पाटणबोरी : येथील खुनी नदी पात्रात सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास योगिता सिडाम या २२ वर्षीय युवतीचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळून आला होता. विवाहापूर्वीच योगिताचा खून झाल्याने वर आणि वधूकडील मंडळी शोकमग्न आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालात डोक्याला मार लागल्याने योगिताचा मृत्यू झाल्याचे नमूद असल्याने हा खूनच असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी याप्रकरणी भांदवि ३0२, २0१ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. येथील इंदिरानगरातील योगिता नागोराव सिडाम या युवतीचा घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावरील खुनी नदी पात्रात सोमवारी मृतदेह आढळला होता. नागोराव सिडाम यांचे येथील छत्रपती शाळेजवळील इंदिरानगरमध्ये वास्तव्य आहे. त्यांना चार मुली आणि दोन मुले आहे. त्यांच्या तीन मुलींचा विवाह झाला असून त्या सासरी संसारात रममाण आहे. आता योगिताचाही विवाह जुळला होता. रविवारी २९ मार्चला रात्री ८ वाजताच्या सुमारास योगिता कुटुंबासह जेवण करून झोपी गेली होती. मात्र मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास योगिता घरातून गायब झाल्याचे प्रथम तिचा मोठा भाऊ संतोषच्या लक्षात आले. त्याने कुटुंबियांना याबाबत अवगत केले. त्यानंतर सर्वांनी तिची शोधाशोध केली. मात्र योगिता कुठेही आढळली नाही. यानंतर सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास खुनी नदीच्या पात्रात योगिताचा मृतदेहच आढळला. तिचा मृतदेह अर्धवट जळालेल्या होता. त्यामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन व पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. योगिताचा मृतदेह अर्धवटस्थितीत जळालेला होता. त्यामुळे विविध तर्कवितर्क सुरू होते. प्रथम दर्शनी हा खून वाटत असल्याने पोलिसानी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३0२ नुसार खून व भादंवि २0१ नुसार पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मंगळवारी पोलिसांना ेशवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात योगिताच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हा अत्यंत क्रूरतेने केलेला खुनच असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस त्या दिशेने तपासात गुंग आहे. यवतमाळ येथील स्थानीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक पांढरकवडा व पाटणबोरी येथे पोहोचले आहे. प्रभारी ठाणेदार राखी गेडाम यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. त्यांना महाजन यांच्या मार्गदर्शनात पुजलवार सहकार्य करीत आहे. योगिताला प्रथम अर्धवट जाळण्यात आले. त्यात तिच्या अंगावरील कापड जळून खाक झाले. त्यानंतर तिला उंचावरून खुनी नदी पात्रात फेकून देण्यात आले. मृतदेह खाली कोसळत असताना तो एखाद्या मोठ्या दगडावर आदळला असावा. त्यामुळे तिच्या डोक्यात दगडाच बारीक कण आढळून आल्याची माहिती आहे. यामुळे तिचा मृत्यू झाल्याची पुष्टी शवविच्छेदन अहवालातून होत आहे. तथापि आधी तिला जाळण्यात आले, की वरून फेकण्यात आले, हा प्रश्न कायम आहे. तिला आधी जर जाळण्यात आले असेल, तर वरून फेकताना ती जिवंत होती, असे स्पष्ट होते. त्यामुळे जाळताना तिला किती वेदना झाल्या असतील, याची कल्पानाही केली तरी अंगावर शहारे येतात. एवढ्या कू्रर पद्धतीने तीला कुणी का मारले, याचा पोलीस शोध घेत आहेत. तिच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)आदिवासी संघटनांतर्फे हत्येच्या निषेधार्थ मोर्चायोगिता सिडाम या युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून येथील आदिवासी संघटनेने मंगळवारी मोर्चा काढला. सदर मोर्चा आदिवासी परधान समाज मंदिरापासून निघाला. हा मोर्चाद्वारे पोलीस औटपोस्ट वर धडकला. तेथे निवेदन देण्यात आले. नंतर मोर्चा गावभर फिरून मुख्य चौकात त्याचे सभेत रूपांतर झाले. या सभेत बंडू सोयाम, निम्पाल राजगडकर यांची भाषणे झाली. शेखर सिडाम यांनी संचालन केले. उपस्थितांनी योगिताच्या हत्येचा निषेध केला. तसेच तपास जलदगतीने करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी मारोती कनाके, हिवराज मेश्राम, संतोष कुडमेथे, शेषराव कनाके, दशरथ सिडाम, गंगाधर आत्राम, सुभाष चांदेकर, जयवंत कनाके, प्रभाकर येरमे, त्रिशुल वरखडे, मनोहर गेडाम, वेनूदास कनाके, प्रमोद मडावी, महादेव सिडाम, महादेव मडावी, अजय सलाम, वामन गेडाम, दिनेश राजगडकर, फरिद मेश्राम, चरणदास राजगडकर, विलास राजगडकर, नरेन्द्र कनाके, अतुल कनाकेसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते. मंगळवारी दिवसभर बाजारपेठही कडकडीत बंद ठेवण्यात आली.आरोपी एकापेक्षा अधिक : पोलिसांना संशयसोमवारी रात्री योगिताच्या मृतदेहावर शोकपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. मंगळवारी दुपारी ४.३0 वाजता यवतमाळ येथील अप्पर पोलीस अधीक्षक जे.बी.डाखोरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक संजय पुजलवार, सहायक पोलीस निरीक्षक राखी गेडाम, उपनिरीक्षक संजीव खंडारे, संतोष गोने होते. या पथकाने दिवसभर योगिताच्या परिचयातील व्यक्तींची बयाणे नोंदविली. योगिताचा खून नेमका कशाकरिता झाला असावा, आरोपीचा उद्देश काय, यावर पोलिसांची नजर आहे. योगिताला मारल्यानंतर तिला अर्धवट का जाळण्यात आले, अंगावरील कपडे एकीकडे टाकून मृतदेह नदी पात्रात दूरवर का फेकण्यात आला, हे मात्र कोडेच आहे. योगिताचा खून केल्यानंतर ५०० मीटर अंतरावर खुनी नदीकडे नॉयलॉन दोरी बांधून मृतदेह नेण्यात आला असावा, आरोपी एकापेक्षा अधिक असावे, असा कयास आहे. सालस स्वभावाची होती योगितामृतक योगीताचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तीन महिन्यापूर्वी तिचा वणी तालुक्यातील गणेशपूर येथील युवकाशी विवाह जुळला होता. त्यानंतर नुकतेच साक्षगंधही आटोपले होते. येत्या ३० मे रोजी तिचा विवाह स्थानिक साई मंदिरात आयोजित करण्यात आला होता. लग्न दोन महिन्यावर असल्याने योगिता सुखी संसाराची स्वप्ने रंगवीत होती. दोन्हीकडे लग्नाची तयारी सुरू होती. त्यासाठी सभागृह बुक झाले होते. कपड्यांचीही खरेदीही झाली होती. मात्र अर्ध्यावरच डाव सोडून योगिता निघून गेली. त्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. योगिताचे आई-वडील विटभट्टीवर काम करतात. योगिताचा एक भाऊ संतोष विटभट्टीवर, तर दुसरा संजू एका हॉटेलमध्ये काम करतो.
विवाहापूर्वीच झाला योगिताचा खून
By admin | Updated: April 1, 2015 02:09 IST