दुष्काळमुक्तीसाठी शोषखड्ड्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:09 PM2019-05-12T13:09:30+5:302019-05-12T13:09:52+5:30

अकोला : ग्रामीण भागात तुंबलेल्या नाल्या, गटारांची समस्या निकाली काढण्यासोबतच दुष्काळापासून काही प्रमाणात आधार देणाऱ्या शोषखड्डे निर्मितीच्या कामाकडे शासकीय यंत्रणा, लाभार्थींच्या उदासीनतेमुळे हा उपक्रमच कागदावर ठेवण्याचा प्रकार राज्यात सर्वत्रच सुरू आहे.

The basis for absorption of drought | दुष्काळमुक्तीसाठी शोषखड्ड्यांचा आधार

दुष्काळमुक्तीसाठी शोषखड्ड्यांचा आधार

googlenewsNext

अकोला : ग्रामीण भागात तुंबलेल्या नाल्या, गटारांची समस्या निकाली काढण्यासोबतच दुष्काळापासून काही प्रमाणात आधार देणाऱ्या शोषखड्डे निर्मितीच्या कामाकडे शासकीय यंत्रणा, लाभार्थींच्या उदासीनतेमुळे हा उपक्रमच कागदावर ठेवण्याचा प्रकार राज्यात सर्वत्रच सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद, शासनाचा रोहयो विभागाकडून त्या कामांसाठी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामीण रोजगार हमी योजनेत प्रवर्ग ‘ड’मध्ये ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या ३२ कामांमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या कामांचाही समावेश करण्यात आला. हगणदारीमुक्त गावाचा दर्जा संपादन करण्याच्या उद्देशाने स्वतंत्रपणे किंवा शासकीय विभागाच्या इतर योजनांच्या अभिसरणातून व्यक्तिगत घरगुती शौचालय, शाळेतील प्रसाधनगृहे, अंगणवाडी-प्रसाधनगृहे, घनकचरा व सांडपाणी यासारखी ग्रामीण स्वच्छतेसंबंधातील कामे त्यामध्ये घेता येतात. त्यापैकी पाणी साठवण, शोषखड्डे निर्मिती हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांचा उपक्रम प्रभावीपणे राबविल्यास त्यातून भूगर्भात पाण्याचे पुनर्भरण होते. त्याचा फायदा दुष्काळावर मात करण्यासाठी होऊ शकतो; मात्र या उपयुक्त उपचाराकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचा प्रकार घडत आहे.
ग्रामीण भागातील जमिनीत पुनर्भरणाचे उपचार अत्यल्प आहेत. त्यामुळेच भूगर्भातील जलपातळी ३०० फुटांपेक्षा अधिकच खोल गेली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे निर्मितीचा उपचार उत्तम पर्याय आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागातून ही उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणा आणि लाभार्थींमध्ये समन्वयच नसल्याने नियोजन कागदावरच उरले आहे.
- असे मुरेल जमिनीत पाणी!
ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या पाहता ती २ लाख २५ हजारांपेक्षा अधिक आहे. या प्रत्येक कुटुंबाने वापर करून सोडलेले सांडपाणी प्रतिदिन ४० लीटरपेक्षाही अधिक असू शकते. ते नाली किंवा गटारात तुंबून राहते. त्यात डासांची निर्मिती होऊन आरोग्याच्या समस्या पुढे येतात. तेच पाणी शोषखड्ड्यात सोडल्यास जमिनीत मुरणार आहे. त्यातून दरदिवशी ९० लाख लीटर पाण्याचे जमिनीत पुनर्भरण होऊ शकते.
- वर्षाला ३ अब्ज २४ कोटी लीटर सांडपाणी
ग्रामीण भागात तुंबणारे, साचणारे घाण पाणी पाहता ते ३ अब्ज २४ कोटी लीटर पाणी दरवर्षी वाया जाते. त्या पाण्याचे पुनर्भरण झाल्यास त्याचा वापरण्यासाठी तरी किमान उपयोग होऊ शकतो; मात्र या शक्यतेकडे दुष्काळातही कुणीच लक्ष देण्यास तयार नसल्याने गावा-गावांतील पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे.

 

Web Title: The basis for absorption of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.