लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : येथील रणगाडा संग्रहालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराचे शस्त्र प्रदर्शन, तसेच मिलिट्री बँड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजता सैन्य अधिकाºयांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नगरमधील ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात. नगर-सोलापूर रस्त्यावर नगरपासून पाच किलोमीटर अंतरावर लष्कराच्या हद्दीत बराहबक्ष महाल व रणगाडा संग्रहालय आहे. या संग्रहालयात आतापर्यंत झालेल्या युद्धांत भारताने पकडलेले रणगाडे जतन करून ठेवण्यात आले आहेत. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी येथे हजारो देशप्रेमी भेट देतात. त्यामुळे लष्करातर्फे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी सैनिकांचे शस्त्र प्रदर्शन होणार आहे. त्यात सैन्याच्या बंदुका, लाँचर, रणगाडे, क्षेपणास्त्रे याची तंत्रसुद्ध माहिती लष्कराकडून नागरिकांना दिली जाते. त्याचबरोबर लष्करी बँडचे एक पथक या ठिकाणी प्रदर्शन करणात आहे. तरूण, शालेय मुलांना भारतीय सेनेची जवळून ओळख व्हावी, त्यांना लष्कराच्या शौर्याचे, बलिदानाचे स्मरण व्हावे, तसेच यातून पुढील जीवनात प्रेरणा मिळावी, हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.