वणी (यवतमाळ) : शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून झालेल्या दुर्घटनेत एकजण जागीच ठार झाला, तर दोनजण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर वणीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी दुपारी १:३० ते २ वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील अडेगाव खंड क्रमांक दोनमधील शेतशिवारात घडली.
धर्मरत्न सुधाकर भगत (२५) असे मृताचे नाव असून या दुर्घटनेत पूनम संजय मालेकर (२२) व गजानन दिवाकर कोंडेकार (२१) अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही तेजापूर येथील रहिवासी आहेत. बुधवारी दुपारी सुधाकर भगत यांच्या शेतात हे तिघेही काम करीत होते. यावेळी अचानक पावसाळी वातावरण तयार होऊन मेघगर्जना सुरू झाली. अशातच या तिघांच्या अंगावर वीज कोसळली. यात धर्मरत्न भगत हा जागीच मरण पावला, तर गजानन व पूनम हे दोघे जखमी झाले. दरम्यान, वणीचे आमदार संजय देरकर यांनी जखमींची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.