बाबासाहेबांच्या  ‘त्या’ आठवांचा आजही गहीवर! - शांताबार्इंनी दिला स्मृतींना उजाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 07:16 PM2018-12-05T19:16:40+5:302018-12-05T19:17:25+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धम्मक्रांतीच्या माध्यमातून समाजात रुजल्याने ते आजही विचार रूपाने आमच्यात जिवंत असल्याच्या भावना मोठी उमरीतील ८४ वर्षीय शांताबाई नंदकुमार गवई यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.

84-year-old Shantabai memorize Dr. babasaheb ambedkar | बाबासाहेबांच्या  ‘त्या’ आठवांचा आजही गहीवर! - शांताबार्इंनी दिला स्मृतींना उजाळा 

बाबासाहेबांच्या  ‘त्या’ आठवांचा आजही गहीवर! - शांताबार्इंनी दिला स्मृतींना उजाळा 

Next

- राजू चिमणकर

अकोला: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैश्विक विचारांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. मानवता जोपासत त्यांनी समतेचा संदेश दिला. शिका, संघटीत व्हा! संघर्ष करा! या त्यांच्या आवाहनाने नवी पिढी जागरुक झाली. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा विचार अंगीकारत समाजानेही क्रांतीची बिजे रोवली. बाबासाहेब हयात असताना समाजबांधवांना फार मोठे पाठबळ होते. त्यांच्या महापरिनिर्वाणाने अखिल मानवमन गहीवरून आले. त्यांनी दिलेला विचार धम्मक्रांतीच्या माध्यमातून समाजात रुजल्याने ते आजही विचार रूपाने आमच्यात जिवंत असल्याच्या भावना मोठी उमरीतील ८४ वर्षीय शांताबाई नंदकुमार गवई यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. औरंगाबादमध्ये असताना सन १९५३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्या घरी जेवण केल्याचे भाग्य मला लाभल्याचे सांगत आठवणींना उजाळा दिला.
अकोल्याचा जन्मलेल्या शांताबाई यांचे वडील राजारामजी पळसपगार यांचा शेतीचा व्यवसाय. शिक्षणासाठी त्यांनी आग्रह धरलेला. शाळेची आवड कायम राहावी म्हणून दमणीत बसवून शाळेत सोडून द्यायचे. ते अकोल्यात सुरू झालेल्या वसतिगृहास अन्नधान्य देत होते. ते सेवाभावी वृत्तीचे होते. शांताबाई चौथीमध्ये असताना त्यांचे निधन झाले. शांताबार्इंचे अकोल्यातील तत्कालीन गर्व्हमेंट हायस्कूलमध्ये नववीपर्यंत शिक्षण झाले. औरंगाबाद येथील शासकीय अधिकारी सुधाकर वानखडे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्या छावनीतील शासकीय निवासस्थानी राहायला होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या औरंगाबादेतील मिलींद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. मनोहर नामदेव वानखडे हे शांताबार्इंचे जेठ त्यांच्यासोबतच राहायला होते. आंबेडकरी चळवळीच्या निमित्ताने बाबासाहेबांचे औरंगाबादला जाणे येणे असायचे. दरम्यानच्या काळात सन १९५३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे डॉ. म. ना. वानखडे यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत माईसाहेबही होत्या. त्यांच्या घरी त्यांनी जेवणही केले. बाबासाहेब यांना शांताबाई, त्यांच्या सासू मनोरमाबाई वानखडे यांनी जेवण वाढले. बाबासाहेबांनी बराच वेळ चर्चा केली. शांताबाई त्या वेळी २२ वर्षांच्या होत्या. त्यांचा मुलगा रत्नाकर वानखडे त्यावेळी दोन वर्षांचा असेल, रत्नाकरला बाबासाहेबांनी कडेवर घेऊन त्याचा लाडही केला होता. त्यांचे आमच्या घरी येणे म्हणजे आमच्या जगण्याला परिसाचा स्पर्श झाल्यासारखे होते, असेही शांताबाई म्हणाल्या. या प्रसंगाने आमच्या परिवाराचे आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते अधिक घट्ट झाले, असेही त्या म्हणाल्या. डॉ.म. ना. वानखडे यांनी अस्मितादर्शची संकल्पना रुजवली.
दरम्यान, पती सुधाकर वानखडे यांचे आजारामुळे निधन झाले. परिवाराला फार मोठा धक्का बसला. त्यानंतर शांताबाई माहेरी अकोल्यात आल्या. सन १९६३ मध्ये त्यांचा नंदकुमार गवई यांच्याशी दुसरा विवाह झाला. दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून सक्षम बनण्याच्या उद्देशाने त्या आरोग्य सेविका म्हणून बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्या. कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या २७ सप्टेंबर ११९२ ला सेवानिवृत्त झाल्या.

Web Title: 84-year-old Shantabai memorize Dr. babasaheb ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.