ढोलवादनात आता रिमिक्सचा नाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:26 PM2018-09-18T12:26:35+5:302018-09-18T12:26:42+5:30

पारंपरिक ताला-सुरासोबत नगरच्या ढोलवादनात आता रिमिक्स, फ्यूजनचाही नाद घुमत आहे. ढोलवादनासोबत हलगी आणि घुंगराचा वापर करीत झालेली नवी तालनिर्मिती ठेका धरायला भाग पाडते आहे.

Now the sound of the remix in Dholavad | ढोलवादनात आता रिमिक्सचा नाद

ढोलवादनात आता रिमिक्सचा नाद

Next

सुदाम देशमुख
अहमदनगर : पारंपरिक ताला-सुरासोबत नगरच्या ढोलवादनात आता रिमिक्स, फ्यूजनचाही नाद घुमत आहे. ढोलवादनासोबत हलगी आणि घुंगराचा वापर करीत झालेली नवी तालनिर्मिती ठेका धरायला भाग पाडते आहे. अकराही दिवस ढोलवादनाचे स्थिर वादन होत आहे. स्वत:चा उद्योग-धंद्यासोबत परंपरा सांभाळण्याचे काम तरुणांकडून होत आहे. शिल्लक पैशातून ढोलकपथक सामाजिक उपक्रमातही आघाडीवर आहेत.
गणेशोत्सवानिमित्त सध्या ढोलपथकांची धूम आहे. शहरात सात ते आठ ढोलपथके काम करीत आहेत. एका पथकामध्ये किमान ७० ते ८० व कमाल २०० युवक-युवतीं ढोल वाजवून आपला छंद जोपासत आहेत. पारंपरिक तालांसोबत नवी तालनिर्मिती करून तरुणांनी ढोलवादनात रंग भरला आहे. फ्यूजन,रिमिक्स गाण्यांचा ताल आता ढोलवादनात वाजत आहे. हलगी आणि घुंगरांचा समावेश ही येथील पथकांची नवनिर्मिती आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून एकत्र आलेले तरुण छंद जोपासत आहेत. उत्सवापूर्वी दोन-दोन महिने आधीपासून रोज सकाळी सराव करून तरुणांनी ताल तयार केले आहेत.


सामाजिक उपक्रम

ढोलपथकांनी सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. खर्च वगळता मिळालेल्या शिल्लक पैशांमधून लेक वाचवा अभियान, वंचित मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलींच्या शिक्षणाचा खर्च केला जात आहे. यात तीन ढोल पथक आघाडीवर आहेत.
सात पथके आघाडीवर रुद्रनाद, रुद्रवंश, पद्मनाभम्, निर्विघ्नम्, कपिलेश्वर,हिंदवीसूर्य, तालयोगी आदी पथके नगर शहरात ढोल वादन करीत आहेत.

ना नफा - ना तोटा तत्त्वावर पथकांचे काम
रोजगार किंवा पैसे मिळण्याच्या उद्देशाने ढोल पथकांची स्थापना केलेली नसल्याचे पथक प्रमुखांनी ‘लोकमत’ला सांगितले. पथकातील अनेक तरुण त्यांची नोकरी, व्यवसाय, शिक्षण सांभाळून छंद जोपासत आहेत. ज्या तरुणांना कुठेच काम नाही, त्यांच्यासाठी पथकाकडून प्रयत्न केले जातात. एक पथक एका तास वाजवायचे किमान २५ ते ३० हजार रुपये घेतात. मात्र ढोल दुरुस्ती, प्रवास, सरावाच्या वेळी चहा-नाश्ता, गणवेश खरेदी यासाठीच खर्च होतो. उरलेल्या पैशातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये ना नफा ना तोटा असेच पथकाचे आर्थिक गणित आहे. सध्या गणेशोत्सवात अकराही दिवस पथकांचे शहरात विविध ठिकाणी स्थिर वादन सुरू आहे. दीडशे जणांचे पथक आहे.

पुर्वापार परंपरा जपत वादनातील नवे प्रयोग हे आमच्या पथकाचे वैशिष्ट्य आहे. डिजेवर वाजणारे संगीत ढोलमध्ये आणले आहे. कातडी ढोल वाजविले जातात.मानाच्या गणपतीपुढे वाजविण्याची संधी यावर्षी पथकाला मिळाली आहे. पत्रकार चौक ते जिल्हा रुग्णालयासमोरील दुभाजक सुशोभिकरणाचा यंदाचा संकल्प आहे. -अवधूत गुरव, रुद्रनाद


रुद्रवंशचा विशेष ताल तयार केला आहे. हलगी, घुंगराचा प्रथमच वापर करून नवा ताल निर्माण केला आहे. पावणे दोनशे मुले-मुली पथकात आहेत. लेक वाचवा, लेक शिकवा असे अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत दुर्बल घटकातील चार मुलीं शिक्षणासाठी दत्तक घेतल्या आहेत. छंद जपत सामाजिक कार्य करण्यासाठी पथक अग्रेसर आहे. ‘संपर्कातून समृद्धीकडे’ या अंतर्गत पथकातील तरुण किंवा त्यांच्या नातेवाईक तरुणांसाठी रोजगार देण्यासाठी पथक प्रयत्नशील आहे. ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी यंदा पथकात टोल वादन बंद करण्यात आले आहे. -प्रशांत मुनफन, रुद्रवंश


एखाद्या गणेश मंडळाचे स्वत:चे पथक असावे, या हेतुने स्व. कैलास गिरवले यांनी या पथकाची स्थापना केली होती. त्यांना श्रद्धांजली म्हणून यंदा पथकाचे फारसे उपक्रम नाहीत. मात्र ८० ते ८५ मुला-मुलींचे हे पथक पारंपरिक ताल जपण्याचे काम करीत आहे. -गिरीश रासकर, कपिलेश्वर


पथकात ७० मुले-मुलीं आहेत. यंदा विशाल गणेशाला मानवंदना दिली आहे. पारंपरिक ढोल वादन करीत आहोत.- योगेश भूकन, निर्विघ्नम्

 

Web Title: Now the sound of the remix in Dholavad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.