विदुर घर पावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:25 PM2019-06-02T12:25:13+5:302019-06-02T12:25:27+5:30

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कर्म, ज्ञान, उपासना असे प्रामुख्याने तीन मार्ग सांगितलेले आहे.

Vipura home brewing | विदुर घर पावना

विदुर घर पावना

Next

अहमदनगर : आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कर्म, ज्ञान, उपासना असे प्रामुख्याने तीन मार्ग सांगितलेले आहे. वेदातही याच तीन मार्गाचे प्रतिपादन केले आहे. म्हणून वेद सुद्धा त्रिकांडात्मक झाला आहे. अर्थात तीनही मार्ग एकमेकाचे पूरक आहेत. नुसते कर्म करून भागत नाही तर कर्म कसे करावे याचेही ज्ञान आवश्यक आहे. नाहीतर कर्म विपरीत कधी होईल सांगता येत नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, मंत्र चळे जरी थोडा तरी धड्ची होय वेडा नित्य, नैमितिक,काम्य, प्रायश्चित, कर्म, विकर्म, अकर्म त्यातही पुन्हा सत्व, रज, तम असे त्रिगुणात्मक कर्म, कर्म कसे करावे हे जर ज्ञान नसेल तर ते कर्म विपरीत फळ देते.
आंधळ्या व्यक्तीने देवाची प्रार्थना केली. देव त्याला प्रसन्न झाला व म्हणाला काय मागायचे ते माग. आंधळ्या माणसाने देवाला गरुडाचे पंख मागितले. देव तथास्तु म्हणाला व तो आंधळा मनुष्य पंखाच्या साह्याने आकाशात उडू लागला. शेवटी डोळे नसल्यामुळे एका डोंगराला जावून धडकला. तात्पर्य ज्ञान नसेल तर ते कर्म सुद्धा व्यर्थ होते. बरे ज्ञान जरी झाले तरी त्याचा प्रकार असा आहे कि ज्याचे अज्ञान आहे. त्याचेच ज्ञान व्हावे लागते. दुसरे ज्ञान चालत नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या ध्येयाचे ज्ञान हवे. नाहीतर भरकटल्यासारखे होणार. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। तत स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति, ज्ञानासारखी जगात कोणतीही गोष्ट पवित्र नाही. पण ते ज्ञानहि कधी कधी फार मोठा धोका देते. माउली म्हणतात, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लागे अज्ञानापाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवी, ज्ञानाचा अहंकार फार वाईट तो झालेले ज्ञान सुद्धा आवृत्त करतो. ‘माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही’ व मग तो सर्वांना त्रास देतो. असा ज्ञानाच्या अहंकारात अडकलेला माणूस मुक्त होऊ शकत नाही. एके ठिकाणी म्हटलेले आहे, जनी हित पंडित सांडीत गेले’. अहंतागुणे ब्रह्मराक्षस झाले अहंकार कोणताही असला कि तो घात करतो. तुकाराम महाराज म्हणतात, ‘अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार’ अहंकारी मनुष्य कोणत्याही क्षेत्रातील असो तो कोणालाच मानीत नाही, ‘अठोनी वेठोनी बांधिला मुंडासा’ ‘चालतसे म्हैसा जनामाजी’ ‘ज्ञानात जर अहंकार नसेल तर ते ज्ञान सुद्धा शोभते.’ ‘नम्र झाला भूता’ ‘तेणे कोंडिले अनंता किंवा माउली फार सुंदर ओवी सांगतात, ‘फळलिया तरुची शाखा भूमीसी उतरे देखा’ ‘तैसे भूतजात अशेखा’ नमुची आवडे त्याप्रमाणे खरे ज्ञान हे नम्र असते. विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: जो विद्या विनय संपन्न आहे तो ब्राह्मण, गौ, हत्ती, कुत्रे आणि चांडाळ या सर्वामध्ये समदर्शन करतो. सर्वामध्ये एका परमात्म्याला पाहतो तो खरा पंडित आहे. अशा व्याखेचा पंडित मिळणे अतिशय दुर्मिळ आहे. श्री संत नामदेव महराजांना कुत्र्यात पांडुरंग दिसला, श्री संत एकनाथ महाराजांना गाढवात भगवंत दिसला. तात्पर्य कोरडे ज्ञान काही कामाचे नाही. त्याकरिता उपासना म्हणजेच भक्ती, प्रेम, भावना ह्या गोष्ठी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत.
भक्तीप्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तयामाजी. प्रेम सुख देई प्रेमसुख देई, प्रेमाविण नाही समाधान, नाथ बाबांचे हे मागणे किती सार्थ आहे. भगवंताला तुमचे यथासांग कर्म, पांडित्य, शस्त्रज्ञान, विद्वत्ता याची काहीही आवशकता नाही. एक प्रसिध्द उदाहरण आहे. श्रीकुष्ण भगवान पांडवांची बाजू धरून कौरवांकडे शिष्टाईसाठी आले होते. दुर्योधनाने त्यांचे खूप मोठे स्वागत केले, मिरावूणूक काढली उत्तम प्रकारचे भोजनासाठी अन्नपदार्थ, षड्रससंपन्न पदार्थ केले. दरबारात श्रीकृष्णाचे स्वागत केले. शिष्टाई सफल झाली नाही.
कौरवांच्या दरबारातील मंत्री श्री विदुर काका हे भगवंताचे अत्यंत लाडके भक्त, यमधमार्चे अवतार, अत्यंत निस्पृह असा मंत्री आता सापडणे मुश्कील. त्या विदुर काकांच्या पत्नीला वाटत होते कि भगवंत आपल्या घरी जेवायला आले तर किती चांगले होईल ? आणि आश्चर्य म्हणजे श्रीकृष्णाने दरबारातच विदुर काकाना हळूच कानात सांगितले, कि मी तुझ्याकडे जेवायला येणार आहे. त्यांना खूप आनंद झाला. झटकन ते घरी गेले. आणि पत्नीला सर्व हकीगत सांगितली. ती हि कृष्ण भक्त होती. प्रेमामध्ये ती मग्न होऊन गेली. देहभान विसरली. एका हिंदी कवीने हाच प्रसंग भावपूर्ण वर्णन केला आहे.
आज हरी आये, विदुर घर पावना॥
विदुर नहीं घर मैं विदुरानी, आवत देख सारंगपाणी ।
फूली अंग समावे न चित्ता॥ भोजन कंहा जिमावना ॥

केला बहुत प्रेम से लायीं, गिरी गिरी सब देत गिराई ।
छिलका देत श्याम मुख मांही ॥ लगे बहुत सुहावना

इतने में विदुरजी घर आये, खरे खोटे वचन सुनाये ।
छिलका देत श्याम मुख मांही ॥ कँहा गवांई भावना

केला लीन्ह विदुर हाथ मांही, गिरी देत गिरधर मुख मांही ।
कहे कृष्ण जी सुनो विदुर जी॥ वो स्वाद नहीं आवना

बासी कूसी रूखी सूखी, हम तो विदुर जी प्रेम के भूखे ।
शम्भू सखी धन्य धन्य विदुरानी ॥ भक्तन मान बढावना

विदुर काका बाजारातून काही भाजीपाला आणण्याकरिता गेले. तोपर्यंत तर भगवंत घरी आले. दारातून हाक मारली. विदुरराणी पटकन आल्या आणि भगवंताचे स्वागत केले. बसायला चौरंग दिला. घरात असलेले केळी आणले व प्रेमाने भगवंताला केळे सोलून त्याचे सालपटे देऊ लागली. मन प्रेममग्न होऊन गेल्यामुळे देह तादात्म्य राहिले नाही. त्यामुळे व्यवहार चुकला पण ! भगवंताला काहीही वाटले नाही ते तीने दिलेले केळाचे साल आवडीने खाऊ लागले व तेवढ्यात विदुर काका आले आणि त्यांनी हा प्रकार बघितला. त्यांना वाईट वाटले. त्यांनी सौभाग्यवतीला सावध केले आणि भगवंताची क्षमा मागितली. स्वत: केळी देवू लागले. केळीची सालपटे काढून गर देवू लागले. तेव्हा भगवंत म्हणाले, विदुरा ! मघाच्या त्या सालपटामध्ये जी गोडी होती. ती गोडी याच्यामध्ये नाही, कारण विदुरराणीला देहभाव नव्हता. म्हणून ते प्रेम खरे होते, व्यवहार दृष्ट्या जर ते चुकीचे असले तरी प्रेम श्रेष्ठ आहे. मला इतर कोणत्याही साधनापेक्षा प्रेम श्रेष्ठ वाटते. म्हणून कर्म असो, ज्ञान असो त्याच्या जोडीला जर प्रेम असेल तरच ते फलद्रूप होते. अन्यथा नाही. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति। तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मन: हे गीतेमध्ये सांगितलेले खरे आहे.


भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी (पा) ता. नगर
मो. ९४२२२२०६०३

 

Web Title: Vipura home brewing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.