मराठा आरक्षणासाठी अकरा चौकांत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:18 PM2018-08-06T15:18:10+5:302018-08-06T15:18:26+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात येत्या ९ आॅगस्ट रोजी शांततेच्या मार्गाने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ११ चौकांत रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Stop the way of eleven chowk for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी अकरा चौकांत रास्ता रोको

मराठा आरक्षणासाठी अकरा चौकांत रास्ता रोको

Next

अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात येत्या ९ आॅगस्ट रोजी शांततेच्या मार्गाने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ११ चौकांत रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलन करण्यास रोखण्याचा प्रयत्न केल्यास स्वत: अटक करून घेऊन जेलभरो करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर मराठा क्रांती जनआंदोलन करण्यात येणार आहे. नगर शहरासह जिल्ह्यात क्रांतीदिनी जनआंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत जोपर्यंत सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाला गुरुवारी सकाळी ९़ ३० वाजता एकाच वेळी राष्ट्रगीताने सुरुवात केली जाईल. सकाळी राष्ट्रगीताने आंदोलनाची सुरुवात होणार असून, सरकारने सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे समाज बांधवांनी सकाळी घरातून निघताना सोबत जेवणाचा डबा घेऊन यावे. तसेच जोपर्यंत समन्वयकांकडून जनआंदोलनाबाबत सूचना येत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही. पोलिसांनी बळाचा वापर करून रस्त्यावरून उठविण्याचा प्रयत्न केल्यास सर्व समाज बांधवांनी स्वत: ला अटक करून घ्यावी. जेलभरो करून तुरुंगातही आंदोलन सुरू ठेवले जाणार असून, आंदोलनाची आचारसंहिता न पाळणा-यांना समाज कोणतेही संरक्षण देणार नाही, असे बैठकीत ठरले.
शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये बंद ठेवण्याची विनंती करणार
येत्या ९ आॅगस्ट रोजी मराठा जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये, दुकाने, बँका, सरकारी कार्यालये बंद ठेवण्याची विनंती केली जाणार आहे. रुग्णालये बंद न ठेवता रुग्णसेवा सुरू राहिल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या चौकांत रास्ता रोको
मराठा समाजाच्या वतीने येत्या ९ आॅगस्ट रोजी निंबळक बायपास, बोल्हेगाव, एमआयडीसी चौक, प्रेमदान चौक, पत्रकार चौक, डीएसपी चौक, चांदणी चौक, यशपॅलेस, सक्कर चौक, अमरधाम रोड, केडगाव चौकांत रास्ता रोको करण्यात येणार आहे.

Web Title: Stop the way of eleven chowk for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.