नांदेपेरा येथील घटना : राजूर गावावर शोककळानांदेपेरा : गावाजवळून वाहणाऱ्या बावनमोडी नाल्यात मासेमारीसाठी गेलेल्या राजूर येथील एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने राजुर गावावर शोककळा पसरली आहे. सुमित अरविंद तेलंग (३५) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार सुमीत तेलंग हा बुधवारी दुपारी राजूर येथीलच मुन्ना रामपाल परसराम, मनोज रामपाल परसराम व गणपत मडावी यांच्यासोबत नांदेपेरा गावालगतच्या बावनमोडी नाल्यावर मासेमारी करण्यासाठी आला होता. पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने सुमीत पाण्यात बुडाला. अन्य मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. मित्रांपैकी मनोज परसराम याने पाण्याबाहेर काढले. मात्र तोवर सुमितचा मृत्यू झाला होता. या घटनेची वार्ता राजुर येथे पोहचताच, मृत सुमितच्या नातलगांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर प्रेत उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अरविंद तेलंग यांना चार मुली व सुमित हा एकुलता एक मुलगा होता. घटनेनंतर या प्रकरणी मृत सुमितचे काका असित तेलंग यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. विशेष म्हणजे मागील वर्षीसुद्धा नांदेपेरा येथील बावनमोडी नाल्यात परसराम परिवारातील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. (वार्ताहर)
मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
By admin | Updated: June 30, 2016 02:43 IST