अकोट मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 02:04 PM2019-07-01T14:04:15+5:302019-07-01T14:07:38+5:30

अकोला : अकोल्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाचा इतिहास हा दरवेळी आमदार बदलणारा मतदारसंघ असा आहे.

Competition for Akot constituency contest! | अकोट मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच!

अकोट मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच!

googlenewsNext

अकोला : अकोल्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाचा इतिहास हा दरवेळी आमदार बदलणारा मतदारसंघ असा आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारीसाठी सर्वच पक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. आगामी निवडणुकीसाठी युती व आघाडी गृहीत धरून नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २००९ मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या या मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपाने स्वबळावर झेंडा फडकविला. त्यामुळे आता आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने मतदारसंघावर दावा केला असल्यामुळे शिवसेनेतच उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू झाले तर काँग्रेसमध्ये जुन्या जाणत्या नेत्यांची मोठी फळी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे चित्र आहे.
या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत सेना, भाजपा स्वबळावर लढल्यानंतर भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी तब्बल ४२.३० टक्के मते घेऊन मिळविलेला विजय हा पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे प्राबल्य वाढविणारा ठरला आहे. खुद्द केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी जातीने लक्ष देत या मतदारसंघाची भक्कम बांधणी केली आहे. त्यामुळे सेनेपेक्षा भाजपा वरचढ ठरली असल्याने आता आगामी निवडणुकीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात यावा, या मागणीसाठी सेनेतून दबाव निर्माण केला जात आहे.
येथील मतदारांचा स्वभाव हा दरवेळी आमदार बदलण्याचा असल्याचे १९८५ नंतरच्या निकालांवरून अधोरेखीत होते. त्यामुळेच इच्छुकांचा आशा पल्लवीत झाल्या असून शिवसेनेत उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच आहे. शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे, तेल्हारा तालुका प्रमुख विजय मोहोड, वैद्यकीय सेलचे डॉ. विनीत हिंगणकर, दीलीप बोचे अशी प्रमुख नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. या मतदारसंघाची जबाबदारी सेनेने आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे सोपविली असून, त्यांचेही अकोटमधील दौरे वाढले असल्याने तेसुद्धा अकोटात लढू शकतात, अशीही चर्चा आहे.
या मतदारसंघात १९८५ मध्ये काँगे्रसचे सुधाकर गणगणे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर काँग्रेसला सलग सहाव्यांदा यश मिळविता आलेले नाही. त्यामुळे काँगे्रससाठी यावेळी अस्तित्वाची लढाई आहे. येथे काँग्रेसकडून महेश गणगणे, डॉ. संजीवनी बिहाडे, बाळासाहेब बोंद्रे, प्रा. संजय बोडखे यासह इतर नेतेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेसची परंपरागत मते या मतदारसंघात टिकून असली तरी या मतांना इतर मतांची जोड मिळवित विजयापर्यंत पोहोचण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. त्यामुळे सामाजिक समीकरणे सांभाळत इतर मतांवर प्रभाव टाकणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी, असा दावा सर्वच इच्छुकांकडून केला जात आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी वजाबाकी घडवून आणण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे. गेल्या दोन निवडणुकीतील मतांची तुलना केली, तर वंचित बहुजन आघाडीने (भारिप-बमसं) सरासरी ३० हजारांवर मते घेऊन तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे. गेल्यावेळचा भारिप-बमसं आता ‘वंचितचा प्रयोग’ घेऊन रिंगणात उतरला असल्याने या पक्षाचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे या पक्षातही उमेदवारीसाठी स्पर्धा आहेच. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे या दोन प्रमुख उमेदवारांच्या नावाची चर्चा असली, तरी अंतिम निर्णय हा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचाच असल्याने ते कोणती खेळी खेळतात, यावरही मत विभाजनाचे गणित ठरणार आहे. सध्या तरी सर्वच इच्छुकांनी झोकून देत मोर्चेबांधणी सुरू केली असल्याने उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

तेल्हारा तालुक्याच्या अस्मितेला फुंकर

अकोट या मतदारसंघात तेल्हारा व अकोट या दोन तालुक्यांचा समावेश होतो. ही दोन शहरे सोडली तर इतर भाग हा ग्रामीणच आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर प्रमुख पक्षांनी तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या नेत्यांना उमेदवारी देणे टाळलेच आहे. अपवाद फक्त बाळासाहेब तायडे यांचा. त्यामुळे यावेळी तेल्हारा तालुक्याला प्रतिनिधित्व द्यावे, अशी अस्मितेची फुंकर घातल्या जात आहे. या तालुक्यातील शिवसेना व काँग्रेसमधील इच्छुकांनी आपली दावेदारी प्रकट करताना हा मुद्दाही अधोरेखित केला आहे, हे विशेष.
 
भाजपाच्या हाती सेनेचे भविष्य
या मतदारसंघावर शिवसेनेने राज्य केले. हा इतिहासच सांगतो. १९९० नंतर शिवसेनेचे तब्बल चार आमदार निवडून आले आहेत. २०१४ मध्ये युती तुटल्यावर सेनेला आपले प्राबल्य टिकविता आले नाही. सेनेला अवघी १४ हजार २४ मते मिळाली. टक्केवारीमध्ये हे प्रमाण केवळ ८.४८ टक्के एवढेच आहे. त्यामुळे मागील इतिहासावर सेना या मतदारसंघावर दावा करीत असली तरी आता भाजपाचा वाढलेला जनाधार या दाव्यातील हवा काढून घेऊ शकतो. त्यामुळे सेनेच्या दाव्याचे भविष्य भाजपाच्याच हातात आहे. 

Web Title: Competition for Akot constituency contest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.