अमरावती विभागातील ९ हजार २१० संस्थांची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 08:19 PM2018-01-01T20:19:01+5:302018-01-01T20:19:01+5:30

नोंदणीकृत संस्थांनी पाच वर्षे उलटूनही आॅडिट रिपोर्ट व संस्थेत झालेल्या बदलाचे अर्ज सादर न केल्यामुळे विभागातील ९ हजार २१० संस्थांची नोंदणी रद्द  करण्यात आली आहे.

9 thousand 210 registered organizations in Amravati division have been canceled | अमरावती विभागातील ९ हजार २१० संस्थांची नोंदणी रद्द

अमरावती विभागातील ९ हजार २१० संस्थांची नोंदणी रद्द

Next

अमरावती : नोंदणीकृत संस्थांनी पाच वर्षे उलटूनही आॅडिट रिपोर्ट व संस्थेत झालेल्या बदलाचे अर्ज सादर न केल्यामुळे विभागातील ९ हजार २१० संस्थांची नोंदणी रद्द  करण्यात आली आहे. सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. 
     धर्मादाय संस्था स्थापन करण्यापूर्वी संबंधितांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे. विभागात अंदाजे लाखांवर संस्था नोंदणीकृत असून, आॅक्टोबर ते डिसेंबरपर्यंत यापैकी ९ हजार २१० संस्थांच्या नोंदणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. ज्या संस्थांनी नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंत आॅडिट रिपोर्ट व संस्थेत झालेल्या बदलासंदर्भात अर्ज दाखल केले नाहीत, अशा संस्था अवसायनात निघाल्या आहेत. एकदा संस्थेची नोंदणी झाल्यानंतर अनेकांचे  कामकाज बंद स्थितीत, तर काही संस्था केवळ नावापुरत्याच असल्याचे निदर्शनास आले आहे. शासननिर्णयानुसार अशा सर्व संस्थांची पडताळणी करण्याचे आदेश सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यानुसार अमरावती विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त व धर्मादाय उपायुक्त यांच्या न्यायालयात संस्थांविषयी कामकाज सुरू होते. संस्थांची मान्यता रद्द केल्याचा अहवाल मुंबई येथील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला  आहे. 
बॉक्स
रद्द झालेल्या संस्थांची आकडेवारी
अमरावती - ५३८४
अकोला - १४६०
बुलडाणा - २०
वाशिम - १३८४
यवतमाळ - ९६२
बॉक्स
अमरावतीतील सर्वाधिक  संस्थांची नोंदणी रद्द
अमरावती जिल्ह्यात सुमारे २५ हजार संस्था नोंदणीकृत असून, त्यामध्ये शिक्षण संस्था, वाचनालय, व्यायाम मंडळ, महिला मंडळ, बचतगटांसह काही संस्थांचा समावेश आहे. या संस्थांची पडताळणी केल्यानंतर १७ हजार संस्थांची नोंदणी रद्द केली जाणार होती. दरम्यानच्या कालावधीत काही संस्थांनी वेळेवर आॅडिट रिपोर्ट व संस्था बदलासंदर्भात अर्ज सादर केल्यामुळे कारवाई करण्यात आली नाही.  अमरावती जिल्ह्यातील ५ हजार ३८४ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून, विभागात ही संख्या सर्वाधिक आहे.

Web Title: 9 thousand 210 registered organizations in Amravati division have been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.