एक ते दीड सेकंदच ओटीपी अस्तित्वात राहतो. स्मार्ट कार्डसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अवधी आहे.
- रमेश अंबुलकर,
वाहतूक नियंत्रक

Web Title: How to become a descending age 'smart'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.