‘‘कौतुकाचे मोल’’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 09:04 PM2019-01-10T21:04:23+5:302019-01-10T21:06:33+5:30

आपल्या व्यक्तीगत नातेसंबंधात असणार्‍या सगळयांना कौतुकाची भुक असते. त्याकडे विशेष लक्ष द्या. ही भूक भागवताना असत्याचा आधार घेऊ नका म्हणजेच खोटी स्तुती करू नका.

"Excellent value" : A spiritual segment | ‘‘कौतुकाचे मोल’’

‘‘कौतुकाचे मोल’’

Next

-डॉ. दत्ता कोहिनकर

          उच्चशिक्षित सुनीताला लग्नानंतर रमेशने त्वरित अधिकारपदाची नोकरी सोडावयास लावली. शेवटच्या दिवशी निरोप समारंभाला सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने सुनीताचे खुप कौतुक केले. सुनीताला स्वकर्तुत्वाचा अभिमान वाटत होता. नोकरी सोडल्यानंतर काही महिन्यातच सुनीताला स्वतःच्या जीवनात एक पोकळी जाणवू लागली. दीड वर्षानंतर सुनीता मधुन-मधुन वेडयासारखी वागतेय - नैराश्याकडे झुकतेय हे रमेशला लक्षात आले. तासनतास सुनीता गप्प बसून राही. तिची झोप उडाली होती. रमेशला मी सुनीताला मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. दोघा नवराबायकोची डॉक्टरांबरोबर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मानसोपचार तज्ञाने या नैराश्याचे मुळ कारण शोधुन काढले.

            अलीकडे सुनीताला सुरक्षितता, आपुलकी, प्रेम, मैत्री, संतती आणि मानसन्मान (कौतुकाचे बोल) या गोष्टींचा जीवनात अभाव वारंवार जाणवत होता. कौतुकाचे दोन शब्द व प्रेमाचा आधार न मिळाल्यामुळे सुनीताच्या मनावर याचा गंभीर परिणाम झालेला जाणवत होता, त्यातून तिला नैराश्य आले होते. 

           ज्या लोकांना आपल्याला लोकांनी मान दयावा किंवा कौतुक करावे असे वाटत असते त्यांच्या बाबतीत तसे झाले नाही तर त्यांना नैराश्य येते. सिगमंड फ‘ाईड म्हणतो ‘स्वतःचे महत्वपूर्ण स्थान, स्वतःचे कौतुक’ ही माणसाची आंतरिक इच्छा असते. लिंकन म्हणाले होते. मनुष्यप्राण्याला कौतुकाची भुक असते. जी व्यक्ती ही भुक भागवते ती व्यक्ती लोकप्रिय होते. आपले कौतुक व्हावे, आपल्याला मोठेपणा मिळावा ही इच्छा मनात बाळगणे हाच मानव व प्राणी यांच्यात मोठा फरक आहे. आतापर्यंत ज्या ज्या थोर व्यक्तींशी माझा संबंध आला आहे त्या व्यक्तींच्या पाठीवर कोणीतरी शाबासकीची थाप टाकून कौतुकाचे दोन शब्द त्यांना प्रदान केल्याचे दिसून आले. 

              अनेक घटस्फोटांच्या मुळाशी गेले असता एक सत्य प्रखरतेचे दिसून येते. दोघांनीही एकमेकांच्या गुणांचे कौतुक केलेले नसते, कष्टाची पावती दिलेली नसती, प्रेम व्यक्त केलेले नसते, जोडीदाराचा आपल्याला अभिमान वाटतो असा संदेश एकमेकांना पोहचवण्यात ते कमी पडलेले असतात. प्रसिध्द लोकांत महत्वाचे स्थान मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाच्या अनेक कथांनी आपला इतिहास झळाळून निघाला आहे.शालांत परिक्षेत उच्चश्रेणी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा अभ्यास केला असता त्यांच्या शिक्षकांनी, आई-वडिलांनी संधी मिळेल तेव्हा त्यांच्या पाठीवर शाबासकीची मारलेली थाप - कौतुकाचे शब्द यांची यांची सकारात्मक उर्जा त्यांना प्रदान केल्याचे दिसून येते. आपण आपल्या मुलांचे, मित्रमैत्रीणींचे, कामगारांचे शारीरिक चोचले पुरवण्यावर भर देतो पण त्यांचा स्वाभिमान व आत्मविश्‍वास जपण्यासाठी काय करतो ? त्यांना शारीरिक उर्जेचा सतत पुरवठा व्हावा म्हणून अंडी, मटन, दुध, चिकन वगैरे देतो. पण ज्याने त्यांच्या मनाची उर्जा वाढेल व मनाचा आत्मविश्‍वास वाढेल असे चार गोड कौतुकाचे शब्द बोलतो का ? याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. 

            आपल्या व्यक्तीगत नातेसंबंधात असणार्‍या सगळयांना कौतुकाची भुक असते. त्याकडे विशेष लक्ष द्या. ही भूक भागवताना असत्याचा आधार घेऊ नका म्हणजेच खोटी स्तुती करू नका. त्याऐवजी प्रत्येकातील चांगले गुण शोधा व प्रामाणिकपणे मोकळया मनाने त्याचे कौतुक करा. तुमच्या या वागण्यामुळे तुम्ही लोकप्रिय व्हाल. लोक एखादया खजिन्याप्रमाणे तुमचे बोल जपून ठेवतील. तुम्ही जरी त्यांना विसरला तरी ते कायमचे तुम्हाला लक्षात ठेवतील. चला तर मग आजपासून चालू करूया - कौतुकाचे दोन शब्द बोलण्याचा सराव..

(लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत)

 

Web Title: "Excellent value" : A spiritual segment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.