नगर मनपा निवडणूक : समस्यांमध्ये गुरफटले मुकुंदनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:12 PM2018-12-04T12:12:16+5:302018-12-04T12:12:37+5:30

नगर शहरातील एक मोठे उपनगर असलेल्या मुकुंदनगरला वीज, पाणी, गटारीच्या समस्यांनी ग्रासलेले आहे़ पण त्याकडे ना प्रशासन लक्ष देते;

Nagar municipal elections: Gurkafat Mukundnagar in trouble | नगर मनपा निवडणूक : समस्यांमध्ये गुरफटले मुकुंदनगर

नगर मनपा निवडणूक : समस्यांमध्ये गुरफटले मुकुंदनगर

googlenewsNext

गणेश शिंदे  /  रोहिणी मेहेर

नगर शहरातील एक मोठे उपनगर असलेल्या मुकुंदनगरला वीज, पाणी, गटारीच्या समस्यांनी ग्रासलेले आहे़ पण त्याकडे ना प्रशासन लक्ष देते; ना लोकप्रतिनिधी़ फक्त मतदानापुरतेच आम्हाला गृहित धरले जाते़ मग समस्या का सोडवल्या जात नाहीत, असा संतप्त सवाल मुकुंदनगरवासीय उपस्थित करीत आहेत़ मुकुंदनगर येथे ५ वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधण्यात आली़ केडगाव येथील पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचले़ पण महापालिकेसमोरील मुकुंदनगरच्या टाकीत पाणी येऊ शकले नाही़ येथील नागरिकांना चार दिवसाआड मिळते़ तेही कमी दाबाने येते़ त्यामुळे काहींना पाणी मिळते तर काहींचे हंडे रिकामेच राहतात़ मुकुंदनगरच्या टाकीतून पाणी पुरवठा झाल्यास पूर्ण दाबाने व पुरेसे पाणी मिळेल, असे येथील रहिवाशांना वाटते़ पूर्ण दाबाने व पुरेसे पाणी मिळावे, अशी येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ पण कोणीही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही़ या भागात बंदिस्त गटार योजना अस्तित्वात आली़ पण त्यासाठी वापरलेले पाईप अत्यंत छोटे आहेत़ त्यामुळे ते वारंवार तुंबतात़ त्यामुळे सर्रास रस्त्यांवरुन गटाराचे पाणी वाहताना दिसते़ त्याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होतो़ या भागातील रस्तेही अत्यंत खराब असून, ठिकठिकाणी रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले आहेत़ या रस्त्यांच्या दुरुस्तीकडेही महापालिका अन् लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत़ या भागात महापालिकेची घंटागाडी कुठे येते तर कुठे येत नाही़ त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्याकडेला, मोकळ्या जागेवर कचरा टाकावा लागतो़ विद्युत खांब उभे आहेत़ मात्र, त्यावरील दिवे सुरु नसतात़ त्यामुळे मुकुंदनगर रात्री काळोखात गुडूप होऊन जाते़ महिला, मुलींना रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडायलाही भीती वाटते.

आरोग्याची सुविधा मिळत नाही
मुकुंदनगर भागात गोरगरीब जनता मोठ्या प्रमाणात राहते़ या जनतेला आरोग्याच्या सुविधाही मिळत नाहीत़ या भागात महापालिकेने आरोग्य उपकेंद्र सुरु करावे, अशी मागणी येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे़ परंतु, त्यांची ही मागणी कोणीही गांभीर्याने घेतली नाही.
मुलांसाठी उद्यान व्हावे
मुकुंदनगर भागात अनेक ठिकाणी ओपन स्पेस आहेत़ हे ओपन स्पेस महापालिकेने विकसित करुन तेथे लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी आणि गृहिणींना मोकळा श्वास घेता येईल, असे उद्यान उभारावे, अशी तेथील नागरिकांची मागणी आहे़ त्यांच्या या मागणीलाही केराची टोपली दाखवण्यात आल्याचे नागरिक सांगतात.


पाण्याची टाकी बांधून झाली़ पण त्यात पाणी सोडण्यात येत नाही़ केडगावला पाणी मिळते़ मग मुकुंदनगरला का नाही? हा मुस्लिमबहुल भाग आहे म्हणून आमच्या मागण्या प्रत्येकवेळी टाळल्या जातात का? -मोहसीन मोहम्मद खान


‘लोकमत’चे आवाहन
‘लोकमत’ने वेळोवेळी शहरातील समस्यांना वाचा फोडली. नागरिकांनीही महापालिकेकडे अनेक प्रश्न मांडले. सदर प्रश्नांच्या सोडवणुकीचे आश्वासन त्या-त्या वेळी महापालिकेचे पदाधिकारी आणि संबंधित नगरसेवकांनी दिले. या प्रश्नांचे खरोखरच काय झाले? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘जवाब दो’ या मोहिमेद्वारे ‘लोकमत’ या निवडणुकीत करत आहे. महापालिका शाळांच्या दुरावस्थेपासून त्यास सुरवात केली आहे. याबाबत सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी काही मत नोंदवू इच्छित असतील, तर त्यांच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. - संपादक

 

Web Title: Nagar municipal elections: Gurkafat Mukundnagar in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.