२३ पथकांद्वारे निवडणूक प्रक्रियेवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:05 PM2018-12-08T17:05:54+5:302018-12-08T17:05:56+5:30

जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल

'Watch' on election process by 23 teams | २३ पथकांद्वारे निवडणूक प्रक्रियेवर ‘वॉच’

२३ पथकांद्वारे निवडणूक प्रक्रियेवर ‘वॉच’

Next

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. पुढील तीन दिवस एकूण २३ पथकांद्वारे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी रात्रं-दिवस शहरात पथकांचा वॉच असणार आहे. मतदारांनीसुद्धा गैरप्रकारांना थारा न देता १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. येत्या रविवारी (दि. ९) रोजी मतदान होत असून यासाठी ३३७ मतदान केंद्र आहेत. १ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू केली असून आचारसंहिता कक्षाद्वारे नेमलेली पथके योग्य ती कार्यवाही करत आहेत. आतापर्यंत ६ भरारी पथके तैनात होती. परंतु शुक्रवारपासून मतमोजणीपर्यंत अजून १७ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय ६ चेक पोस्ट पथक, ६ व्हिडिओ सर्व्हेलियन्स पथक, १ छायाचित्रण तपासणी पथक कार्यरत आहेत. याशिवाय २ हजार निवडणूक कर्मचारी व २ हजार पोलीस कर्मचारी नियुक्त असून, कोणत्याही स्थितीत कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक संनियंत्रण समिती, रेडिओ, टीव्ही, जाहिरात साहित्य तपासणी समिती, पेड न्यूज समिती, तसेच तहसीलदार यांची समिती कार्यरत आहे. मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक असून आतापर्यंत आचारसंहिता कक्षाकडे १२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील सर्वांवर कार्यवाही झाली असून २ तक्रारींवर थेट गुन्हे दाखल झाले आहेत.
शनिवारी, तसेच मतदानाच्या दिवशी ही पथके आणखी गतिमान होतील. उमेदवारांकडून पैसे वाटण्याचे, तसेच दहशतीचे प्रकार होत असतील तर त्वरित आचारसंहिता कक्षाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार संपलेला असून सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी लावलेले बॅनर काढावेत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे
दाखल होतील, असेही द्विवेदी म्हणाले.
आज कर्मचारी होणार बूथवर रवाना
निवडणुकीसाठी नियुक्त असणा-या २ हजार कर्मचा-यांना शनिवारी दुपारपर्यंत मतदान साहित्याचे वाटप होऊन हे कर्मचारी सायंकाळपर्यत संबंधित मतदान केंद्रावर पोहोचतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी दिली.
मतमोजणी भवानीनगर (आनंदधामजवळ) येथील वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी (दि.१०) सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल. सर्व १७ प्रभागांची मोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. एका प्रभागासाठी स्वतंत्र तीन टेबल असतील. जेथे मतदानकेंद्र कमी असतील, तेथील निकाल आधी लागेल. साधारण बारा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येऊ शकतो. त्यानंतर पुढील निकाल गतीने लागतील. तांत्रिक अचडणी आल्या नाहीत, तर दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता जिल्हाधिकाºयांनी वर्तवली.

Web Title: 'Watch' on election process by 23 teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.