पत्र मिळालं, आपणास शुभेच्छा; अखेर अण्णा हजारेंच्या ३८व्या पत्राला मोदींचं एका ओळीचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 12:37 PM2019-02-02T12:37:50+5:302019-02-02T13:27:12+5:30

 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या पाच वर्षांत ३८ वेळा पत्र पाठविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पत्राला उत्तर दिले.

Anna Hazare begins hunger strike over Lokpal narendra modi sent letter to anna hazare | पत्र मिळालं, आपणास शुभेच्छा; अखेर अण्णा हजारेंच्या ३८व्या पत्राला मोदींचं एका ओळीचं उत्तर

पत्र मिळालं, आपणास शुभेच्छा; अखेर अण्णा हजारेंच्या ३८व्या पत्राला मोदींचं एका ओळीचं उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्दे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या पाच वर्षांत ३८ वेळा पत्र पाठविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पत्राला उत्तर दिले.'तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा' एवढाच उल्लेख पत्रात करून शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे मोदींनी टाळले.उपोषणाच्या चौथ्या दिवशीही केंद्र व राज्य सरकारकडून अधिकृत संपर्क करण्यात आलेला नाही.

राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या पाच वर्षांत ३८ वेळा पत्र पाठविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा  पत्राला उत्तर दिले. 'तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा' एवढाच उल्लेख पत्रात करून शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे मोदींनी टाळले. उपोषणाच्या चौथ्या दिवशीही केंद्र व राज्य सरकारकडून अधिकृत संपर्क करण्यात आलेला नाही. केंद्र सरकार त्यांच्या मार्गाने जाईल, आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करू, असे अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी व्हावी. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा या मागण्या करीत तबल्ल ३८ वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांच्या पत्रांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबविले. २५ जानेवारी रोजी पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांना पत्र पाठविले. ते शुक्रवारी हजारे यांना मिळाले. परंतु, त्यात हजारे यांच्या मागण्यांना उत्तर देण्याचे मोदींनी टाळले. 



गेल्या वर्षी हजारे यांनी २३ ते २९ मार्च २०१८ या कालावधीत नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर याच प्रश्नी उपोषण आंदोलन केले होते. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी कोणताही संपर्क न साधता उपोषणाकडे दुर्लक्ष केले होते. पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत लेखी आश्वासन देऊन हजारे यांचे उपोषण सोडविले होते. परंतु, गेल्या ९ महिन्यांत लेखी आश्वासनांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने हजारे यांनी पुन्हा लेखी आश्वासनांची आठवण करून देत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र पाठवून लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याची खंत हजारे यांनी व्यक्त केली होती. 

केंद्र व राज्य सरकारने हजारे यांच्या मागण्या व उपोषणाबाबत अधिकृत संपर्क उपोषणाच्या चौथ्या दिवसापर्यंत केलेला नाही. शेतमालाला खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळणे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, लोकपाल, लोकायुक्त कायदा हे शेतकऱ्यांचे व जनतेचे प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. सरकार आपल्या मागार्ने काम करील, आम्ही आमच्या मागार्ने वाटचाल करू. वेळ लागेल पण प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी शरीरात प्राण असेल तो पर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार हजारे उपोषणाच्या चौथ्या दिवशी यांनी व्यक्त केला.

Web Title: Anna Hazare begins hunger strike over Lokpal narendra modi sent letter to anna hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.