कागदावर २००, प्रत्यक्षात १० ते १२ शल्यक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:21 AM2018-01-10T00:21:47+5:302018-01-10T00:22:17+5:30

दिवसाकाठी २०० भटक्या श्वानांवर शल्यक्रिया करून त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण राखण्याच्या महापालिकेच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.

200 on paper, actually 10 to 12 surgeries | कागदावर २००, प्रत्यक्षात १० ते १२ शल्यक्रिया

कागदावर २००, प्रत्यक्षात १० ते १२ शल्यक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देश्वान निर्बीजीकरणातील अनियमितता चौकशी समितीचा धक्कादायक निष्कर्ष

आॅनलाईन लोकमत
अमरावती : दिवसाकाठी २०० भटक्या श्वानांवर शल्यक्रिया करून त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण राखण्याच्या महापालिकेच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे. प्रत्यक्षात कोंडेश्वर येथील शल्यचिकित्सागृहात दिवसाला केवळ १० ते १२ श्वानांवर निर्बीजीकरण शल्यक्रिया करण्यात आल्याचा धक्कादायक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. या संपूर्ण प्रकरणातील लाखो रुपयांच्या अनियमिततेबाबत अहवाल ही समिती जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आयुक्तांना सुपूर्द करेल.
महापालिका क्षेत्रात मागील १५ ते १६ महिन्यांत नऊ हजार श्वानांवर निर्बीजीकरण शल्यक्रिया झ्राल्याचे दर्शवून तब्बल ६७ लाख रुपयांची उचल करण्यात आली. सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे हे यात संशयाच्या केंद्रस्थानी आहेत. नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर चौकशी समितीच्या एका सदस्याने ही माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजचा ‘एकजिनसीपणा’ही संशयास्पद आहे.
‘श्वान निर्बीजीकरणात लाखोंचा भ्रष्टाचार’ या वृत्तमालिकेतून ‘लोकमत’ने ही अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. विरोधी पक्षनेता बबलू शेखावत आणि आ. रवि राणा यांनी या प्रकरणी महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले होते. त्याअनुषंगाने महापालिकेने १८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात केली होती. त्या समितीकडून सुरू करण्यात आलेल्या सर्वंकष चौकशीला आता अंतिम रूप देण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, मुख्य लेखापरीक्षक प्रेमदास राठोड, मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे, सहायक आयुक्त योगेश पिठे आणि सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे सदस्य असलेल्या चौकशी समितीने कोंडेश्वर येथील श्वान शल्यक्रिया केंद्रात जाऊन अनियमिततेची वस्तुस्थिती जाणून घेतली. बोंद्रे यांना हाताशी धरून या ६७ लाख रुपयांवर कुणी डल्ला मारला, याच्या तळापर्यंत जाण्यासाठी चौकशी समिती सरसावली असताना, बोंद्रे यांच्याकडून चौकशी समितीला दस्तऐवजाबाबत सहकार्य मिळत नसल्याने समितीला मर्यादा आल्या आहेत.
रजिस्टरवर दरदिवशी २०० शस्त्रक्रिया दाखविण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ १० ते १२ श्वानांवर शस्त्रक्रिया केल्याचे समितीला दिसले. पकडून आणलेल्या श्वानांवर खरीखुरी शस्त्रक्रियाच करण्यात आली की तसा भास निर्माण करण्यात आला, याबाबतही संदिग्धता आहे. सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे हे सीसीटीव्ही फुटेज व त्यासंबंधीच्या लेखी नोंदींची पडताळणी करीत आहेत. मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे व मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड हे लेखाविषयक तपासणी करीत आहेत.
लक्षवेधीवर चर्चाच नाही, गुढ उकलणे शक्य
श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करून आ. रवि राणा यांनी याप्रकरणी लक्षवेधी लावली होती. त्यासंबंधाने महापालिकेला माहितीही मागविण्यात आली. मात्र, यावर चर्चाच झाली नाही. आपली महापालिका म्हणून आ.राणा यांची सहानूभूती मिळविण्यात दोषींचा एक कंपू यशस्वी झाला. यातील दोषींवर शिक्कामोर्तब झाल्यास आणि पोलिसांनीही प्रकरणाची पाळेमुळे खणून काढल्यास इतरही गूढ उलगडू शकेल.

Web Title: 200 on paper, actually 10 to 12 surgeries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.