शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांची गर्जना : इच्छुकांच्या मुलाखती यवतमाळ : राज्यात सत्तेत असलेल्या मित्र पक्षाकडून सातत्याने दगा-फटका केला जात आहे. शिवसैनिक हा लाटेवर नव्हे, तर समाज कार्यामुळे जनमानसात रुजला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला आडवे करूनच भगवा फडकवू, अशी गर्जना शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी येथे केली. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक व निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखत प्रसंगी ते बोलत होते. ना. राठोड म्हणाले, सत्तेत असूनही शिवसैनिक हा कायम अन्यायासाठी लढणारा आहे. त्यामुळेच सत्तेत असलो, तरी मनमोकळेपणाने काम करता येत नाही. नोटाबंदीने सामान्य माणसांचे प्रचंड हाल होत आहे. सत्तेपेक्षा शिवसेनेसाठी सामान्य माणूस महत्त्वाचा आहे. म्हणून शिवसेनाच विरोधकाच्या भूमिकेत आहे. आम्हाला लालदिव्याची हौस नाही. यापूर्वीही शिवसैनिक म्हणून काम केले आणि पुढेही करीत राहणार, असे संजय राठोड यांनी सांगितले. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अनेक प्रश्नांना निकाली काढले. जनता दरबाराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्यांंना न्याय दिला. सलग १६ तास जनता दरबार चालविला. जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पाठपुरावा केला, कृषिपंपाच्या १२ हजार वीज जोडण्या दिल्या. तुकडेबंदी कायद्यातून शेतकऱ्यांंना दिलासा दिला. अशा लोकोपयोगी कामांचा धडका सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे पालकमंत्रीपदावरून काढले. याचे दु:ख आहे. मात्र जनता व शिवसैनिक पाठीशी असल्याने याहीपेक्षा दुप्पटीने काम करणार आहे. शिवसेनेशी दगा-फटका करणाऱ्यांंना जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा दाखवून देऊ, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती स्थानिक बाळकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित केल्या होत्या. यामध्ये पुसद, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, नेर, बाभूळगाव, महागाव, आर्णी येथून हजारोंच्या संख्येने इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक धडकले होते. हा प्रतिसाद पाहून शिवसेना नेत्यांनीसुद्धा जिल्हा परिषदेतील विजयाचा विश्वास व्यक्त केला. भाजपाला शिवसेनेच्या शक्तीची भीती भाजपाला शिवसेनेच्या या वाढत्या शक्तीची भीती वाटली. त्यामुळेच त्यांनी पालकमंत्रीपद काढून घेतले. मात्र पदापेक्षाही शिवसैनिकांची आणि जनतेची ताकद मोठी आहे. त्यामुळे याचा कोणताही फरक पडणार नाही. प्रत्येक उमेदवाराने नियोजन करून निवडणुका लढवाव्या, उमेदवारासाठी कुठेही, केव्हाही येण्याची आमची तयारी असल्याचे खासदार भावना गवळी यांनी यावेळी सांगितले. भाजपाने पाठीत खंजीर खुपसला या बैठकीत माजी आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनीसुद्धा संबोधित केले. भाजपाने पालकमंत्री पद काढून पाठीत खंजीर खुपसल्याची टीका नांदेकर यांनी केली. समाजकारणाचा मूलमंत्र शिवसैनिकांकडे असल्याने यवतमाळ विधानसभेत पाचशे मतांनी पराभव झाला. लाटेवर निवडून आलो नाही, तर जनसेवेच्या माध्यमातून संघटन उभे असल्याचे यावेळी जिल्हा प्रमुखांनी सांगितले. बैठकीला माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, परमानंद अग्रवाल, बापू पाटील जैत, नगरसेवक राजेंद्र गायकवाड, प्रवीण पांडे, बाजार समिती उपसभापती गजानन डोमाळे, संजय रंगे, किशोर इंगळे, नामदेवराव खोब्रागडे, कळंबचे नगराध्यक्ष दिगांबर मस्के आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी) दीड हजारांवर इच्छुकांचे अर्ज जिल्हा परिषद, पंचायत समितीची उमेदवारी मिळावी म्हणून एक हजार ६६९ इच्छुकांनी अर्ज दिले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ६६९ अर्ज आले. तर एक हजार अर्ज पंचायत समितीकरिता आल्याचे सांगण्यात आले. उशिरापर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. यातील एका जागेसाठी तीन उमेदवारांचे नाव पक्षाकडे पाठविणार असल्याचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. दोन खासगी एजंसीकडून सर्वेक्षण जिल्हा परिषद सर्कलनिहाय कोणता उमेदवार निवडणुकीत सरस ठरेल, याचे सर्वेक्षण खासगी एजंसीकडून केले जात आहे. त्यात दोन एजंसींनी कामाला सुरुवात केली असून त्यांच्याकडून प्राप्त गोपनीय अहवालावरून नाव निश्चित केले जाणार असल्याचेही नेत्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला आडवे करणार
By admin | Updated: January 8, 2017 00:56 IST