गिरवित गेले खडू अन् लावला शिक्षणाचा लळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:22 PM2019-02-24T12:22:57+5:302019-02-24T12:24:11+5:30

- नितीन गव्हाळे   अकोला : सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. ज्याच्याकडे पैसा, त्याचे शिक्षण , असे समीकरणच बनले. ...

Teacher give free education to sudents | गिरवित गेले खडू अन् लावला शिक्षणाचा लळा...!

गिरवित गेले खडू अन् लावला शिक्षणाचा लळा...!

Next

- नितीन गव्हाळे

 अकोला: सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. ज्याच्याकडे पैसा, त्याचे शिक्षण, असे समीकरणच बनले. गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांच्या मुला-मुलींकडे शिकवणीसाठी पैसा नसल्यामुळे त्यांना चांगल्या शिकवणी, शाळेपासून वंचित राहावे लागते. लाखो रुपये भरा आणि शिकवणी वर्गांना प्रवेश घ्या, अशा परिस्थितीत गोरगरीब विद्यार्थी जाणार कुठे, परंतु या प्रश्नाचे उत्तर सेवाभावी वृत्तीच्या एका शिक्षकाने शोधले. त्यांनी सुटीचा दिवस वाया जाऊ न देता, शाळेतील गोरगरीब विद्यार्थिनींसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू करून त्यांना शिक्षणाचा लळा लावला.
गिरवित गेले शुभ्र खडू अन् लावला शिक्षणाचा लळा....शिकविताना कधी मनात आणला नाही काळा फळा.... अशा या शिक्षकाचे नाव ओरा श्रावण चक्रे. प्राजक्ता कन्या शाळेत २३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करणारे ओरा चक्रे खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षक आहेत. कबड्डी खेळाचे प्रशिक्षक, विज्ञान, गणित तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. ‘एनसीईआरटी’च्या कार्यशाळेत जाऊन शिक्षकांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती वाटते. ती दूर करण्यासाठी चक्रे हे धडपड करतात. अंककोडे, आकडेमोड, छोटी-छोटी उदाहरणे समजावून सांगत, विद्यार्थ्यांना गणिताची, विज्ञान विषयाची गोडी निर्माण करतात. त्यासाठी गमतीशीर पाढे, जम्पिंग रेससारख्या उपक्रमातूनही ते गणिताची भीती घालविण्याचा प्रयत्न करतात. गोरगरीब विद्यार्थिनी पैशांअभावी, परिस्थितीमुळे हजारो रुपये खर्च करून शिकवणी वर्ग लावू शकत नाही. परिणामी, स्पर्धेत या विद्यार्थिनी मागे पडतात. ही बाब हेरून प्राचार्य सागर देशमुख व त्यांनी २00९ पासून शाळेतील विद्यार्थिनींसाठी शाळेतच दर रविवारी मोफत शिकवणी वर्ग सुरू केला. स्वत: गरिबीचे चटके काय असतात, हे चक्रे यांना माहीत आहेत. राष्ट्रीय शिक्षा अभियानाचे तज्ज्ञ मार्गदर्शक, गणित विषयामध्ये कृती संशोधनाची पुस्तकेसुद्धा प्रकाशित झाली असताना, ते शिकवणी वर्गाला व्यावसायिक स्वरूप देऊ शकले असते. रविवारच्या सुटीचा कुटुंबासमवेत आनंद लुटू शकले असते; परंतु त्यांनी केवळ गोरगरीब विद्यार्थिनींसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू करून आंतरिक आनंद मिळविला. पैसा तर सर्वच कमावतात; परंतु दुसºयांची अडचण, समस्या, दु:ख दूर करण्यात पैशांपेक्षा कितीतरी पटीचा आनंद मिळतो.


शिकवणी वर्गाचा समारोप
ओरा चक्रे यांनी शाळेतील गोरगरीब विद्यार्थिनींसाठी २ डिसेंबरपासून मोफत शिकवणी वर्ग सुरू केला होता. या शिकवणी वर्गामध्ये इयत्ता नववी, दहावीतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होता. शिकवणी वर्गाचा १0 फेब्रुवारी रोजी मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणाधिकारी पी. के. देशमुख, संचालक नलिनी देशमुख, प्राचार्य सागर देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी संचालक नलिनी देशमुख यांनी ओरा चक्रे यांच्या उपक्रमाचे कौतुक करीत, त्यांच्या शिकवणी वर्गामुळे गोरगरीब विद्यार्थिनींची मोठी अडचण दूर तर झालीच, शिवाय शाळेच्या निकालाच्या टक्केवारीतही वाढ झाली, असे मत व्यक्त केले. शिकवणी वर्गातील साक्षी बोळे, ज्ञानेश्वरी सुकळीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

 

Web Title: Teacher give free education to sudents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.