अन् पंचायत समिती कार्यालयावर चढला तरुण, तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 09:20 IST2018-08-15T09:19:51+5:302018-08-15T09:20:43+5:30
एका युवकाने तेल्हारा पंचायत समितीच्या इमारतीवर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सुरू असताना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने चक्क पंचायत समिती कार्यालयावर चढून अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला.

अन् पंचायत समिती कार्यालयावर चढला तरुण, तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न
तेल्हारा (जि. अकोला) : तालुक्यातील ग्रामपंचायत वाकोडी तुदगाव येथे रितसर ग्राम विद्युत व्यवस्थापक पदासाठी अर्ज करुन एक वर्ष झाले. मात्र, अद्यापही जागा भरण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन ठराव न घेता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत एका युवकाने तेल्हारा पंचायत समितीच्या इमारतीवर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सुरू असताना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने चक्क पंचायत समिती कार्यालयावर चढून अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला.
अरूण देवमण चव्हाण, असे या युवकाचे नाव असून त्याने ग्रामपंचायत वाकोडी तुदगाव येथे 23 ऑगस्ट 2017 ला रितसर अर्ज केला. तेथे अजून चार अर्ज आले होते, त्यापैकी तीन अपात्र केले असून अकरा महिने लोटले, तरी यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. तर, सरपंच आणि सचिव याबाबतचा ठराव घेण्यास टाळाटाळ करीत होते. या सर्व प्रकारात हेळसांड होत असल्याने अरुण चव्हाण याने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, याप्रकरणी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर न्याय मिळावा म्हणून 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी पंचायत समितीतीतील झेंडा वंदनवेळी अरुण देवमण चव्हाण यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे पंचायत समिती आवाराता काही काळ तणावपूर्ण वातावरण झाले होते. पुढील कार्यवाही तेल्हारा पोलीस करित आहेत.