व्यावसायिक पसार : सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज डिलिट करणारा हॉटेल मालकही निशाण्यावर यवतमाळ : शहरातील एका पॉश हॉटेलमध्ये व्यावसायिकाने आपल्या परवानाप्राप्त पिस्तुलातून गोळीबार केल्याची स्वीकृती देत पोलिसांनी अखेर त्या व्यावसायिकाविरूद्ध गुन्हा नोंदविला. चौकशीची कुणकुण लागताच गोळीबार करणारा व्यावसायिकच नव्हे तर हॉटेल व्यावसायिकही भूमिगत झाला आहे. ‘लोकमत’ने सर्वप्रथम यासंबधी वृत्त प्रकाशित करून प्रकरण उजेडात आणले होते. चौकशीअंती घटनेवर शिक्कामोर्तब होवून अखेर गुन्हा दाखल झाला, हे विशेष!राजू ऊर्फ सचिन व्यास, रा. यवतमाळ असे गोळीबाराच्या घटनेत गुन्हा नोंद झालेल्या टाईल्स व्यावसायिकाचे नाव आहे. तर दारव्हा मार्गावरील हॉटेल रेवती प्राईडमध्ये ही घटना घडल्याचेही पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबारात हॉटेलच्या काचा फुटल्या होत्या. यावेळी कारवाई टाळण्यासाठी पाच हजाराची तत्काळ भरपाईही दिली गेली. कुठलाही पुरावा शिल्लक राहू नये म्हणून हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील घटनेचे चित्रीकरणही डिलिट करण्यात आले. शहरातील टाईल्स् व्यावसायिकाने आपल्या परवाना प्राप्त पिस्तुलमधून हा गोळीबार केला होता. पोलीस यंत्रणा आणि त्यांचा खुफिया विभाग या घटनेपासून अनभिज्ञ होता, हे विशेष. ‘लोकमत’ने या गोळीबाराचे वृत्त प्रकाशित करताच पोलिसांची झोप उघडली. शहर ठाणेदार दिलीप चव्हाण यांनी चौकशी सुरू केली. दरम्यान गोपनीय माहिती आणि काही प्रत्यक्षदर्शींची नावे पोलिसांना प्राप्त झाली. भारती अपार्टमेंटमधील एका प्रत्यक्षदर्शी आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. शहर पोलिसांनी फौजदार मनवर यांच्या तक्रारीवरून राजू व्यास याच्याविरूध्द गुन्हा नोंदविला. (स्थानिक प्रतिनिधी)
होय, गोळीबार झालाच! अखेर गुन्हा दाखल
By admin | Updated: January 3, 2015 23:09 IST