शेवगाव : शेवगाव नगर परिषदेत निरनिराळ्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत अर्ज देऊनही दप्तर चौकशीमध्ये होणाºया दिरंगाईच्या निषेधार्थ भाजपाचे नगरसेवक अरुण मुंढे, शारदा काथवटे यांनी मंगळवारी शेवगाव येथे सुरु केलेले बेमुदत उपोषण कामांची सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यांतर मागे घेतले.
शेवगाव नगरपरिषदेमधील वाणिज्य विभागाच्या नोंदी व दप्तराची चौकशी वसुली विभागातील घरपट्टी व पाणीपट्टी यामधील तफावत तसेच ७/१२ व ८ अ या दप्तरामध्ये झालेल्या नोंदी, टँकरव्दारे पाणी पुरवठा, पाईप लाईन व वॉल लिकेज तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मागील ग्रामीण पंचायतीच्या काळातील अंतिम देयक आदी विविध कामांमध्ये झालेल्या गैर व्यवहाराची चौकशी व्हावी, याबाबत नगरसेवक मुंढे यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार अर्ज दिला होता. व नगरसेवक मुंढे व काथवटे यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले.
नगरसेवक कमलेश गांधी, विनोद मोहिते, महेश फलके, नितीन दहिवाळकर, तुषार वैद्य, कचरू चोथे, गणेश कराड, कॉ.संजय नांगरे, अविनाश देशमुख, दिगंबर काथवटे, अशोक ससाणे आदी कार्यकर्त्यांनी उपोषणास पाठिंबा दिला होता.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून नगरपरिषदेचे वाणिज्य रजिस्टर व पाणी पुरवठा योजनेच्या देयकाची संचिका ताब्यात घेण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी आपल्या अर्जाच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्या नंतर बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित केल्याचे मुंढे यांनी जाहीर केले. याबाबत दिरंगाई दिसून आल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.