लाचखोर संस्था उपाध्यक्षाविरुद्ध सात जणांच्या तक्रारी!

By admin | Published: June 15, 2014 09:02 PM2014-06-15T21:02:20+5:302014-06-15T22:23:08+5:30

संस्थेतील सात कर्मचार्‍यांनी संदीप पाटील याच्याविरुद्ध एसीबीकडे तक्रारी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी दिली.

Seven people complain against bribe organization vice president! | लाचखोर संस्था उपाध्यक्षाविरुद्ध सात जणांच्या तक्रारी!

लाचखोर संस्था उपाध्यक्षाविरुद्ध सात जणांच्या तक्रारी!

Next

अकोला: पेंशन व भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळय़ात अडकलेल्या विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष संदीप पाटील व शिपाई दीपक गोपनारायण याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. संदीप पाटील हा विक्षिप्त स्वभावाचा असून, संस्थेमध्ये काम करणार्‍या अनेक कर्मचार्‍यांचा त्याने छळ मांडला. लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईच्या निमित्तानेच त्याच्याच संस्थेतील सात कर्मचार्‍यांनी संदीप पाटील याच्याविरुद्ध एसीबीकडे तक्रारी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी दिली. शुक्रवारी उशिरा रात्री अटक केल्यानंतर संस्था उपाध्यक्ष संदीप पाटील व शिपाई दीपक गोपनारायण यांना शनिवारी दुपारी ४ वाजता न्यायाधीश एस.जी. सावदेकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघाही आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने १७ जूनपर्यंत आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शाळेतून सेवानवृत्त झालेले कनिष्ठ लिपिक नागो महादेव सावतकार यांच्या पेंशन व भविष्यनिर्वाह निधीचा प्रस्ताव संस्थेमार्फत शिक्षणाधिकार्‍यांकडे पाठविण्यासाठी गोरक्षण रोडवरील सहकार नगरातील विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष संदीप पाटील याने शिपाई दीपक गोपनारायण याच्यामार्फत पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल केला होता.

** विद्यार्थ्यांंच्या शिष्यवृत्ती, फीचीही रक्कम हडप

शुक्रवारी उशिरा रात्री संस्था उपाध्यक्ष संदीप पाटील याच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान सापडलेल्या कागदपत्रांवरून त्याने विद्यार्थ्यांच्या फीची रक्कम आणि शिष्यवृत्तीची हजारो रुपयांची रक्कम स्वत:च हडप केल्याचे दिसून आले आहे. सोबतच एसीबीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार संदीप पाटील हा संस्थेतील शिक्षक, कर्मचार्‍यांचा छळ करून त्यांच्याकडून ऐनकेनप्रकारे पैसे मागण्याचा गोरखधंदा करीत असे. पैसे दिले नाही तर कर्मचार्‍यांवर वाट्टेल ते आरोप करून त्यांना निलंबित करणे, सक्तीच्या रजेवर पाठविणे, स्वेच्छा नवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडणे आदी प्रकारे संदीप पाटील हा छळ करीत असे.

** माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना पाचारण

तक्रारदार नागो सावतकार यांच्या पेंशन व जीपीएफचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे न आल्याने त्यासंदर्भात कार्यालयाने चौकशी का केली नाही आणि आता सावतकार यांच्या समस्येसोबतच संस्थेतील अन्य कर्मचार्‍यांच्या पेंशन व जीपीएफच्या समस्या कशी मार्गी लागेल, यासाठी एसीबीने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे यांना सोमवारी चौकशीसाठी पाचारण केले आहे.

** घरातून महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जप्त

शुक्रवारी रात्री एसीबीने घेतलेल्या झडतीदरम्यान संस्था उपाध्यक्ष संदीप पाटील याच्या घरातून ४ ते ५ बँकेतील खाते पुस्तके, शेतीची कागदपत्रे, भूखंडाची कागदपत्रे, लॉकर्स, फ्लॅटची कागदपत्रे आदी महत्त्वाची कागदपत्रे मिळून आली. एवढेच नाही तर घरामध्ये सेवानवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या अनेक कर्मचार्‍यांच्या सेवानवृत्तीच्या प्रस्तावाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. संदीप पाटील याच्या संपूर्ण संपत्तीची चौकशी करून, त्याची बँकेतील खाती गोठविण्यात येणार आहेत. तसेच लॉकर्ससुद्धा सील करण्यात येणार आहेत. ** सेवानवृत्त होण्यापूर्वीच केले निलंबित तक्रारदार नागो सावतकार हे ३0 सप्टेंबर २0१२ रोजी कनिष्ठ लिपिक पदावरून निलंबित होणार होते. त्यापूर्वी त्यांच्या पेंशन व भविष्यनिर्वाह निधीचा प्रस्ताव संस्थेमार्फत शिक्षणाधिकार्‍यांकडे पाठवावा लागता; परंतु हा प्रस्ताव पाठविण्यासाठी संदीप पाटील याने त्यांना पाच लाख रुपयांची मागणी केली; परंतु एवढी मोठी रक्कम सावतकार देऊ शकत नसल्याने त्यांच्यावर खोटा आरोप लावून त्यांना सेवानवृत्त होण्याच्या तीन दिवस अगोदर २७ सप्टेंबर रोजी निलंबित करून त्यांचा मानसिक छळ करणे सुरू केले.

Web Title: Seven people complain against bribe organization vice president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.