-ही तर आरोग्य यंत्रणेची दडपशाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:27 PM2017-10-08T23:27:40+5:302017-10-08T23:28:06+5:30

खासगी पॅथॉलॉजी व खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूबाबतच्या ‘रॅपिड व अन्य प्राथमिक चाचण्या’ जिल्हा आरोग्य यंत्रणेने ‘अनकन्फर्मेटिव्ह’ (अविश्वसनीय) ठरविल्याने डॉक्टरांमधून संताप व्यक्त होत आहे.

Even the oppression of the health system! | -ही तर आरोग्य यंत्रणेची दडपशाहीच !

-ही तर आरोग्य यंत्रणेची दडपशाहीच !

Next
ठळक मुद्देडॉक्टरांचा सूर तीव्र : डेंग्यूच्या चाचण्यांवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी पॅथॉलॉजी व खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूबाबतच्या ‘रॅपिड व अन्य प्राथमिक चाचण्या’ जिल्हा आरोग्य यंत्रणेने ‘अनकन्फर्मेटिव्ह’ (अविश्वसनीय) ठरविल्याने डॉक्टरांमधून संताप व्यक्त होत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार निदान करण्यात आलेल्या रुग्णांना बाधित संबोधायचे नाही काय, अशी विचारणा डॉक्टरांकडून होत आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाºया ‘नॅशनल हेल्थ पोर्टल’वर डेंग्यू एनएस वन अ‍ॅन्टीजेन ही चाचणी डेंग्यू तापाच्या निदानासाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट ही अ‍ॅन्टी डेंग्यू तपासणीची विशिष्ट पद्धत असल्याचेही केंद्रीय आरोग्य खाते मान्य करते, तर एका खासगी डॉक्टरकडे दाखल असलेल्या रुग्णांच्या संबंधित टेस्ट पॉझिटिव्ह आल्या असताना आपण कुठल्या वैद्यकशास्त्रानुसार डेंग्यूचे निश्चित निदान केले, अशी विचारणा केली जाते, असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. ही विचारणा नव्हे, तर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची दडपशाही असल्याची प्रतिक्रिया खासगी डॉक्टरांमध्ये उमटली आहे.
डेंग्यूबाधितांची खरी आकडेवारी समाजासमोर येऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जाता कामा नये, यासाठीच सरकारी यंत्रणेकडून यवतमाळच्या सेंटिनेल सेंटरमधून येणाºया अहवालाचा बागूलबुवा केला जात असल्याचा आरोप यानिमित्ताने होऊ लागला आहे. डेंग्यूची साथ अधिक झपाट्याने पसरु नये, लोकांनी खबरदारी घ्यावी यासाठी माध्यमांना डेंग्यू पॉझिटिव्हबाबत माहिती देण्यात आली. यात खळबळ किंवा पॅनिक परिस्थिती निर्माण करण्याचा हेतू नव्हता. तथापि खासगी पॅथॉलॉजीतील रिपोर्ट डेंग्यूच्या निदानाकरिता ग्राह्य धरता येणार नाही, असा दावा जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप अधिकारी करतात. खासगी डॉक्टरांनी स्थानिक आरोग्य प्रशासनाचे आदेश ग्राह्य धरायचे की, केंद्र शासनाच्या गाईडलाईननुसार डेंग्यू संशयितांचे निदान करायचे, अशी संभ्रमावस्था जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांमध्ये निर्माण झाली आहे.
डेंग्यूच्या अचूक निदानासाठी यवतमाळचे सेंटिनल सेंटरमधून तपासणी करुन आलेल्या रक्तजलनमुन्यांचा अहवाल जर डेंग्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ठरवत असेल तर डेंग्यू निदानासाठी केंद्र शासनाकडून मान्य करण्यात आलेली एनएस १ अ‍ॅन्टीजेन स्थानिक आरोग्य प्रशासनाला मान्य नाही काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. डेंग्यूच्या निदानासाठी केंद्र आजाराच्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूच्या निदानासाठी डेंग्यू एनएस अ‍ॅन्टीजेन ही टेस्ट उपयुक्त ठरत असल्याचे ‘नॅशनल हेल्थ पोर्टल’ (एनएचपी)वर स्पष्ट करण्यात आले आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णांना डेंग्यू पॉझिटिव्ह म्हटल्याचा दावा डॉ. निचत यांनी केला होता. त्यांना महापालिकेतर्फे खुलासा मागविण्यात आला होता.
रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट ही योग्य प्रणाली
रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट ही विशेष रुपाने अँटीडेंग्यू आयजीजी आणि आयजीएम अँटीबॉडीची तपासणी करण्यासाठी एक योग्य प्रणाली असल्याचे नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. डॉ.निचत यांनीसुद्धा त्यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची डेंग्यू आयजीएम टेस्ट केली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी डेंग्यू पॉझिटिव्हचा दावा केला होता.

Web Title: Even the oppression of the health system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.