राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:27 AM2017-10-14T02:27:44+5:302017-10-14T02:28:19+5:30

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेणार्‍या गोरगरीब पालकांच्या पाल्यांना शासनाकडून गणवेश घेण्यासाठी ४00 रुपयांची रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते. परंतु, हे अनुदान मिळविण्यासाठी पाल्य, आई, वडिलांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असण्याची सक्ती करण्यात येत असल्याने पालक व पाल्य त्रस्त झाले आहेत.  

Nationalized bank is forced to open an account! | राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती!

राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती!

Next
ठळक मुद्देगणवेशाचे अनुदान ठरतेय डोकेदुखी ग्रामीण भागात बँक नसल्याने पालक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव वैराळे : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेणार्‍या गोरगरीब पालकांच्या पाल्यांना शासनाकडून गणवेश घेण्यासाठी ४00 रुपयांची रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते. परंतु, हे अनुदान मिळविण्यासाठी पाल्य, आई, वडिलांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असण्याची सक्ती करण्यात येत असल्याने पालक व पाल्य त्रस्त झाले आहेत.  
हे अनुदान पाल्य, आई, वडिलांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँक खाते असल्याशिवाय मिळत नसल्यामुळे बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण परिसरात ३0 किमी अंतरावर निंबा किंवा लोहारा येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा असल्याने गणवेषाचे  ४00 रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी पालकांना त्यांच्या जवळचे ३00 रुपये खर्च करण्यासोबत नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.
बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून, या शाळेत केवळ  गोरगरीब शेतकरी व  शेतमजुरांची मुले शिक्षण घेत आहेत. बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण या परिसरात ३0 किमी अंतरापेक्षा कमी अंतरावर कुठलीही राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्यामुळे या भागातील मोलमजुरी करणार्‍या शेतमजुरांना मजुरी बुडवून एका किंवा दोन मुलांसह  बँकेत जावे लागत आहे. यासाठी त्याला प्रवास भाड्यासाठी ३00 रुपये खर्च करावे लागत आहेत. एवढे करूनही एका चकरेत बँकेत खाते उघडले जात नाही. त्यामुळे किमान दोन चकरा कराव्या लागत आहेत. 
तसेच राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी त्या खातेदारांना अनामत म्हणून पाचशे रुपये खात्यात जमा करावे लागतात. यात त्या शेतमजुराची दोन दिवसाची बुडणारी मजुरी पकडली, तर शासनाकडून मिळणार्‍या ४00 रुपयांच्या अनुदानासाठी शेतमजुरांना जवळचे एक हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने शासनाकडून गणवेशासाठी मिळणारे ४00 रुपयाचे अनुदान मदत नव्हे, डोकेदुखी ठरत आहे. 
 याच जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकाचे वेतन बोरगाव वैराळे, सोनाळा परिसरात सहा किमी अंतरावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हातरुण शाखेत होत असताना विद्यार्थ्यांचे गणवेशाचे अनुदान जमा करण्यासाठी या बँकेतील खाते का चालत नाही, असा प्रश्न संतोष सूर्यवंशी या पालकाने  विचारला असता वरिष्ठांकडून राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची अट असल्याचे मुख्याध्यापक श्रीकांत कोल्हे यांनी सांगितले. 
मात्र, या अटीमुळे गोरगरीब पालक त्रस्त झाले असून, ही त्रासदायक अट रद्द करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हातरुण शाखेत खाते उघडून त्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्याची तरतूद करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम डोंगरे यांनी केली आहे.

गोरगरीब विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेशासाठी ४00 रुपयांची रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची तरतूद आहे. सदर रक्कम विद्यार्थ्यांना देण्यासाठी पालक व पाल्य यांचे संयुक्त बँक खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असले पाहिजे, अशी सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याशिवाय गणवेशाची रक्कम मिळणार नाही, असे मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. 
- जी.व्ही. बडवे, 
गटशिक्षणाधिकारी, बाळापूर.

Web Title: Nationalized bank is forced to open an account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक