मेळघाटात पुन्हा बालमृत्यू : आरोग्यमंत्र्यांचा दौरा निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 12:54 PM2022-12-17T12:54:02+5:302022-12-17T12:58:43+5:30
वादग्रस्त टेम्ब्रुसोंडा आरोग्य केंद्रातील जामलीचे उपकेंद्राचे कुलूपबंद
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जामली आर येथे गुरुवारी वैदिक राजेश जामूनकर या दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्याला आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मागील सहा महिन्यांपासून येथील उपकेंद्र डॉक्टरविना असून, त्याला टाळे लागले आहे. आरोग्यमंत्र्यांनी केलेला दौरा मेळघाटसाठी निष्फळ ठरल्याचे या घटनेने पुढे आली आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यानंतर मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सतर्क होईल आणि रिक्त जागा लवकर भरल्या जातील, ही अपेक्षा फोल ठरली आहे. बालमृत्यूमुळे मेळघाट गाजत असताना जामली आर येथील दोन महिन्यांच्या वैदिक जामूनकर या चिमुकल्याचा मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. मेळघाटातील रुग्णवाहिका बीअर बार व धाब्यावर डॉक्टरांच्या जेवणाच्या पार्टीसाठी उभ्या राहत असताना दुसरीकडे नागपूर येथून चिमुकल्याचा मृतदेह आणण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न करून देण्याचा प्रतापसुद्धा याच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घडला. संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे.
महिन्याला एक बालमृत्यू
टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जामली आर येथेही आरोग्य उपकेंद्र आहे; पण येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी तसेच एएनएमची जागा सहा महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे लहान बाळ तसेच गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारं कोणीच नाही. महिन्याला एका बालमृत्यूची घटना घडत आहे. तरीसुद्धा आरोग्य यंत्रणा कागदोपत्रीच ओके दाखवून प्रत्यक्षात आदिवासींच्या जिवावर उठली आहे.
इतरही रुग्ण वाऱ्यावर
जामली आर गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. निवासी मुलांची आश्रमशाळा आहे. गावात दररोज १० ते १५ मुलांना आजार उद्भवतात; परंतु उपकेंद्रच आजारी पडले आहे. परिणामी मुलांसह गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणी होत नाही.
जामली आर येथील उपकेंद्रात डॉक्टर नाही; परंतु एमपीडब्ल्यू आणि आरोग्य सेविका नेमणूक केली आहे. आजारी असल्याने सुटीवर आहे. वरिष्ठांना तशी माहिती पाठवली आहे.
- सतीश प्रधान, तालुका आरोग्य अधिकारी
आजारी अवस्थेत भूमकाकडे उपचारासाठी नेले होते. आजार आणि कशामुळे मृत्यू झाला, यासंदर्भात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे.
- डॉ. प्रवीण परिसे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा