भाळवणी येथील अपघातात तिघे तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:28 IST2018-02-20T20:27:09+5:302018-02-20T20:28:51+5:30
नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी (ता. पारनेर) परिसरातील दहावा मैल येथे झालेल्या अपघातात तीन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

भाळवणी येथील अपघातात तिघे तरुण जागीच ठार
भाळवणी : नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी (ता. पारनेर) परिसरातील दहावा मैल येथे झालेल्या अपघातात तीन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रतिक बाळासाहेब ठाणगे (वय २०, रा. हिवरे कोरडा), सोमनाथ बाळू गांगुर्डे (वय १९, रा. हिवरे कोरडा), दीपक रंगनाथ गांगुर्डे (वय २१, रा. माळकूप) अशी मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.
मोटारसायकलवरील तिघेजण नगरहून भाळवणीकडे जात होते. त्यांची मोटारसायकल भाळवणी जवळील दहावा मैल परिसरात आली असताना मुंबईहून नगरकडे जाणा-या कारला (क्रमांक एम. एच. ०३, सी. पी. ०१४४) मोटारसायकलची (क्रमांक एम.एच. १६ बी. टी. २६२२) समोरासमोर धडक बसली. हा अपघात एव्हढा भिषण होता की, मोटारसायकलवरील तिघेही सुमारे तीस फुट लांब फेकले गेले तर मोटारसायकलचे पार्ट सुमारे ५० फुटांवर विखुरले गेले. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पारनेर पोलिसांना माहिती दिली. तसेच रुग्णवाहिका बोलावली. दिपक रंगनाथ गांगुर्डे (माळकूप), सोमनाथ बाळू गांगुर्डे व प्रतिक ठाणगे (हिवरे कोरडा) या तिघांना तातडीने उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत.