अनादी निर्गुण प्रगटली भवानी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:23 AM2018-10-13T11:23:02+5:302018-10-13T11:23:12+5:30

भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय म्हणजे या देशातील ऋषी-मुनींनी साधू-संतांनी समाज जीवन सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे लक्ष दिले व प्रत्येक विषयावर मार्गदर्शन केले.

Anadi Nirgunya Pragliya Bhavani | अनादी निर्गुण प्रगटली भवानी 

अनादी निर्गुण प्रगटली भवानी 

Next

भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय म्हणजे या देशातील ऋषी-मुनींनी साधू-संतांनी समाज जीवन सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे लक्ष दिले व प्रत्येक विषयावर मार्गदर्शन केले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ व या चारही पुरुषार्थावर विस्तृत वर्णन फक्त याच संस्कृतीने केले आहे. विविध मार्ग, संप्रदाय, पंथ व त्याप्रमाणे केल्या जाणाऱ्या साधना काही प्रगट काही गुप्त अशा अनेक प्रकारच्या साधना. काही साधना अशा आहेत की त्याने जीवाचे कल्याण न होता अहित होऊ शकते म्हणून आमच्या संतांनी त्याचा निषेधही केला आहे. ‘मंत्र चळे जरी थोडा । तरी धडची होय वेडा ।।(तुकाराम महाराज) जेणेकरून समाजाचे हित होईन अशाच मार्गाचे समर्थन संतांनी व संस्कृतीने केले आहे.
बरेचसे मार्ग हे आदिनाथापासून (शंकरापासून) सुरु झालेले आहेत. व काही मार्ग शक्ती म्हणजे पार्वतीपासून आलेले आहेत तात्पर्य या दोघांनी ज्ञानाचा प्रचार , विस्तार केला आहे. शक्ती उपासना हा मार्ग त्यापैकीच एक. त्यालाच काही ठिकाणी वाम मार्ग, वामाचारही म्हटलेले आहे. या मार्गामधे शक्तिसाधना शक्तिउपासना होती पण पुढे याच संप्रदायात वामाचार सुरु झाला त्याला विकृत स्वरुप आले. काळाच्या ओघात संप्रदायाला सुद्धा मालिन्य, अनाचार येत असतो शक्तिउपासनेमध्ये पंच ‘म’ काराची साधना सुरु झाली . पंच ‘म’ कार म्हणजे मद्य मांसमत्स्य मनंच मुद्रा मथुनमेवच ॥ मकार पंचक प्राहुर्योगिनां मुक्तिदायकं॥ तंत्रविज्ञान (पंचमकार रहस्य) १/-मद्य २/- मांस ३/-मत्स्य ४/-मथुन ५/-मुद्रा या पंचमकारांचा तंत्रमार्गामध्ये गुप्तपणे वापर सुरु झाला . खरे तर मद्य-मांसादिकाचा महाभारतामध्ये निषेधच केला आहे. महाभारत अनुशासन पर्वामध्ये स्पष्ट लिहिले आहे की, ज्याला आपले कल्याण करुन घ्यायचे आहे त्याने मांस भक्षण कधीही करु नये कारण मांस खाल्याने हिंसावृत्ती वाढते, क्रोध वाढतो, मद्य प्राशन केल्याने मद तयार होतो व भ्रम उत्पन्न होतो विषय भोगाच्या नुसत्या कल्पनेने माणसाचे अध:पतन होते. ‘ध्यायतो विषयान्पुंस: संगस्तेषुपजायते’ (गीता). कालाच्या ओघात तंत्रमार्ग लोकांत अप्रिय झाला कारण त्यामुळे अनाचार होऊ लागला.
महाराष्ट्रातील संतांनी विचार केला आणि शक्ती उपासनेला एक वेगळा अर्थ प्रदान केला. त्यामुळेच महाराष्ट्रात शक्तीच्या नावाखाली अनाचार खपवून घेतला गेला नाही अशा उपासनेचा आमच्या संतांनी निषेध केला. खरा अध्यात्मिक अर्थ सांगितला. कोणी तिला आदिशक्ती, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ,चिद्शक्ती, कुंडलिनी शक्ती अशी वेगवेगळी नावे दिली. शारदीय नवरात्र आणि वासंतिक नवरात्र असे दोन प्रकार आहेत. अश्विन महिन्यातले शारदीय नवरात्र व चैत्र महिन्यातील वासंतिक नवरात्र. महासरस्वती ही ज्ञानाचे रुप आहे, महालक्ष्मी ही ऐश्वर्याचे प्रतीक आहे व महाकाली ही रुद्राचे म्हणजे संहाराचे म्हणजे कर्माचे प्रतीक आहे.
संतांनी सर्वसामान्य लोकांचा विचार केला. खरे अध्यात्म तळागाळात पोहचले पाहिजे त्यांच्या पातळीवर तो खरा अर्थ पोहचला पाहिजे आणि म्हणून लोकभाषेचा स्वीकार केला व त्यांच्या भाषेत उपदेश केला त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘भारुड’. बहुरुढ या शब्दाचे अपभ्रंश रुप म्हणजेच भारूड. लोकसाहित्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रकार. ह्या भारुडाच्या माध्यमातूनच श्री एकनाथ महाराजांनी लोकजागृती केली व धर्मजागृतीही केली. ‘दार उघड बये दार उघड’ म्हणून मोगल सत्तेविरुध्द जगदंबेला हाक मारली. नवरात्रीचे महत्व आणि आदिशक्तिचे खरे स्वरुप एकनाथांनी हे भारुड लिहिले आहे .अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर मर्दनालागुनी । त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्तालागी तू पावसि निर्वाणी ॥१॥आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनि माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेइन ।भेदरहित वारीसी जाईन ।ध्रु॥ नवविध भक्तिच्या करिन नवरात्रा । करोनि पोटि मागेन ज्ञानपुत्रा ।धरिन सदभाव अंतरिच्या मित्रा ।दंभ सास-या सांडिन कुपात्रा ॥३॥पूर्णबोधाची घेईन परडी । आशातृष्णेच्या पाडिन दरडी । मनोविकार करिन कुरवंडि ।अदभुत रसाची भरिन दुरडि ।।४। ।आता साजणी झाले मी निसंग । विकल्प नव-याचा फेडियला पांग । काम क्रोध हे झोडीयले मांग ।केला मोकळा मारग सुरंग । ।५। असा जोगवा मागुनी ठेविला । जाऊनि नवस महाद्वारी फेडिला । एकपणे एकाजनार्दनी देखियेला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
आई भवानी ही अनादि आहे म्हणजे तिला जन्म-मरण नाही, ती आत्मरुप आहे. मोहरुपी महिशासुराला मारण्यासाठी ती प्रगट झाली आहे. आध्यात्मिक ताप, अधिभोतीक ताप, अधिकविक ताप अशा तीन तापाची ती झाडणी करण्यासाठी प्रगटली आहे. अशा या निर्गुण-निराकार असणाºया भवानी मातेची उपासना करीन, द्वैत-भाव, आप-पर भाव सारुन अद्वैत ज्ञानाची माळ मी घालीन. बोधाचा झेंडा हाती घेऊन , भेदरहित वारी करीन. भेद गेले पाहिजे म्हणून आईचा जोगवा मागेन. नवविधा भक्ती म्हणजेच नवरात्री , ज्ञानपुत्र मी मागेन, अंतरीचा सदभाव हाच मित्र, दंभ -हाच सासरा आहे, तो कुपात्र आहे. पूर्ण-बोध(यथार्थ ज्ञान) म्हणजेच परडी आहे जी देवीला अर्पण करावी लागते. आशातृष्णेच्या दरडि पाडिन , मनोविकार कुरंवडि करिन, अदभुत रसाची दुरडि भरिन (शांताचिया घरा । अदभुत आलासे पाहुणेरा। ज्ञान.) ही भक्ती करुन मी नि:संग झाले आहे, विकल्परुपी नवºयाचा पांग फेडला आहे. काम, क्रोध हेच भजन दरिचे मारक मी झोडले, आणि मोक्षाचा मार्ग मोकळा केला आहे. असा जोगवा (उपासना) मागून मी महावाक्य हेच महाद्वार तेथे नवस फेडला. जनार्दन स्वामींच्या कृपेने सर्वत्र एकत्वाचीच प्रचिती येऊ लागली त्यामुळे जन्म-मरणाचा फेरा सहजच चुकला आहे. संतांची जगदंबा ! ही अशी आध्यात्मिक आहे. यामुळे खरी समाज जागृती आणि संयमी जीवन , सुखी -समाधानी जीवनाची नवरात्री आपण साजरी करूया. हिच खरी नवरात्री आहे व भवानी मातेचे खरे प्रागट्य आहे.

- भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले ,गुरुकुल भागवताश्रम चिचोंडी (पा), ता. नगर .
मो . ९४२२२२०६०३

 

Web Title: Anadi Nirgunya Pragliya Bhavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.