खोदकाम केले, जलवाहिनीचा पत्ता नाही; पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:32 PM2019-05-14T12:32:00+5:302019-05-14T12:32:05+5:30

अकोला: महापालिकेच्या दप्तरी पहिला क्रमांक असणाऱ्या नायगाव प्रभागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे चित्र आहे.

No water in naigaon; citizen Wandering for water | खोदकाम केले, जलवाहिनीचा पत्ता नाही; पाण्यासाठी भटकंती

खोदकाम केले, जलवाहिनीचा पत्ता नाही; पाण्यासाठी भटकंती

Next

अकोला: महापालिकेच्या दप्तरी पहिला क्रमांक असणाऱ्या नायगाव प्रभागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे चित्र आहे. मनपाला मंजूर झालेल्या ‘अमृत’ योजनेंतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी अर्धवट खोदकाम करण्यात आले. या भागात जलवाहिनीच नसल्यामुळे महिलांसह लहान मुलांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याचे दिसून आले.
महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा भाग म्हणून नायगाव प्रभागाकडे पाहिल्या जाते. संपूर्ण प्रभागाचा स्लम एरियात समावेश होत असल्याने या भागात विकास कामांना मोठा वाव आहे; परंतु प्रभागाचे चारही नगरसेवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, मनपात सत्ता भाजपची आहे. त्यामुळे साहजिकच नायगावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप सातत्याने होतो. नायगावची एकूणच स्थिती लक्षात घेतली असता, काँग्रेस नगरसेवकांच्या आरोपात तथ्य दिसून येते. नायगावातील वाकापूर रस्ता, इदगाह परिसरात पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्यामुळे लहान मुलांसह महिलांवर पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र समोर आले. या भागात जलवाहिनीसाठी अर्धवट खोदकाम करण्यात आले. नंतर महापालिकेचा कोणताही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचे महिलांनी सांगितले. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कार्यकाळात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली होती. शौचालयासाठी पाणी हवे म्हणून सबमर्सिबल पंप बसविण्यात आला. त्यावर नागरिकांनी नळाचे स्टॅन्ड लावले असून, याद्वारे तात्पुरता तोडगा काढण्यात आला. नायगाव परिसराकडे मनपाचे अधिकारी ढुंकूनही पाहत नसल्याचा आरोप महिलांनी केला. गुंठेवारी जमिनीवर कर आकारणी केली; परंतु पाणीपुरवठा, स्वच्छतेचा मागमूगसही नसल्याचे शेख शौकत शेख गफूर यांनी सांगितले. सबमर्सिबल पंपावरील साहित्याची वारंवार चोरी होते. त्यावेळी वर्गणी जमा करून सबमर्सिबलचे साहित्य आणल्या जात असल्याचे शेख मुख्तार यांनी सांगितले. जलवाहिनी नसल्यामुळे नागरिकांना गोडे पाणी मिळत नसल्याची तक्रार सईदा बी परवीन यांनी केली. एकाच सबमर्सिबल पंपावर परिसरातील नागरिकांची गर्दी होते. त्यातच पाण्याचा दाब कमी असल्याने एक हंडा भरण्यासाठी किमान २० मिनिट अवधी लागत असल्याचे सायरा बी, जैनबबी, यासीन परवीन, अंजूम परवीन, रेहाना परवीन यांनी सांगितले. प्रभागात काँग्रेसचे तीन व एक राष्ट्रवादीचे नगरसेवक असूनही आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सलमा फिरदोस यांनी सांगितले.

सतत पाठपुरावा करतोय!
नगरसेवक अब्दुल रहीम अ. कादर यांना विचारणा केली असता, दाट लोकवस्तीच्या भागात पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी मनपा प्रशासनासह महापौरांकडे सतत पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: No water in naigaon; citizen Wandering for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.