महालावर स्वच्छता... गावात कचरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:42 AM2019-02-16T10:42:10+5:302019-02-16T10:42:25+5:30

आपल्या भागातील पर्यटनस्थळे स्वच्छ असली पाहिजेत. पर्यटनस्थळावर कचरा होणार नाही, यासाठी प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या पाहिजेत.

 Cleanliness on the premises ... garbage in the village! | महालावर स्वच्छता... गावात कचरा !

महालावर स्वच्छता... गावात कचरा !

Next

सुदाम देशमुख
अहमदनगर : आपल्या भागातील पर्यटनस्थळे स्वच्छ असली पाहिजेत. पर्यटनस्थळावर कचरा होणार नाही, यासाठी प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या पाहिजेत. जागोजागी कचरा कुंड्या ठेवल्या पाहिजेत. मात्र तसे न झाल्याने पर्यटक कुठेही कचरा टाकतात. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन फेकली जातात. त्यामुळे पर्यटनस्थळांचा परिसर गलिच्छ बनतो. त्यामुळे काही सामाजिक संघटना, तरुणांचे जथ्थे दर रविवारी महाल परिसरात जातात आणि स्वच्छतेची मोहीम घेतात. हे त्यांचे काम स्तुत्यच आहे. महालावरील स्वच्छता पटकन होते. सुका कचरा पटकन पोत्यात भरला की स्वच्छता मोहीम फत्ते होते. सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होतात. त्याला वाहवाही मिळते. हे काम अतिशय चांगले आहे. मात्र महालाचा परिसर स्वच्छ करीत असताना गावातील स्वच्छतेचे कोण पाहणार? एखाद्या तरुणाच्या गल्लीत कचरा साठलेला असतो. मात्र तो गल्लीतला कचरा उचलण्याऐवजी तो थेट महालावरचा कचरा गोळा करतो. महाल परिसरात कचरा होणार नाही ही जशी काळजी घेतली जाते, तशी गल्लीत कचरा झाला नाही पाहिजे, याची काळजी कोणीच घेताना दिसत नाही. शहरातील कचरा साफ झाला पाहिजे, याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. ही महापालिकेची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच नागरिकांची देखील आहे.
सामाजिक संस्था, तरुणांचे ग्रुप आणि इतर स्वच्छता प्रेमींनी नगरमध्येही स्वच्छता करावी. अगदी शाळांच्याभोवती कचरा कुंड्या ओसंडून वाहतात. आपण राहतो, अशा ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. कुंड्यांच्याबाहेर कचरा पडलेला असतो. लोक कचरा गाडीवरूनच फेकतात. कुंडीजवळ येतात आणि कुंडीत टाकण्याऐवजी कुंडीच्याबाहेर कचरा फेकला जातो. तो कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे एक पाऊल पुढे जाऊनच लोकांनी कचरा फेकला पाहिजे. नाल्यातही प्लास्टिकच्या पिशव्यांमधून कचरा फेकला जातो. त्यामुळे नाल्या तुंबल्या जातात.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचाही कारभार ढिसाळ आहे. नियोजन, व्यवस्थापनाअभावी कचरा जागेवरच पडून असतो. आता दोनवेळा साफसफाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र तो कायमस्वरुपी टिकण्याची शक्यता अजिबात वाटत नाही. त्यालाही कामगार युनियनकडून नेहमीच विरोध केला जातो. कचरा संकलनासाठी अपुरी साधन-सामुग्रीची नेहमीच चर्चा झडते. स्वच्छतेसाठी १४ व्या वित्त आयोगातून मिळालेला निधी तसाच पडून असतो, ही एक शोकांतिकाच! शेवटी शहर स्वच्छ झाले पाहिजे, ही ओढ महत्त्वाची आहे. त्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आले तरच शहर स्वच्छ होईल. केवळ स्वच्छतेच्या स्पर्धेत क्रमांक मिळवून गल्लीतले कचऱ्याचे ढीग कमी होणार नाहीत. केवळ कागदावर स्वच्छता असून उपयोग नाही, हेही थोडे महापालिकेने लक्षात घेतले पाहिजे.

Web Title:  Cleanliness on the premises ... garbage in the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.