आनंद तरंग - कल्पनेचे देव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:08 AM2019-06-03T04:08:09+5:302019-06-03T04:08:23+5:30

अननदेवी-देवतांच्या कल्पनेचे उदंड पीक तसे इथे हजारो वर्षांपासून आलेय; पण त्याचा खरा सुळसुळाट झाला, तो मध्ययुगीन कालखंडात जेव्हा माणसे आपली बुद्धी दगडाच्या देवाच्या पायांजवळ गहाण टाकीत होते.

Happiness wave - God of the imagination | आनंद तरंग - कल्पनेचे देव

आनंद तरंग - कल्पनेचे देव

Next

प्रा. शिवाजीराव भुकेले

जेव्हा माणसातील दुर्गुणांची संख्या हळूहळू कमी होऊन तो सद्गुणांच्या आचरणामध्ये आत्मानंद मानू लागतो, तेव्हा त्याची वाटचाल ‘देव माणूस’ या संज्ञेकडे होते आणि हाच देवमाणूस अंधारात चाचपडणाऱ्या समाजास जेव्हा सन्मार्गाचा उजेड दाखवितो, तेव्हा त्याची वाटचाल देवत्वाकडे होते. खरं तर देवताची खरी संकल्पना माणसाने विकार टाकून विवेक ग्रहण करावा, या सत्याशी निगडित आहे; पण आपल्याकडे मात्र देवत्वाची कल्पना अवतार कल्पनेशी जोडली गेल्यामुळे भारतासारख्या खंडप्राय देशात बाकीचे काही नाही पिकले तरी चालेल, पण देवांचे पीक मात्र एवढे पिकले आहे की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देवांनी माणसांसाठी कुठला कोपरा रिकामा ठेवलाच नाही. जिथे जागा मिळेल, तेथे प्रार्थनास्थळ उभारून देव उभा केला जातो. त्यांना वेगवेगळी नावे आणि रूपे बहाल केली जातात. प्रार्थनास्थळ उभारण्याआधीच दगडाला शेंदूर फासून त्याची सुरुवात होते. माणसात देव पाहण्यापेक्षा दगडात देव पाहिला जातो.

अननदेवी-देवतांच्या कल्पनेचे उदंड पीक तसे इथे हजारो वर्षांपासून आलेय; पण त्याचा खरा सुळसुळाट झाला, तो मध्ययुगीन कालखंडात जेव्हा माणसे आपली बुद्धी दगडाच्या देवाच्या पायांजवळ गहाण टाकीत होते. या देवाच्या नावावर मग अनेक मागण्याही भक्तांकडून होऊ लागल्या. तेव्हा संत नामदेवासारखे आंतरभारतीचे जनक या समाजाला बुद्धिनिष्ठ प्रश्न विचारित होते,
देव दगडाचा भक्त मावेचा। संदेह दोघांचा फिटे कैसा।
ऐसे देव तेही फोडीले तुरकीं। घातले उदकीं बोभातींना।।
पाषाणांच्या आणि तथाकथित कल्पनेच्या पाठीमागे लागलेल्या देवांच्या पाठीमागे व पुढे मायावी भक्तांची तोबा गर्दी होते. आपल्या इच्छेसाठी देवांना ‘साकडे’ घालू लागतात अन् निर्लज्ज देवसुद्धा बोकडे मागू लागतात, अशा बुद्धिभ्रष्टांना नामदेवांनी विचारले आहे, अरे! तुमच्या कल्पना जगतातल्या या ‘पाषाणांना जेव्हा यवनांनी तोडून-फोडून टाकले, काहींना उचलून पाण्यात फेकून दिले, तेव्हा हे सारे देव त्यांच्या मानगुटीवर का बसले नाहीत? या देवांना मुक्त करण्यासाठी नंतर माणसातला देव शिवाजी राजाच जन्माला यावा लागला. ज्या देवी-देवतांना स्वत:चेच रक्षण करता येत नाही, ते आमचे रक्षण काय करणार? पण टिळे, टोप्या, वस्त्र, सोहळे, महाअभिषके आणि महानैवेद्याच्या नावाखाली आम्ही दगडाच्या देवाला खूश करण्यासाठी जिवंत माणसाला नागवीत आहोत. नवसाच्या नावावर देव खपविले जाऊ लागले. नवसाला पावतो, अशी ज्या देवाची प्रसिद्धी तेथेच भाविकांची गर्दी वाढताना दिसते. मग देवी-देवतांमध्येही गटबाजी मनुष्यच पाडू लागला. नवसाला पावणारा आणि न पावणारा देव अशी वर्गवारी मनुष्य मनातच करू लागला. आपल्याला हवे ते आपल्या पदरी थेट देव कसे टाकेल, याचीव स्वप्ने पाहिली जातात. इथे माणसे मृत्युपंथाला लागली आहेत आणि पाखंडी देवाच्या कल्पना स्वर्गसुखाच्या ‘वाकुल्या’ दाखवीत आहे. अशा वेळी विवेकी समाजाचे शिल्पकार महात्मा फुले म्हणतात,
कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखांड जगामाजी।
किन्नर-गंधर्व ग्रंथी नाचविले, अज्ञ फसविले कृत्रिमाने।। देवत्वाचा खरा अर्थ न समजलेले भाविक मंदिरातच गर्दी करू लागतात. खरा देव आणि त्याची देवपूजा कशी असते, ते न समजलेले भक्तच प्रार्थनास्थळी भलतीच धांदल उडवू लागले. नेमके देवत्व म्हणजे काय, हे समजेल तोच खरा भक्त.

Web Title: Happiness wave - God of the imagination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.