‘त्या’ तीन इमारतींचा भाग हटविण्यासाठी मनपात हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 09:29 AM2018-02-07T09:29:48+5:302018-02-07T09:30:49+5:30

अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्‍या तीन इमारतींचा काही भाग हटविण्यासाठी मनपाच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

Movement movements to remove those 'three' buildings | ‘त्या’ तीन इमारतींचा भाग हटविण्यासाठी मनपात हालचाली

‘त्या’ तीन इमारतींचा भाग हटविण्यासाठी मनपात हालचाली

Next
ठळक मुद्देगोरक्षण रोडवरील ‘बॉटल नेक’चा तिढा होणार दूर!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्‍या तीन इमारतींचा काही भाग हटविण्यासाठी मनपाच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. इन्कम टॅक्स चौकातील मुक्ता प्लाझा कॉम्प्लेक्स, श्रद्धा हाइट्स व गोविंद सोढा यांच्या इमारतीवर कोणत्याही क्षणी मनपाचा गजराज चाल करण्याची दाट शक्यता आहे. मनपाच्या कारवाईमुळे ‘बॉटल नेक’चा तिढा निकाली निघण्याची अपेक्षा आहे.
गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू होण्याला एक वर्षापेक्षा जास्त अवधी होत आहे. यादरम्यान, महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींमुळे ५00 मीटर अंतरावर ‘बॉटल नेक’ निर्माण होणार असल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने लावून धरला. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यापैकी एक असलेल्या  गोरक्षण रोडवर ही समस्या कायम राहिल्यास भविष्यात या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार असल्याचे चित्र होते. ही बाब लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींचे मोजमाप घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी साडेचार मीटर जागा संपादित केली. रस्त्याच्या आड येणार्‍या इमारतींचा भाग हटविण्याची कारवाई मनपाने सुरू करताच मालमत्ताधारकांनी स्वत:हून इमारतीचा भाग पाडण्यासाठी मुदत मागितली. तीन महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही काही मालमत्ताधारकांनी इमारतीचा भाग तोडला नसल्याचे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे.

तीन महिन्यांपासून ‘टाइमपास’
गोरक्षण रोडवरील मुक्ता प्लाझा कॉम्प्लेक्स, श्रद्धा हाइट्स व गोविंद सोढा यांच्या व्यावसायिक इमारतींचे बांधकाम अद्यापही कायम आहे. तीन महिन्यांपासून संबंधित मालमत्ताधारकांनी मनपा प्रशासनासोबत ‘टाइमपास’ चालविला असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला खीळ बसली आहे.

राजकीय दबावतंत्राचा वापर
शहरातील विकास कामांना अनेकदा अडथळे निर्माण होतात. गोरक्षण रोड प्रकरणातही काही मालमत्ताधारक मनपा प्रशासनावर राजकीय दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती आहे. राजकीय नेते, पदाधिकार्‍यांनी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर केल्यास भविष्यात शहरातील कोणत्याही रस्त्यांचे रुंदीकरण होणार नसल्याचे बोलल्या जात आहे.

Web Title: Movement movements to remove those 'three' buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.